मंगल कातकर
भाषा हे माणसाच्या संप्रेक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. भाषिक आदानप्रदान करत माणसं आपापलं दैनंदिन आयुष्य जगत असतात. शिक्षणानिमित्त, कामानिमित्त कधी कधी हे भाषिक आदानप्रदान दुसऱ्या भाषकांबरोबरही सहज होत असतं. त्यातूनच माणसं एकमेकांचे आचारविचार, साहित्य, संस्कृती जाणून घेतात. एकमेकांना आपापल्या भाषेची गोडी लावतात. हे भाषिक आदानप्रदान जितकं सहज होईल तितकं चांगलं आणि त्या दोन व्यक्तींना अधिक समृद्ध करणारं ठरतं. भाषेच्या बाबतीत माझ्या व माझी जवळची मैत्रिण डॉ. जया आनंद हिच्या आयुष्यात असचं काहीसं घडलं आहे.
माझं सगळं शिक्षण मुंबईत झालं असलं तरी हिंदी भाषेशी म्हणावी तशी जवळीक कधी झाली नव्हती. ‘मेरे को… तेरे को…’ वाली बंबईया हिंदी ओठांवर असायची. वीस वर्षापूर्वी मी एका नवीन सुरू झालेल्या डी.एड. महाविद्यालयात काही महिने शिकवायला जात होते. त्यावेळी तिथल्या हिंदीमय वातावरणात मराठी भाषिकांना दिला जाणारा दुजाभाव बघून माझ्या मनात हिंदी भाषेविषयी कटुता निर्माण झाली होती. याचा परिणाम असा झाला की, मी त्या कालावधीत हिंदीत बोलणं टाळायला लागले. एकदा तर एका मुलाखतीत मला हिंदीतून प्रश्न विचारला असताना मी रागात “ मै मराठी बोलू?” असं हिंदीत ठणकावून मी चक्क मराठीत उत्तर दिलं होतं. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या लोकांनी मला पुढचा प्रश्न न विचारता मुलाखत तिथेचं संपवली होती. नंतर मला माझी चूक लक्षात आली, पण वेळ हातातून निघून गेली होती. थोडक्यात काय तर काही व्यक्तींच्या चुकीच्या वागण्याचे खापर मी हिंदी भाषेवर फोडत होते. ही चुकीची धारणा डॉ. जया आनंद हिच्याशी मैत्री झाल्यावर बदलली. गेल्या अठरा वर्षांपासून आमची मैत्री आहे. तिच्यामुळेच हिंदी भाषेशी मी नव्याने जोडले गेले.
जया पी.एच.डी. असूनही माझ्याबरोबर काही वर्षापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी शिकवत होती. आम्हा दोघीचं आपापल्या भाषेवर प्रेम, साहित्याची आवड, विचारात स्पष्टता, अभ्यासू वृत्ती यांसारख्या गुणांमुळे आमची मैत्री घट्ट झाली. आमच्या गप्पांमध्ये बऱ्याचदा हिंदी आणि मराठी साहित्य असायचं. मी तिला महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख करून दिली, तर तिनं मला उत्तर भारतीय संस्कृतीची माहिती करून दिली. मराठी लोक गणेशोत्सवात आपल्या घरी गणपती आणतात हे तिला इतकं आवडलं की तिनं माझ्याकडून गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंतचे सगळे सोपस्कार समजून घेऊन आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करायला सुरुवात केली. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती स्वत: शिकून तिनं आपल्या घरच्यांनाही शिकवली. दरवर्षी गणपतीत त्यांच्या घरात ही आरती आजही म्हटली जाते.
जया कथा, कविता लिहीत असल्यानं मी लिहितं व्हावं यासाठी मला ती नेहमी प्रोत्साहन देत असायची. तिच्या प्रोत्साहनानं मी कथा लिहू लागले. अगदी सुरुवातीला मी मराठीत लिहिलेल्या कथा तिला वाचायला लावून तिच्याकडून अभिप्राय घ्यायचे. तीही तिचं हिंदी लेखन मला वाचायला देऊन माझं मत जाणून घ्यायची. तिच्याबरोबर राहून माझी हिंदी भाषा सुधारली. तिच्या मार्गदर्शनामुळेच मी दोन वर्षं चक्क हिंदी भाषा शिकवू शकले. तिच्याच प्रयत्नांमुळे आम्ही दोघींनी बरेच चर्चात्मक हिंदी कार्यक्रम मुंबई आकाशवाणीच्या ‘संवादिता’ वाहिनीवर सादर केले. मी जयाबरोबर आवर्जून हिंदी कार्यक्रमांना जाते आणि जयामही माझ्यासोबत प्रत्येक मराठी कार्यक्रमांना उपस्थित असते. जयाला मराठीतलं उत्तम साहित्य हिंदीत अनुवादित करायचं आहे. जेणेकरून हिंदी भाषकांना मराठीतलं उत्तम साहित्य वाचायला मिळेल असं तिला वाटतं.
जयामुळे जशी माझी हिंदी भाषेची समज वाढली, तशी जयाची मराठी भाषेची जवळीक वाढली असं ती आपुलकीनं सांगते. तिनं मराठीतलं वाचन वाढवलं. आमच्या महाविद्यालयातील मराठी वाड्.मय मंडळाच्या कार्यक्रमात मराठी कविता, गाणी सादर करून ती आपलं मराठीवरचं प्रेम दर्शवत असते.
हिंदी व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मैत्रिणींना एकत्र घेऊन आम्ही दोघींनी ‘ अष्टवामा’ नावाचा समूह कथासंग्रह काढला. ज्यात चार मराठी व चार हिंदी लेखिका आहेत. प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांची कथासंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. असं क्वचित दिसणारं भाषिक सौहार्द आमच्या दोघींच्या मैत्रीमुळे साहित्यातही उमटलं.
भाषा ही माणसांना जोडण्यासाठी असते. आपण ज्या प्रांतात राहतो त्या भाषेचा सन्मान आपण आपल्या मातृभाषेबरोबर करणे गरजेचे आहे. भाषेमुळे नवीन नातं जोडता येऊ शकतं, एकमेकांच्या भाषिक जाणिवा वाढवून भाषिक सौहार्द निर्माण करता येऊ शकतो हे आम्हा दोघींमुळे नक्की विचारात घेता येईल…
mukatkar@gmail.com