scorecardresearch

Premium

सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

उर्फीचे व्हिडिओ, दीपिकाच्या बिकिनीवर बंदी घातली तर श्रद्धा वालकरसारख्या घटना थांबणार आहेत का?

urfi javed vs softporn
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

कीर्तनाने समाज सुधारत नाही किंवा तमाशाने समाज बिघडतही नाही ही गोष्ट अजूनही आपल्या ध्यानात आलेली नाही. सध्या एकंदरच मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडी पाहता या वाक्यावरचा विश्वास आणखीन वाढला आहे. एकीकडे चित्रपटात घातलेल्या कपड्याच्या रंगावरून वाद होत आहे तर दुसरीकडे अत्यंत कमी कपडे घातल्याने गदारोळ माजला आहे. दोन्ही गोष्टी तशा वेगळ्या असल्या तरी दोन्ही घटनांमध्ये तीन मुद्दे सारखेच आहेत, महिला, त्यांचे कपडे, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाची मानसिकता. या तिन्हींची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आपल्याला ठाऊक आहेच. यावर बरीच चर्चा झालेली आहे, महिला आयोगानेही या गोष्टीला फारसे महत्त्व दिले नसले तरी गेले काही दिवस सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे सगळं सुरू असताना पुरुषप्रधान समाजातील एक तरुण मुलगा म्हणून यावर व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून जी निरीक्षणं समोर आली ती इथे मांडायचा प्रयत्न करत आहे. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, कुणी कसे कपडे परिधान करावेत, कुणी काय खावं, कुणी कोणाशी संबंध ठेवावे, कुणी काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण समाजात वावरताना आपणसुद्धा त्या समाजाचा एक घटक आहोत हे आपण विसरून चालणार नाही मग ती स्त्री असो की पुरुष हे माझं स्पष्ट मत आहे.

chinese firm hack Indian government data related to immigration
चीनमधून भारतीयांच्या माहितीवर डल्ला?
man kissed baby alligator viral video
तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”
Aadhaar and thumb impression will disappear while searching for property online
प्रॉपर्टीचा ऑनलाइन शोध घेताना आधार, थंब इम्प्रेशन होणार गायब
Gemini Pro 1.5
गुगलने लाँच केले नवे AI मॉडेल जेमिनी १.५; अनेक अवघड कामे होणार सोपी, भारतातही सेवा सुरू

आणखी वाचा : लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

आज उर्फी जावेदवरून वाद पेटला आहे, त्याआधी पूनम पांडे होती, शर्लिन चोप्रा होती, राखी सावंत, ममता कुलकर्णी होती. इतकंच कशाला पुरुषांमध्ये तर मिलिंद सोमणपासून रणवीर सिंग पर्यंत कित्येकांची नावं आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यावेळी कोणत्याही संघटनेला समाजात पसरणाऱ्या विकृतीची जाणीव झाली नाही का? आज उर्फी जावेदच्या व्हायरल व्हिडिओजमुळे देशातील काही महिला नेत्यांना देशातील तरुण पिढीची खासकरून मुलींची काळजी वाटत आहे. पण ह्याच महिला नेत्यांना देशभरात सुरू झालेल्या ढीगभर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रास व्हायरल होणाऱ्या सॉफ्टपॉर्न वेबसीरिजवर काहीही आक्षेप घ्यावासा का वाटत नाही? याबाबतीत हा दुटप्पीपणा का?

उर्फी जावेद आणि तिचे व्हिडिओ हे समाजासाठी घातक आहेत, तसेच हे डिजिटल विश्वसुद्धा तितकंच धोकादायक आहे. या गोष्टीमुळे समाजातील तरुण मुलांवर मुलींवर परिणाम होत आहे ही गोष्ट सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात मला तरी हास्यास्पद वाटते. केवळ उर्फीच कशाला आपण आसपास बघितलं तरी अशी बरीच उदाहरणं सापडतील. निदान मुंबई पुण्यासारख्या मेट्रोसिटीजमध्ये तर अशी बरीच मंडळी दिसतील. मी स्वतः अशा कित्येक महिला आणि पुरुषही पाहिले आहेत ज्यांनी परिधान केलेले कपडे पाहून उर्फी जावेदही लाजेल.

हेही वाचा – “कमी कपडे घालणं हा माझा…” उर्फी जावेदचा मोठा खुलासा

मुळात सध्या आपल्या देशात प्रत्येकाच्या कम्फर्टला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. आपलं वय, आपली शरीरयष्टी, आपला रंग याचा विचार करणं आणि त्या हिशोबाने कपडे परिधान करणं फार कमी झालं आहे. यामध्ये पुरुषही तितकेच पुढे आहेत, त्यामुळे याबाबतीत केवळ महिलांना दोष देणं मला तरी योग्य वाटत नाही.”मला या कपड्यात बरं वाटतं म्हणून मी हे कपडे परिधान करतो/करते” हे सरसकट उत्तर आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांचं म्हणणं बरोबर की चूक हे ठरवायचा अधिकार आपल्याला नक्कीच नाही. निदान कपड्यांच्या बाबतीत तरी आपण एक समाज म्हणून महिलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला जज करणं थांबवलं पाहिजे असं माझं मत आहे. कदाचित बऱ्याच लोकांना हे पटणारही नाही, पण जोवर आपण या मानसिकतेतून बाहेर येणार नाही तोवर एक समाज म्हणून आपण पुढे जाणार नाही असं माझं ठाम मत आहे.

आणखी वाचा : Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

आज उर्फी जावेदचे व्हायरल व्हिडीओ आणि दीपिका पदूकोणच्या बिकिनीवर टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांच्या समाजात श्रद्धा वालकरसारख्या दुर्दैवी आणि क्रूर घटना घडत आहेत, हे खरं ‘नग्न’ सत्य आहे. जर उर्फीचे व्हायरल व्हिडिओ आणि दीपिकाच्या बिकिनीवर बंदी घातली तर या घटना थांबणार आहेत का? राजकीय संघटना याची जबाबदारी घेणार आहेत का? या गोष्टीवर कुणीही बोलणार नाही पण सोशल मीडियावर सगळे मत मांडायला पुढे दिसतात. टेक्नॉलॉजीमुळे आपलं एक्सपोजर प्रचंड वाढलं आणि ते पाहता आज सोशल मीडियावर या गोष्टीबद्दल बिनधास्त मत ठोकणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांच्या मोबाईलची ब्राऊजिंग हिस्टरी तपासली तर कोण किती धुतल्या तांदळाचा दाणा आहे आणि कोण किती विकृत आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे या गोष्टीवरून वाद उत्पन्न करणं आणि महिलांना उद्देशून सल्ले देणं हे समाजाने आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजू पाहणाऱ्या संघटनांनी थांबवलं पाहिजे, आणि लेखाच्या सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे कीर्तनाने कोणताही समाज सुधारत नाही तसंच तमाशाने तो बिघडतही नाही. हे सत्य जोवर आपण मान्य करत नाही तोवर हे असंच चालत राहणार!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Objection on urfi javed clothes but no objection on softporn industry avn

First published on: 08-01-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×