डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
ब्रह्मचारिणी पार्वती आधुनिक स्त्रियांनाही मार्गदर्शन करते. पार्वती वस्तुतः हिमालयासारख्या पर्वतराजाची कन्या, श्रीमंत घराण्यातील. पण शंकराच्या गुणांवर भाळली. त्याच्यासारख्या गुणी, पण गरीब व्यक्तीशी लग्न करण्याच्या आपल्या ध्येयापासून ती तसूभरही ढळली नाही. ध्येयापासून दूर न जाणे या ब्रह्मचारिणीकडून शिकावे. ध्येय मग ते कोणतेही असो, विद्यार्थीदशेमध्ये जे शिकायचे आहे त्यासाठी कितीही खस्ता खायला लागल्या तरी ते पूर्णपणे शिकावे. जे शिकायचे आहे त्याचा ध्यास लागायला हवा. अक्षमाला ही अशा ध्यासाचे प्रतीक आहे. पार्वतीने इतर गोष्टींकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. ती रूपवती होती, पण तिने प्रसाधन टाळले. कमंडलू हे मूलभूत गरजांचे निदर्शक आहे. मूलभूत गरजा भागवून आपल्या ईप्सिताचा ध्यास लागणे हे ब्रह्मचारिणीचे म्हणजे तपश्चर्या करणाऱ्या स्त्रीचे लक्षण आहे.
तपश्चर्या म्हणजे तरी काय? आपले ईप्सित साध्य होईपर्यंत कष्ट सहन करणे, अडचणींना तोंड देणे, प्रलोभनांकडे दुर्लक्ष करणे नव्हे काय? नवदुर्गांमध्ये देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा पहिल्या दिवशी केली जाते. दुसऱ्या दिवशी तिचे ‘ब्रह्मचारिणी’ हे रूप पूजिले जाते. ब्रह्म शब्दाचा ऋग्वेदातला मूळ अर्थ प्रार्थना किंवा प्रार्थना करणारा असा आहे. यावरून ब्रह्मचारी म्हणजे प्रार्थना किंवा वेद शिकणारा असा अर्थ झाला. ब्रह्मचारिणी हे ब्रह्मचारी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. तप करणाऱ्या पार्वतीचे हे रूप ब्रह्मचारिणी म्हणून नवरात्रोत्सवात पूजले जाते.
शंकराने मदनदाह केल्यावर लग्न करीन तर शंकराशीच असा पार्वती हट्ट धरून बसली आणि तपश्चर्या करून शंकराला वश करण्याचे तिने ठरवले. आपल्या एका मैत्रिणीला, जयेला घेऊन ती हिमालयाच्या एका शिखरावर तपश्चर्येसाठी गेली. या शिखराला नंतर गौरीशिखर असे नाव मिळाले. केवळ फलाहार, पंचाग्निसाधन इ. तपश्चर्येचे अनेक प्रकार तिने अवलंबिले. पंचाग्निसाधन म्हणजे चार अग्निकुंडामधला अग्नी आणि वरून आग ओकणारा सूर्य अशा पाच अग्नीमध्ये उभे राहून जप, मनन करणे. नंतर काही काळ ती फक्त झाडांची गळलेली पानं खाऊन राहू लागली. काही दिवसांनंतर तर ती पानेही खाणे तिने बंद केले. म्हणून तिचे ‘अपर्णा’ ( पाने देखील न खाणारी) असे नाव आहे.
पार्वतीची ही कथा शिवपुराण, ब्रह्मपुराण आणि कालिकापुराणात आली आहे. या कथेचा ललित आविष्कार कालिदासाने त्यांच्या कुमारसंभव या महाकाव्यात चित्रित केला आहे. पार्वतीचे हे रूप हरतालिका स्वरूपात आजही समाजाने जपले आहे. तिचे हे तपस्विनी रूप अनेक शिल्पांमध्येही आढळते. वेरूळमध्ये एक शिल्प तीन भागात विभागलेले आहे. त्यातल्या पहिल्या भागात पार्वतीचे तपस्विनी रूप चित्रित केले आहे. ती पर्वतावर दोन अग्निकुंडांच्यामध्ये ताठ उभी असून तिच्या उजव्या हातात अक्षमाला आहे आणि डावा हात तिने आपल्या मांडीवर ठेवला आहे. कुषाण राजांच्या काळात मूर्तिकलेच्या दोन प्रकारच्या शैली विकसित झाल्या, एक गांधार शैली. गांधार प्रांतात अधिक करून बुद्धाच्या मूर्ती होत्या. कुषाणकाळात विकसित झालेली दुसरी शैली म्हणजे मथुरा शैली. साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून तिसऱ्या शतकापर्यंत ही शैली विकसित झालेली दिसते. या शैलीमध्ये तपास्विनी पार्वतीच्या मूर्ती आढळतात.
काही पार्वतीच्या मूर्तींमध्ये अक्षमालेच्या जोडीला एका हातात कमंडलूही दाखवला जातो. पार्वतीची मूर्ती कशी करावी या संबंधीच्या सूचना काही तंत्रग्रंथांमध्ये आढळतात. तिची देवी स्वरूपात पूजा करताना तिची मूर्तीला चार हात असावेत. एका हातात अक्षमाला, दुसऱ्या हातात शिवाची प्रतिमा, तिसऱ्या हातात गणेश प्रतिमा आणि चौथ्या हातात कमंडलू दाखवावा. अग्निकुंडांच्या मधल्या जागेत ती रहाते असे दाखवावे. त्यानुसार काही वेळा तपस्विनी पार्वतीला चार हात असतात.
पार्वतीच्या या तपस्विनी रूपामधूनच देवीकवचामधली ब्रह्मचारिणीने आकार घेतला असावा. या ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे –
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू|
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा||
(एका हातात अक्षमाला आणि दुसऱ्या हातात कमंडलू धारण करणारी श्रेष्ठ अशी ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर कृपा करो.)
अक्षमाला म्हणजे रुद्राक्षमाला. ही माळ जप करण्यासाठी वापरत असत. रुद्राक्षमाला आणि कमंडलू ही वेदवाङ्मयाशी संबंधित किंवा तपाशी संबंधित प्रतीके देवतांच्या मूर्तीमध्ये दाखवतात. ब्रह्मदेव, सरस्वती इ.देवता वेदवाङ्मयाशी संबंधित म्हणून त्यांच्या हातात जपमाला असतेच.तपस्या करत असताना पार्वतीने शंकराच्या नावाचा जप केला; म्हणून तिच्या हातात जपमाला दाखवतात. ब्रह्मचारिणीचे दुसरे लांछन (चिह्न) म्हणजे मूर्तीमध्ये दिसणारे लक्षण म्हणजे कमंडलू. कमंडलू पाणी पिण्यासाठी वापरत असत. अगदी प्राचीन काळी भोपळ्यापासून बनवत, त्यानंतर लाकडापासून आणि नंतर धातूपासून तयार करीत.
नवरात्रातील ब्रह्मचारिणीचे स्वाधिष्ठान चक्र हे अधिष्ठान आहे. पार्वतीने शंकर हाच पती मिळावा म्हणून तपश्चर्या केली हे खरे. तत्कालीन स्त्रियांना दुसरे ध्येयच नव्हते. परंतु आता तसे नाही. स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने शिकू लागल्या आहेत. त्यांना लग्न, संसार याखेरीज इतर ध्येये ही साध्य करायची असतात. मला वाटतं, ही ब्रह्मचारिणी पार्वती आधुनिक स्त्रियांनाही मार्गदर्शन करते. पार्वती वस्तुतः हिमालयासारख्या पर्वतराजाची कन्या, श्रीमंत घराण्यातील. पण शंकराच्या गुणांवर भाळली. त्याच्यासारख्या गुणी, पण गरीब व्यक्तीशी लग्न करण्याच्या आपल्या ध्येयापासून ती तसूभरही ढळली नाही. ध्येयापासून दूर न जाणे या ब्रह्मचारिणीकडून शिकावे. ध्येय मग ते कोणतेही असो, विद्यार्थीदशेमध्ये जे शिकायचे आहे त्यासाठी कितीही खस्ता खायला लागल्या तरी ते पूर्णपणे शिकावे. जे शिकायचे आहे त्याचा ध्यास लागायला हवा. अक्षमाला ही अशा ध्यासाचे प्रतीक आहे. पार्वतीने इतर गोष्टींकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. ती रूपवती होती, पण तिने प्रसाधन टाळले. कमंडलू हे मूलभूत गरजांचे निदर्शक आहे. मूलभूत गरजा भागवून आपल्या ईप्सिताचा ध्यास लागणे हे ब्रह्मचारिणीचे म्हणजे तपश्चर्या करणाऱ्या स्त्रीचे लक्षण आहे. तपश्चर्या म्हणजे तरी काय? आपले ईप्सित साध्य होईपर्यंत कष्ट सहन करणे, अडचणींना तोंड देणे, प्रलोभनांकडे दुर्लक्ष करणे नव्हे काय? हा गुण तर फक्त शिक्षण सुरू असलेल्या मुलामुलींनीच नव्हे तर नंतरच्या वयातही घेण्याजोगा आहे. कोणत्याही मनुष्याला अगदी लहानसे ध्येय साध्य करायचे असेल तर अडीअडचणी येतातच. त्यांचा बाऊ न करता होईल तो त्रास सहन करून त्यातून मार्ग कसा काढायचा आणि आपले ध्येय साध्य करायचे हीच शिकवण ब्रह्मचारिणी पार्वती देते.
nirmalarkulkarni@gmail.com