मिस वर्ल्ड ही जगभरातील सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. तब्बल २८ वर्षांनंतर या स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत जवळपास १३० हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा मुंबईतील जियो वर्ल्ड कर्न्वेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडच्या नवज्योत कौरची चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय वंशाची नवज्योत या स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. २७ वर्षीय नवज्योत न्यूझीलंडमधील माजी पोलिस अधिकारी असून तिने मिस न्यूझीलंडचा किताबही मिळवला आहे. नवज्योत माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनची मोठी चाहती आहे. ऐश्वर्या राय आणि प्रियांका चोप्राकडून नवज्योतला मिस वर्ल्ड स्पर्धा लढवण्याची प्रेरणा मिळाली. नवज्योत येत्या मिस वर्ल्ड स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी तिला तिची बहीण ईशाचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.
हेही वाचा- UPSC: लेक असावी तर अशी! वडील रस्त्यावर पकोडे विकायचे, लेकीनं यूपीएससीत मारली बाजी
नवज्योतचे मूळ गाव पंजामधील जालंधर आहे. मात्र, तिचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे नवज्योतचा जन्म, शिक्षण सगळे न्यूझीलंडमध्ये झाले. एकट्या आईने नवज्योतचा सांभाळ केला. नवज्योत न्यझीलंडच्या दक्षिण ऑकलॅंडमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होती. मात्र, तिला सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा होता त्यामुळे तिने नोकपीचा राजीनामा दिला.
दरम्यान, मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवज्योत भारतात दाखल झाली असून, सध्या ती भारतातील विविध शहरांना भेटी देत आहे. नवज्योतला अमृतसरचे सुवर्ण मंदिर तसेच आग्र्याचा ताजमहाल पाहण्याची इच्छा आहे. एवढंच नाही, तर तिला मिस वर्ल्डमधील स्पर्धकांना भारतातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ पाणीपुरीही खायला घालायची आहे.
भारताने आत्तापर्यंत सहा वेळा ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला आहे. रिटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) आणि मानुषी छिल्लर (२०१७) या सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. आता नवज्योत कौर ‘मिस वर्ल्ड’चा मुकूट जिंकणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.