तन्मयी तुळशीदास बेहेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माननीय राज्यपाल कोश्यारीजी,
तुम्ही आमच्याच दैवतांविषयी वादग्रस्त विधाने करून उभा महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. तुमच्यासारखी जाणकार व्यक्ती राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली असताना तुमच्याबद्दल आदर वाटण्याऐवजी प्रत्येक भाषणात तुम्ही जी खोडसाळ वक्तव्यांची आतषबाजी करता त्याने माझं मन अधिकच उद्विग्न होतं. खरं तर, राज्यघटनेनेच राज्यपालांना राज्यघटनेच्या रक्षणाचे अधिकार दिले आहेत पण आता, तुमची अशी वादग्रस्त विधाने ऐकून असं वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘घटनाधिष्ठित भारता’चा आब तुम्ही राज्यपाल म्हणून कसा राखाल?

आणखी वाचा : महिलांचा राजकारणातला सहभाग वाढणार तरी कधी? 

कोश्यारीजी, महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंविषयी तुम्ही केलेलं वक्तव्यही तेवढंच आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे राज्यपाल असून तुम्हाला आमचा इतिहासच माहीत नसेल तर यापेक्षा दुःखद गोष्ट ती कोणती? तुम्ही म्हणालात, “विवाहाच्या वेळी सावित्रीबाईंचं वय १० वर्षे आणि ज्योतिबांचं वय १३ वर्षे होतं. या वयात मुलगा-मुलगी काय विचार करत असतील?” कोश्यारीजी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिकलेल्या स्त्रीने सकाळी उठून आधी ज्योतिबांचे आणि सावित्रीबाईंचे स्मरण केले पाहिजे असे संस्कार आमच्यावर शालेय जीवनापासून झाले आहेत, त्यामुळे मला तुमचे उद्गार ऐकून तुमचीच कीव करावीशी वाटली.

तुमच्या वाचनात आलं असेलच… नाहीतर मी सांगते, त्या काळात बालविवाहाचीच प्रथा होती. १८४८ मध्ये पुण्यात भिडेवाड्यात वयाच्या २१ व्या वर्षी मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या युगपुरुषाविषयी तुमचे उद्गार अगदीच उथळ आहेत. याच ज्योतिबांनी पुढे १८५५ मध्ये मुलींसाठी रात्रशाळा काढली. दीडशे वर्षांपूर्वी अशी रात्रशाळा काढणे सोपे असेल का हो? मुलींसाठी काढलेली पहिली शाळा वर्षभरातच बंद पडली, तर या रात्रशाळेची काय कथा? शाळेत शिकवायला शिक्षिका मिळेना म्हणून ज्योतिबांनी आपल्या पत्नीलाच शिकवले आणि सावित्रीबाईंनी शिकवायला जायला सुरुवात केली. अर्थात हे कथित संस्कृतीरक्षकांना कसे चालणार? सावित्रीबाई शाळेत निघाल्या की लोक त्यांच्यावर चिखल फेकत, कचरा टाकत, एवढंच काय थुंकतसुद्धा, पण तरीही त्या मागे हटल्या नाहीत. काय निर्धार असेल त्या माऊलीचा?

आणखी वाचा : केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

त्याच रस्त्याने जाऊन, मुलींना त्याच रूढी परंपरांच्या चिखलातून शिक्षणाच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम त्यांनी सर्व अवहेलना सहन करून आयुष्यभर केलं. डोळ्यासमोर आणा, कंदिलाच्या उजेडात लिहिणारे चिमुकले हात आणि फळ्यावर त्यांना ‘ग म भ न’ शिकवणाऱ्या सावित्रीबाई… माझ्या शरीरावर तर रोमांच उभे राहतात… “स्त्री ‘सती’ जाते, तसा पुरुष ‘सता’ का जात नाही?” सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात जेव्हा ज्योतिबांचे समाजाच्या दांभिकतेवर ताशेरे ओढणारे हे विचार वाचले तेव्हा वाटलं, काय हिम्मत लागत असेल असे विचार मांडण्यासाठी? किती खोल विचार केला असेल ज्योतिबांनी सती प्रथेचा? पुरुषप्रधान समाजाने किती विरोध केला असेल त्यांना? बालवयात मुलीचं तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाबरोबर लग्न करून द्यायची प्रथा त्या काळात रूढ होती. वृद्ध नवऱ्याचे निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला बळजबरीने सती जायला लावणाऱ्या या काळात “पुरुष ‘सता’ का जात नाही?” विचारणारे एकतरी ज्योतिबा होते म्हणूनच महाराष्ट्राची समाजसुधारणांच्या दिशेने वाटचाल झाली, नाहीतर महाराष्ट्रही इतर मागासलेल्या राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसला असता.

कोश्यारीजी, कल्पना करा की तहानेने तुमचा जीव कासावीस झाला आहे. समोर विहीर आहे, पण फक्त तुमची जात उच्च नाही म्हणून तुम्हाला पाण्याचा एक घोटसुद्धा मिळणं मुश्किल होतं. तेव्हा तुम्हाला कळेल की पाण्याचा अधिकारही नाकारलेल्या दलित समाजाला स्वतःच्या घरची विहीर खुली करून देणं हे किती अलौकिक आहे. एक फुले दाम्पत्य विरुद्ध सगळा समाज. आयुष्यभर अशा परिस्थितीला तोंड देणं किती तणावपूर्ण असेल? तरीही सतत समाजाच्या हिताचा विचार करून सुधारणांचे नवे आयाम देणासाठी द्रष्टेपणा लागतो, विचारांचा ठामपणा लागतो, समाजव्यवस्थेच्या मूलगामी अभ्यासाबरोबरच प्रस्थापितांच्या व्यवस्थेला शह देण्यासाठी एक बंडखोर स्वभावही लागतो. हे सगळं ज्योतिबा आणि सावित्रीबाईंकडे होतं म्हणून त्यांनी १९ व्या शतकात समाजात जे अनिष्ट आहे, अमंगल आहे त्याविरुद्ध लढा दिला आणि म्हणूनच आज आपण समानतेच्या गप्पा मारू शकतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?

त्यांनी महाराष्ट्रातील लेकीबाळींना शिक्षणाच्या वाटेवर चालायला लावून आत्मनिर्भर केले. त्यातून आता एखादी महाराष्ट्रकन्या प्रतिभा पाटील राष्ट्राच्या सर्वोच्चपदावर विराजमान होते, एखादी अंजली वेदपाठक लक्ष्याचा अचूक वेध घेऊन जागतिक नेमबाजीत आपले नाव कमावते. एखादी अंतरा फायटर पायलट होवून आकाशाला गवसणी घालते. एखादी तेजस परुळेकर यशस्वी उद्योजिका होते. या मुलींना कर्तृत्वाची शिखरे सर करताना पाहून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा ऊर अभिमानाने भरून येत असेल. जोपर्यंत महाराष्ट्रातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्तेने आपले अस्तित्व सिद्ध करतील तोपर्यंत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचे महाराष्ट्रावर ऋण राहतील.

कोश्यारीजी, ‘ते’होते म्हणून आम्ही आहोत. आम्हाला आमची ओळख त्यांनी मिळवून दिली. आई बाबा संस्काराने जसे आपल्या मुलांना घडवतात तसं त्यांनी आम्हाला घडवलंय. आमच्यासाठी ते ज्योति‘बा’ आणि सावित्री ‘आई’च आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना कृपया आदरपूर्वकच बोला!
tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open letter to governor bhagat singh koshyari we daughters of jyotiba and savitribai social reforms maharashtra vp
First published on: 15-12-2022 at 16:31 IST