अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वच दुर्गा निर्माण झाल्या आहेत. सतत सुंदर दिसणं ही स्त्रीकडून सर्व युगांमध्ये असलेली अपेक्षा काली किंवा कालरात्री पूर्ण करत नाही. इतर दुर्गा दिसायला सुंदर आहेत आणि शिवाय पुरुषांना न जमणारी अचाट कृत्येदेखील करणाऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये वीर कृत्ये करण्याची क्षमता आहे. पण एरवी कोमल दिसणारी, मातेची ममता उरी बाळगणारी स्त्री प्रसंगी भयावह असं उग्र स्वरूपही धारण करू शकते हे कालीच्या, कालरात्रीच्या स्वरूपातून संस्कृतीने जाणवून दिले आहे.
शक्तीला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या पंथाला शाक्तपंथ म्हणतात. शाक्तपंथामध्ये देवीला स्वतंत्र स्थान आहे. या पंथामध्ये देवी ही देवाची पत्नी म्हणून येत नाही; तर ती बऱ्याचदा स्वतंत्र असते. शक् म्हणजे करणे, करण्याची क्षमता असणे. इथे देवीच्या म्हणजे शक्तीच्या ठिकाणी स्वतंत्रपणे कार्य करण्याची क्षमता आहे असे मानले जाते. ती जग निर्माण करते, ती त्यांचे मातेप्रमाणे पालन करते. जगावर आलेली संकटे परतवून लावण्याची क्षमताही तिच्यामध्ये असते. भक्तांची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य तिच्या ठिकाणी असते. तिची अनेक रूपे आहेत. शैव विचारधारेमध्ये ही शक्ती शिवाशी संबंधित आणि वैष्णव विचारधारेमध्ये विष्णूशी संबंधित असते. देवी भागवत, मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्य शक्तीला पर्यायाने देवीला प्रधान मानणारे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ शाक्तपंथीयांचे महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात.
शाक्तपंथाचा भारतामध्ये इ.स.पू. ९००० च्या दरम्यान उगम झाला असावा. यासंबंधीचे काही पुरातत्त्वीय पुरावे सापडले आहेत. या शक्ती किंवा देवीचे सर्वत्र आढळणारे रूप म्हणजे महिषासुरमर्दिनी दुर्गा. दुर्गेचे शाक्तपंथाचा प्रभाव दाखवणारे एक महत्त्वाचे रूप म्हणजे काली किंवा कालरात्री. पार्वती ही शक्ती शाक्तपंथीयांची श्रेष्ठ देवी आहे. अशुभाचा, दुष्टांचा संहार कसा केला आणि भक्ताला मोक्ष देण्यामधले योगदान काय यावर कोणत्याही देवतेचं श्रेष्ठत्व ठरतं. पार्वती ही मुख्यत्वे साकारली गेली आहे ती युद्धदेवता म्हणून.
काली, कालिका, कालरात्री ही नावे साधारण समानार्थी आहेत. काली या नावांमध्ये दोन छटा आहेत; एक काळा रंग असलेली आणि दुसरी काळावर राज्य करणारी, काळाशी संबंधित. काली मातेचा संप्रदाय बंगालमध्ये अधिक आहे. म्हणूनच ‘काली कलकत्तेवाली’ असे वचन प्रसिद्ध आहे. श्रीरामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे भक्त. त्यांची काली मातेवर अनन्यसाधारण भक्ती होती. भारतीय तत्त्वज्ञान आणि इतर धर्मीय तत्त्वज्ञान एकाच ईश्वराकडे जाणारे मार्ग आहेत हे त्यांचे मत त्यांनी त्यांच्या अनुभवावर घासून घेतले होते. ईश्वराची सेवा करायची असेल तर प्रथम मानवाची सेवा करायला हवी ही त्यांची शिकवण होती. कालिमातेच्या भक्तीद्वारे त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण लोकांना दिली. स्वामी विवेकानंदांनी पारखून घेतलेल्या या गुरूंमुळे दक्षिणेश्वरच्या कालिमातेने एक अजोड स्थान निर्माण केले.
कालीचा सर्वप्रथम उल्लेख सापडतो तो देवी भागवतामध्ये. देवी भागवताचा काळ साधारण ११वे-१२वे शतक. शुंभ- निशुंभांशी लढताना पार्वती काळी झाली असा उल्लेख तिथे सापडतो. देवी माहात्म्याचा काळ तसा विवाद्य आहे. काहींच्या मते, मार्कंडेय पुराणामध्ये अंतर्भूत असलेला हा ग्रंथ ९व्या-१० व्या शतकातला आहे; तर काहींच्या मते तो १६ व्या शतकातला आहे.
कृष्णाभूत्सापि पार्वती।
कालिकेति समाख्याता हिमाचलकृताश्रया।।
मार्कंडेय पुराणात आलेल्या या श्लोकात ‘पार्वती कृष्णवर्णीय झाली. हिमालयात राहणारी कालिका अशी तिची ओळख झाली,’ असे म्हटले आहे. कालरात्रीचा उल्लेख या सर्व ग्रंथांच्या आधी म्हणजे इ.स. घ्या पहिल्या शतकातल्या हरिवंशामध्ये येतो.काली, कालिका किंवा कालरात्री या देवता शक्तीच्या विध्वंसकतेची रूपे आहेत, शक्तीचे हे संहारक स्वरूप आहे. आसुरी शक्तींचा संहार करण्यासाठी पार्वतीने भयंकर स्वरूप धारण केले. शक्ती ही जगज्जननी आहेच, पण दुष्टांचा संहार करण्यासाठी ती भयावह स्वरूपही धारण करू शकते.
तिचे स्वरूप वर्णन करणारे मंत्र पुढीलप्रमाणे आहेत
एकवेणी जपकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी।।
ती एकच वेणी घालते. एक वेणी घालणे हे संस्कृत साहित्यात विरहिणीचे स्वरूप आहे. एक वेणी या प्रतीकाद्वारे शृंगार न करणे ध्वनित केले जाते. पार्वती एरवी ‘रम्यकपर्दिनी’ असते, ती केसांची सुंदर रचना करते. पण तिच्या संहारक वेशामध्ये ती एकवेणीच घालते किंवा तिचे केस मोकळे, पण विखुरलेले असतात. तिच्या कानात कर्णभूषणे असतातच. पण त्यावर ती जास्वंदीची लाल फुलेही घालते. जास्वंदीची लाल फुले स्त्रियांनी वापरू नयेत असा निषेध दिसतो. सती जाणाऱ्या स्त्रिया लाल जास्वंदीची फुले माळतात. प्रसाधनामध्ये जी फुले निषिद्ध ती फुले ती वापरते.ती नग्न असते. गाढव हे तिचं वाहन आहे. तिचे ओठ लांब असतात आणि कान ओघळलेले असतात. तिचे शरीर तेलाने माखलेले असते आणि ती आपल्या डाव्या पायात लोखंडी अणकुचीदार खिळे असलेला पैंजण घालते. ती खरोखरच भयंकर स्वरूप असलेली देवता आहे.
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वच दुर्गा निर्माण झाल्या आहेत. सतत सुंदर दिसणं ही स्त्रीकडून सर्व युगांमध्ये असलेली अपेक्षा काली किंवा कालरात्री पूर्ण करत नाही. इतर दुर्गा दिसायला सुंदर आहेत आणि शिवाय पुरुषांना न जमणारी अचाट कृत्येदेखील करणाऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये वीर कृत्ये करण्याची क्षमता आहे. पण एरवी कोमल दिसणारी, मातेची ममता उरी बाळगणारी स्त्री प्रसंगी भयावह असं उग्र स्वरूपही धारण करू शकते हे कालीच्या, कालरात्रीच्या स्वरूपातून संस्कृतीने जाणवून दिले आहे.लोकधर्मामधून स्वीकारलेल्या या दुर्गादेवतांमध्ये कालिमातेला खूप मोठे स्थान आहे. काली शब्द नावात अंतर्भूत असलेल्या महाकाली, भद्रकाली, इ. ही अनेक देवता आसेतुहिमाचल पूजिल्या जातात. स्त्रीच्या सर्वप्रकारच्या रूपांना संस्कृतीने स्थान दिले आहे.