समाजात वावरताना महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. महिलेच्या प्रत्येक कृतीचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. असाच एक प्रकार दिल्ली विमानतळावर घडला. या प्रकाराबाबत इशिता भार्गव यांनी फानान्शिअल एक्स्प्रेसमध्ये सविस्तर वृत्तांत दिला आहे.
इशिता भार्गव म्हणाल्या, दिल्ली विमानतळावरील सुरक्षा तपासणीसाठी मी रांगेत उभी होते, त्यावेळी सहप्रवाशांच्या तीक्ष्ण नजरा आणि कुरकुर माझ्या लक्षात आली नाही. गर्दीच्या ठिकाणी अशी कूरकूर होणं साहजिक होतं. परंतु, यावेळी काही वेगळं घडत होतं. तिथल्या लोकांची नजर माझ्या समोरच्या बाईवर खिळली होती. पण तिचं कोणाकडेच लक्ष नव्हतं.
“माझ्या पुढे असलेली बाई मला आत्मविश्वासू वाटली, तिने तिची कॅरी-ऑन बॅग स्क्रीनिंगसाठी कन्व्हेयर बेल्टवर ठेवली. तेव्हा तिची वागणूक अत्यंत शांत होती. मात्र तिची बॅग मशिनमधून जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. त्यांची कुजबूज ऐकून इतर कर्मराचीही त्यांच्या मॉनिटरभोवती जमा झाले. अविश्वास आणि करमणूक असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.”
हेही वाचा >> कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?
“तिच्या बॅगमध्ये सेक्स टॉय असू शकतं. अशा स्त्रियांना लाजही वाटत नाही”, असे तिखट शब्द कर्मचाऱ्यांच्या तोंडून बाहेर पडले. हे शब्द ऐकताच मला अस्वस्थता वाटू लागली. जिचं हे सामान होतं, त्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा तिचा चेहरा लाजिरवाणा झाला होता. तिला कदाचित तिचीच लाज वाटू लागली होती. या सर्व प्रकाराबद्दल मला बोलायचं होतं. तिच्याबाबत घडलेल्या गोष्टींविरोधात आवाज उठवायचा होता. पण मला भीती वाटली की मी अधिक काही बोलले आणि प्रकरण वाढलं तर? आपणच पुढच्या चौकशीचे लक्ष्य झालो तर?”
“या घटनेत मला महिलेची बाजू घ्यायला हवी होती. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविरोधात आवाज न उठवता मी त्या घटनेची मूक साक्षीदार राहिले या गोष्टीची माझ्या मनात खंत आहे. शेवटी सखोल चौकशीनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना महिलेच्या बॅगेत काहीच दोषी आढळलं नाही. तिने आता तिचं सामान गोळा करावं, असं सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हातानेच इशारा करत सांगितलं आणि पुढे जाण्यास सांगितलं. या परिस्थितीत संबंधित महिला इतकी खाजिल झाली की तिला कोणासही नजर मिळवायला लाज वाटू लागली.”
हेही वाचा >> लग्नानंतर १५ दिवसांत पतीने सोडलं, धीराने नोकरीसह केला अभ्यास अन्…; कोमल गणात्रा ‘अशी’ बनली IRS अधिकारी
“ही घटना माझ्या डोळ्यांसमोर घडली. मी माझा पुढचा प्रवास सुरू केला, पण माझ्या मनातून ती घटना जात नव्हती. मला त्या महिलेची माफी मागायची होती. तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी आवाज उचलू शकले नाही, त्यामुळे तिची माफी मागावी असं मला वाटलं. पण ती आधीच तिथून निघून गेली. ती तिच्या फ्लाईटच्या दिशेने वेगात निघून गेली.”
“त्या महिलेला अशा आव्हानात्मक परिस्थितीत मी तिला मदत करू शकले नाही, याची खंत मला कायम बोचत राहणार नाही. ही गोष्ट केवळ या घटनेपुरती मर्यादित नाही. पण समाजाच्या एकूण वाईट वृत्तींविरोधात बोलता यायला हवं. आपण प्रत्येकजण जाणीवपूर्वक पक्षपात करत असतो. त्यामुळे परस्परसंवादात सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे प्रत्येक अन्यायाविरोधात बोलण्याचं धाडस करण्याचं एक मूक वचन मी स्वतःलाच यानिमित्ताने दिलं.”