चारुशिला कुलकर्णी
पाणीटंचाई, उन्हामुळे रुक्ष परिसर, आरोग्याच्या तक्रारी या कारणांमुळे उन्हाळा नकोसा वाटत असताना डोंगरी आदिवासीबहुल भागात मात्र उन्हाळ्यात येणाऱ्या मोहाच्या फुलांमुळे स्थानिकांना तो हवाहवासा वाटतो. मोहाच्या फुलांपासून तयार करण्यात येणारी वैविध्यपूर्ण पेये, पदार्थांमुळे उन्हाळा आदिवासी बांधवांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. नाशिक जिल्ह्यातील श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेने मोहाच्या फुलांपासून बेकरी उत्पादनासह अन्य खाद्यपदार्थ तयार केली आहेत. या माध्यमातून ३०० पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असला तरी विपणन तसेच उत्पादनाला बाजारपेठ मिळविणे, ही संस्थेसमोर समस्या आहे. विशेष म्हणजे मोहाची फुले आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. मोहाच्या फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते सर्दी, खोकला, सांधेदुखी आणि त्वचारोगांवर उपयुक्त आहेत.
मोहाच्या फुलांचा उपयोग केवळ मद्यासाठी केला जातो, इतपतच अनेकांना माहिती असते. मोहाच्या फुलांपासून इतरही पदार्थ तयार करण्यासाठी श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील हरसूल, पेठ परिसरातील गावंद, पडवळीपाडा, पळशी, खर्डेपाडा, बर्डेपाडा, आंबेटी या ठिकाणी संस्थेच्या वतीने ८० हून अधिक बचतगटाच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही महिलांना मोहफुलांपासून खाद्यपदार्थ तयार करण्याचे शिकविण्यात आले. मोहाच्या फुलापासून गुलाबजाम, शंकरपाळे, लाडू कसे करावेत, हे संस्थेच्या प्रमुख माया खोडवे यांनी स्वत: घरी तयार करून पाहिले. पदार्थ प्रयोगशाळेत पाठवून त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते पदार्थ कसे तयार करावेत, हे इतर महिलांना शिकविले. तीन वर्षांपासून यावर काम सुरू असताना आता भरडधान्य आणि मोहाचा वापर करत बेकरी उत्पादने तयार करण्यात आली असल्याचे मायाताई यांनी सांगितले. भरडधान्यातून नागली बिस्किट, गहु-महुआ टोस्ट, कुकीज असे पदार्थ आता प्रशिक्षक महिलांना शिकवित आहेत. या उत्पादनाला ‘मुक्ताई’ हे नाव देण्यात आले असून यातील काही पदार्थ नाशिक येथील बेकरीत विक्रीसाठी ठेवण्यात आले. या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत असून हक्काचे पैसे उपलब्ध होत आहे.
शासकीय पातळीवर भरडधान्याचा जागर होत असताना सामाजिक स्तरावर मात्र भरडधान्य आणि मोहाच्या फुलांविषयी माहिती देताना अडचणी येत असल्याची खंत व्यक्त केली. खवय्यांना भरडधान्य आणि मोह यांच्यापासून एकत्रित पदार्थ तयार होतात, याविषयी साशंकता आहे. व्यवसाय वृध्दीसाठी काही कर्ज काढले असून हरसूल येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बचत गटातील महिला उन्हाळा सुरू झाल्या पासून कामाला लागल्या आहे. यासाठी अन्य सामाजिक संस्थाच्या मदतीने या महिलांना मोहाची फुले गोळा करण्यासाठी पाट्या दिल्या आहेत. शहरी लोकांना आवश्यक असलेले हायजेनिक पध्दतीनुसार हे बेकरी पदार्थ व अन्य खाद्य पदार्थ तयार करण्यात येत आहे. या मध्ये अन्य काही नाविन्यता आणता येईल का? यावर संशोधन सुरू आहे.