समान संधी मिळाल्यानंतर महिला कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकतात, हे जगभरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी दाखवून दिलं आहे. हवाई सुंदरी ते वैमानिक होण्यापर्यंतचा टप्पा महिलांनी यशस्वीरित्या गाठला. प्रवासी विमानाच्या वैमानिक झाल्यानंतर लष्करात लढाऊ विमान उडविण्याची जबाबदारी महिलांनी लिलया पेलली. आता तर महाविद्यालयीन वयातही आम्ही गगनभरारी घेऊ शकतो, हे युवतींनी सिद्ध करून दाखवलं आहे. नांदेडच्या अवघ्या १९ वर्षीय युक्ता बियाणीनं व्यावसायिक वैमानिक होण्यासाठीचं प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक होण्याचा बहुमान मिळविला.

मराठवाडा हा महराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या अनेक आव्हानांनी भरलेला प्रदेश. सततची दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्रोटक कारखानदारी व उद्योग आणि संधीची कमतरता असूनही इथले युवक-युवती केवळ जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रात नाव कमावत असतात. नांदेडमध्ये राहणारी युक्ता बियाणीनं आपलं नाव यशोगाथेच्या या यादीत समाविष्ट केलं आहे. देशात सर्वात कमी वयात व्यावसायिक वैमानिक बनण्याचा विक्रम युक्ता बियाणीनं केला आहे. बालपणापासून वैमानिक बनण्याचं तीचं स्वप्न होतं. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तिला पालकांची खंबीर साथ मिळाली. त्यानंतर योग्य शैक्षणिक नियोजन करून तिनं आपलं स्वप्न साकार केलं.

फायटर पायलट बनण्यासाठी चार वर्षे मातृत्वाचा त्याग!

वैमानिक होण्यासाठी युक्तानं बारावीनंतर मुंबई येथे सहा महिने विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर बारामती येथील फ्लाईंग स्कुलमध्ये पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली. या प्रशिक्षणादरम्यान तिने २०० तास विमान चालवलं. यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी वैमानिक बनण्याचा बहुमान युक्ता बियाणीला मिळाला. तिच्या या गरुडझेपेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. युक्ता बियाणीनं आता एअर इंडिया कंपनीत वैमानिक म्हणून नोकरी मिळविण्यासाठीचा अर्ज केला आहे. नांदेडच्या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना तिनं सांगितलं की, एअर इंडियामध्ये तिची नियुक्ती होईल, असा तिला विश्वास वाटतो.

मुंबईची आएशा अझिझ २१ व्या वर्षी वैमानिक

२०१७ साली मुळची जम्मू-काश्मीरची आणि मुंबईत वास्तव्य असलेल्या आएशा अझिझ या तरूणीने २१ व्या वर्षी वैमानिक होण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला होता. त्यानंतर युक्ता बियाणी ही १९ व्या वर्षीच वैमानिक होऊन तिने हा विक्रम मोडला. आएशानेही १६ व्या वर्षापासूनच वैमानिक होण्याचा ध्यास घेतला होता. बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून तिला विद्यार्षी वैमानिक परवाना देण्यात आला होता.

मुळची काश्मीरची आणि मुंबईत राहणारी आएश अझिझ २३१ वर्षी वैमानिक बनली.

मुंबईची मुलगी ठरली भारताची पहिली तरुण वैमानिक

जम्मू-काश्मीरच्या महिलांनी विविध क्षेत्रात पुढं येऊन आपलं कर्तुत्व सिद्ध करावं, यासाठी ती प्रयत्न करत असते.

नांदेडची रेवा १४ व्या वर्षी बनली वैमानिक

विशेष म्हणजे युक्ता बियाणीप्रमाणेच नांदेडच्या आणखी एका मुलीने १४ व्या वर्षी विमान उडविण्याचा पराक्रम केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले होते. त्यांची मुलगी रेवा दिलीप जोगदंडने अमेरिकेत १४ व्या वर्षी विमान उडविण्याचा विक्रम केला होता. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील रेवाने सातासमुद्रापार अमेरिकेत हा विक्रम केला असला तरी इथे कोंढावासियांना आपल्या मुलीचा अभिमान वाटतो. आपल्या मेहनतीच्या जोरावर रेवाने अमेरिकेच्या नौदल हवाई पथकात फ्लाईट कमांडर पद मिळविले आहे.