डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
माणसाचा विचार अनेक दिशांनी संचार करत असतो. तो एका सरळ रेषेत कधीही जात नाही. त्या विचारांमध्ये संस्कृतीच्या अनेक विचारधारा एकवटलेल्या असतात. या विचारधारा प्रतीकांमधून, मूर्तींमधून तर कधी कधी ग्रंथांमधून दिसतात. त्या कालानुरूप बदलतही असतात. शिवाय, भारतीय संस्कृती ‘जुने जाउद्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनी टाका’ असे म्हणणाऱ्यातली नाही. ती जुन्या रूपावर नवीन मुलामा चढवते. संस्कृतीचा अभ्यास करताना याचे भान राखून अभ्यास करावा लागतो. वस्तुतः पुराणकथा आणि कला या मनुष्याच्या कल्पना करण्याच्या प्रतिभेमधून अस्तित्वात येतात. आणि तत्त्वज्ञान त्याच्या तार्किक प्रज्ञेमुळे अस्तित्वात येते. अनेक देवतांच्या स्वरूपामध्ये कला आणि तत्त्वज्ञान यांची सुरेख गुंफण दिसते. होता होईतो त्यांचे पदर उलगडून सांगणे हे संस्कृतीच्या अभ्यासकांचे काम आहे.
दुर्गेच्या स्वरूपात तंत्रपूजेतल्या शक्तीचा आणि पार्वती यांचा अनोखा मिलाफ सापडतो. तिचे कूष्माण्डा हे नवरात्राच्या चौथ्या दिवशीचे रूप आहे. देवीकवचामध्ये सांगितलेल्या नवदुर्गा काही वेळेस सामान्य स्त्रीच्या अवस्थांवर बेतलेल्या असाव्यात असे वाटते. चंद्रघंटेमध्ये विवाह करणारी आणि त्याचवेळी आपल्यावरच्या अन्यायाचा प्रतिकार करणारी स्त्री दिसते. विवाहानंतर तीच जगज्जननी होते. स्त्री उदरात गर्भ धारण करून निर्मितिक्षम होते. प्राचीन मनुष्याला माणसाचा जन्म कसा होतो याचे कुतूहल होते. अगदी सुरुवातीच्या काळात त्याला स्त्रीपुरुषांच्या जन्मामधली पुरुषांची भूमिका माहीत नव्हती. स्त्रीच्या उदरातून मनुष्यजन्म होतो एवढेच त्याच्या दृष्टोत्पत्तीस येत असे. यामुळे, स्त्रीच्या मातृत्वाला महत्त्व आले. याच विचारधारणेमधून मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याला कुंभामध्ये, घटामध्ये ठेवून पुरवण्याची पद्धत आली. या पद्धतीला pot burials म्हणतात. जन्म घेताना मनुष्य जसा आईच्या उदरातून जन्म घेतो तसाच तो मृत्यूनंतरही पृथ्वी मातेच्या उदरात जावा असा विचार या प्रथेमागे आहे.
नवरात्रातील घटस्थापनादेखील याच विचारधारेमधून निर्माण झाली आहे. घट हे मातेच्या उदराचे प्रतीक आहे. स्त्रीच्या मातृस्वरूपाचा आविष्कार अनेक प्रकारच्या मूर्तीमध्येही दिसतो. सप्तमातृकांच्या मूर्ती हा देखील मातृ स्वरूपाचाच आविष्कार आहे. दुर्गा ही जरी संहारक असली तरी ती मातृदेवतादेखील आहे. म्हणून मूर्ती करताना तिचे स्तन विशाल दाखवावेत, तिच्या मांड्यादेखील विशाल दाखवाव्यात अशा सूचना आगमग्रंथांमध्ये मूर्तिकारांना दिल्या आहेत. दुर्गाकवचामध्ये स्त्रीचे हे निर्मितिक्षम रूप दुर्गेच्या कूष्मांडा या स्वरूपामधून दाखवले आहे. ती ब्रह्मांड निर्माण करणारी आहे, जगज्जननी आहे. शिवाय, कूष्मांडाप्रमाणे भक्तांवरची संकटं स्वतःवर घेऊन त्यांचं रक्षण करणारी आहे.
कूष्माण्ड म्हणजे कोहळा. हा शब्द जरी संस्कृत असला तरी तो संस्कृत भाषेत दुसऱ्या कोणत्यातरी भाषेमधून स्वीकारला असावा. म्हणून कदाचित् कुष्मांड, कुस्मांड, कूष्मांड आणि कूस्मांड अशा चारही प्रकारे लिहिला जातो. लोकपरंपरेमधून तंत्राचा विकास झाला. या लौकिक परंपरेमध्ये कोहळा कधी शुभ तर आसुरी शक्तीचे प्रतीक मानला जातो. दृष्ट लागणे, वाईट नजरेमुळे घरामध्ये समृद्धी, शांतता न नांदणे, इ. अंधश्रद्धा अगदी प्राचीन काळापासून दिसतात. आणि त्यावर काही तोडगे सुचवले जात असत. अशा तोडग्यांमध्ये कोहळ्याला खूप मोठे स्थान होते. कोहळा वाईट नजर आपल्याकडे स्वीकारतो आणि घरावर, घरातल्या माणसांवर ती नजर पडू देत नाही अशी समजूत अगदी आजही दक्षिणेकडे आढळते. घरात समृध्दी यावी यासाठी प्रवेशद्वारावर कोहळा बांधण्याची प्रथा आहे.
काही आदिवासी लौकिक परंपरांमध्ये नरबळी देण्याची प्रथा होती. बौद्ध धर्माचा विकास होत गेल्यावर लौकिक नरबळी, वैदिक यज्ञांमधली पशुहत्या यांना आळा बसला. नारळाला श्रीफल असे म्हणतात. तो शब्द शिरःफलम् पासून तयार झाला असावा असे अनेकजण म्हणतात. मानवी शिराचे प्रतीक म्हणून ज्याप्रमाणे नारळ फोडतात त्याचप्रकारे कोहळाही फोडतात. कोहळ्याचा बली देतात. कूष्मांड नावाचा असुर असल्याचेही सांगितले जाते. कूष्मांडादेवीचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे –
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे।।
(सुरेने भरलेला आणि रक्ताने माखलेला घडा आपल्या सुंदर हातात घेणारी कूष्माण्डा मला शुभदायी होवो.)
तिचे हात कमळासारखे आहेत, म्हणजे ती सुंदर आणि कोमल आहे हे ‘हस्तपद्म’ या शब्दावरून समजते. ती आपल्या सुंदर हातांमध्ये रक्ताने माखलेला घडा धारण करते, यामधून ती वाईट गोष्टींचा नाश करते हे समजते. परंतु सुरासम्पूर्णकलश हे प्रतीक नेमके काय असावे हे समजत नाही. सुरा म्हणजे दारू. वस्तुतः वैदिक कर्मकांडातला एक सौत्रामणि यज्ञ सोडला तर सुरेचा वापर कुठेही दिसत नाही. मग इथे कूष्माण्डेचं वर्णन करताना ‘दारूने भरलेला घडा धारण करणारी’ असं का बरं म्हटलं असेल?
लोकपरंपरा, अथर्ववेदपरंपरा आणि तंत्र याचं नातं आहे. अथर्ववेदातले कित्येक विधि लोकपरंपरेमधून स्वीकारलेले दिसतात. अथर्ववेदात सुराकलश हे शांतीचं, सामंजस्याचं प्रतीक आहे. या वेदाच्या परंपरेत सांमनस्यानि नावाचा सूक्तांचा एक गट आहे. पतिपत्नी मधील, कुटुंबातील, गावातील कलह मिटावेत, सर्वजण एकमनाने एकत्र यावेत हा या विधीचा उद्देश आहे. यातल्या एका विधीमध्ये पुरोहित दारूनं भरलेला घडा घेऊन येतो आणि ज्यांच्यामध्ये कलह आहे अशा व्यक्तींना एकत्र बसवून अन्न, दारू आणि पाणी प्यायला लावतो. कूष्मांडा घराघरांमध्ये शांतता, समृद्धी आणते आणि ते ध्वनित केलेलं आहे तिच्या हातातल्या सुरेच्या कलशाद्वारे.
नवनिर्मिती, अशुभाचा संहार आणि शांतता प्रस्थापित करणे ही कामे कूष्मांडा करते. नवनिर्मिती मूल जन्माला घालणे एवढ्यापुरती मर्यादित नाही, हे ध्यानात घेतले तर कूष्मांडेची ही कार्ये स्त्री किंवा पुरुष करू शकतात. कूष्मांडेच्या स्वरूपामधून हेच शिकता येते.