मनोरंजन विश्व हे आपल्यापैकी अनेकांसाठी आजही आभासी आहे. आवडता कलाकार अचानक समोर आला किंवा कुठे दिसला, तर क्षणभर आपला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. टीव्ही आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांचं आयुष्यच निराळं, असंच आपल्याला वाटतं. ते लोक वेगळ्याच दुनियेत राहत असतील असा आपल्यापैकी अनेकांचा समज. याच झगमगत्या दुनियेतील एक अभिनेत्री येते आणि आपल्यातलीच वाटू लागते तेव्हा…

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. इतर मराठी चित्रपटांप्रमाणेच ‘महाराष्ट्र शाहीर’ची टीमही प्रमोशनकरिता ‘लोकसत्ता’मध्ये आली होती. अंकुश चौधरी, केदार शिंदे व त्यांची लेक सना शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या निमित्ताने मुलाखतीसाठी आले होते. केदार शिंदेंची लेक सनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. याआधी तिने केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या निमित्ताने सनानेही अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. पण या सगळ्या मुलाखतींत लक्ष वेधून घेतलं ते सनाच्या साधेपणाने. आमच्याकडेही सना मुलाखतीला आली तेव्हा एकदम साधा लूक होता. साधा ड्रेस आणि साजेसा मेकअप… बास! तिच्या चेहऱ्यावर ना कुठला झगमगाट होता ना वागण्यात कोणता अ‍ॅटिट्यूड. प्रश्नांची उत्तरं देतानाही सना अगदी विचार करून बोलत होती. बरं, स्टारकिड असल्याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.

हेही वाचा>> पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’

मुलाखत झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे कलाकारांबरोबर फोटो काढण्यासाठी उभे राहिलो. सनाजवळ फोटो काढायला गेल्यानंतर तिने अचानक मैत्रिणीसारखा माझ्या कमरेत हात टाकला… आणि मी दोन सेकंद स्तब्ध झाले. याआधीही अनेक अभिनेत्रींबरोबर फोटो काढले होते, पण दोन पावलं अंतर ठेवूनच. केवळ माझ्याबरोबरच नाही तर फोटो काढणाऱ्या प्रत्येक मुलीच्या खांद्यावर किंवा कमरेवर हात ठेवून सनाने पोझेस दिल्या. मुलाखत झाल्यानंतर केदार शिंदे किंवा अंकुश चौधरी नाही तर आमच्यात सनाची चर्चा रंगली होती.

हेही वाचा>> ‘पावनखिंड’, प्राजक्ता माळी आणि बायकांच्या भोळ्याबाभड्या आशेचा ‘तो’ सीन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही कलाकारांनी यशाची कितीही शिखरं गाठली तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असतात. केदार शिंदे हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलीवरही तेच संस्कार केले आहेत, हे सनाच्या वागणुकीतून स्पष्ट जाणवतं. केदार शिंदेंना असिस्ट केल्यानंतर कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेस का? असा प्रश्न आम्ही सनाला विचारला होता. यावर तिने दिलेल्या उत्तरानेही याची कल्पना आली होती. “दिग्दर्शनासाठी नाही, तर एक उत्तम कलाकार होण्यासाठी आणि चित्रपट तयार करताना कॅमेरामागे घडणाऱ्या गोष्टी, त्यासाठी किती मेहनत लागते, किती माणसं चित्रपटासाठी काम करत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी असिस्ट केलं होतं,” असं सना म्हणाली होती. खरंच, सेलेब्रिटी होतात पण…कलाकार घडवले जातात!