scorecardresearch

महिलांचे विकार आणि आहार- ‘एजिंग’ म्हणजे नेमकं काय?

‘तारुण्य’ म्हणजे हवाहवासा वाटणारा आयुष्यातील एक सुंदर टप्पा! निसर्गाचा अत्युच्च अविष्कार! विकसित शरीर व मनाचं मोहक वळण म्हणजे तारुण्य. अर्थातच, सर्वांची आवडती अशी ही एक अवस्था. या अवस्थेचा कालावधी मर्यादित आणि ठरावीक असतो. निसर्गचक्रानं आखून दिल्याप्रमाणं हे तारुण्य येतं आणि तसंच चोरपावलानं कधी निघून जातं, हे आपल्या लक्षातही येत नाही.

महिलांचे विकार आणि आहार- ‘एजिंग’ म्हणजे नेमकं काय?
आहार व विहारातील बदल पित्ताच्या विकारावर रामबाण उपाय ठरू शकतो

डॉ. सारिका सातव

‘एजिंग’म्हणजेच वयं होणं किंवा वाढणं याबद्दल साध्या शब्दात सांगायचं झालं तर, ‘काळानुसार झालेला शरीरातील बदल’. यात फक्त म्हातारपण अपेक्षित नसून इथे ती प्रक्रिया अपेक्षित आहे, जी अगदी जन्मापासून सुरू होते आणि मरणांतीच थांबते. फक्त काळावर अवलंबून नसलेली ही प्रक्रिया अतिशय गुंतागुतीची असून अजूनही शास्त्रज्ञांसाठी मोठंच गूढच आहे. प्रत्येकाचा या प्रक्रियेचा वेग किंवा तीव्रता ही अतिशय वेगवेगळी असते. सुरुवातीच्या काळात ‘एजिंग’ प्रक्रिया कदाचित फक्त आनुवंशिकतेवर (जेनेटिक) अवलंबून असेल असं मानलं गेलं. त्यामुळे समान गुणसूत्रं असलेल्या लोकांमध्ये ही प्रक्रिया कदाचित समान असते, असं मानलं गेलं. पण नंतर शास्त्रज्ञांनी अगदी समान गुणसूत्रं असलेल्या काही लोकांचा अभ्यास केला. उदाहरणार्थ, जुळी मुलं (आनुवंशिकेनुसार अगदी समान) पण या व्यक्तींमध्येही आनुवंशिकीय समानता असूनही या प्रक्रियेची गती आणि तीव्रता वेगवेगळी होती. कारण त्यांची जीवनशैली आणि सवयी या वेगवेगळ्या होत्या.

आणखी वाचा : मनाचा तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त आसन

माणसाची ‘एजिंग’ प्रक्रिया ही आनुवंशिकतेबरोबरच त्याची जीवनशैली त्याच्या सवयी आणि काही बाह्य कारणे म्हणजे १) आहार २) व्यायाम ३) औषधं ४) धुम्रपान ५) मानसिक ताणतणाव ६) सूर्यकिरणांचा प्रभाव इत्यादींवर अवलंबून असते. ‘एजिंग’ प्रक्रिया समजण्यासाठी शास्त्रज्ञांनी ३०० पेक्षा जास्त सिद्धांत मांडले. त्यातीलच एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ‘मुक्त मूलगामी सिद्धांत’ (दी फ्री रॅडिकल थिअरी). ‘हार्मन’ नावाच्या शास्त्रज्ञानं मांडलेला हा सिद्धांत सांगतो की, शरीरातील फ्री रॅडिकलमुळं (मुक्त पेशी समूह) जी हानी होते त्याला ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’ म्हणतात आणि हेच ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’ एजिंगला कारणीभूत ठरते.

आणखी वाचा : थायरॉइडसाठी उपयुक्त योगासन

फ्री रॅडिकल म्हणजे काय?

फ्री रॅडिकल हा एक प्रकारचा अस्थिर पदार्थ आहे. जो रोजच्या पेशींच्या कार्यामध्ये नैसर्गिकपणे तयार होतो किंवा रोजच्या खाण्या -पिण्यामधून शरीरात प्रवेश करतो. जोडीमध्ये असणारा इलेक्ट्रॉन जेव्हा एकटा असतो तेव्हा तो अस्थिर असल्यानं शरीरातील कुठल्याही पेशीबरोबर (उदा. कर्बोदके, प्रथिने, लिपिड्स, डीएनए इत्यादी.) संयुक्त होऊन स्थिर होण्याचा प्रयत्न करतो; पण तयार होणारा पदार्थ अनैसर्गिक असल्यानं ज्या पेशीबरोबर तो संयुक्त होतो, त्या अवयवाला तो हानी पोहचवतो यालाच ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’ म्हणतात.

फ्री रॅडिकल तयार होण्याची बाह्य कारणं अवगत असणं खूप गरजेचं आहे.
१) आहारीय २) उसर्जित किरणे ३) वातावरणाचा परिणाम ४) मद्यपान, धुम्रपान इत्यादी.

आणखी वाचा : पीसीओडी आनुवंशिक आहे का?

आहारासंदर्भातील कारणे थोडी विस्तृतपणे पाहूयात,
(१) अन्न साठवणं, शिजवणं किंवा इतर विविध प्रक्रियांमध्ये फ्री रॅडिकल तयार होतात.
(२) खाण्याचं तेल उष्णता, हवा, प्रकाश इत्यादी घटकांच्या संपर्कात आल्यानं फ्री रॅडिकल तयार होतात. उदाहरणार्थ, बटाटे, वड्यांसाठी वापरलं जाणारं तेल सतत गरम करून परत परत वापरलं जातं.
(३) प्रक्रिया केलेलं अन्न दीर्घकाळ टिकतं; पण त्यांच्यात संरक्षक (प्रीझर्व्हेटिव्ह) जास्त असतात. एखादी प्रक्रिया केलेला पदार्थ शिजविला जातो, तेव्हा त्यातील संरक्षक (प्रीझव्हेटिव्ह) सगळ्यात आधी ऑक्सिडाइज होतात आणि फ्री रॅडिकल्सची निर्मिती जास्त प्रमाणात होते.
(४) जास्त प्रमाणात जास्त वेळा केलेलं मद्यपान लिव्हरमध्ये खूप साऱ्या ऑक्सिडेटिव रिॲक्शनला जन्म देतं आणि फ्री रॅडिकल्सची निर्मिती जास्त प्रमाणात होते.

शरीराची नैसर्गिक उपाययोजना
फ्री रॅडिकल्स अनेक मार्गांनी सतत तयार होत राहतात त्याचप्रमाणं शरीराची त्यांच्याशी लढण्याची एक उपाययोजना कायम तयार असते. स्थैर्य राखण्यासाठी शरीर कायम प्रयत्नशील असतं. तयार होणारे फ्री रॅडिकल्स बऱ्याच वेळेला शरीरातील इतर काही प्रक्रियांसाठी खर्ची पाडले जातात. उरलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी एक योद्धा कायम तयार असतो, तो म्हणजे ‘अँटिऑक्सिडेंट’ हा असा पदार्थ आहे जो; आपल्या जवळील काही विशेष गुणधर्मानं फ्री रॅडिकल्सला नेस्तनाबूत करतो आणि पुढची हानी टळते किंवा लांबवली जाते. यामुळे अनेक महत्त्वाच्या पेशी वाचविल्या जातात.

आणखी वाचा : ‘डिझायनर व्हजायना’ म्हणजे काय?

अँटिऑक्सिडेंटचे ही प्रामुख्याने दोन गट पडतात.
(१) जे शरीरात तयार होतात. उदाहरणार्थ, ग्लुटॅथिओन
(२) बाहेरून शरीरात आहाराद्वारे येतात. उदाहरणार्थ, अ जीवनसत्व, क जीवनसत्व, इ जीवनसत्व, सेलेनियम इत्यादी

अँटिऑक्सिडेंटपासून संरक्षणाच्या तीन पातळ्या
(१) प्रथम संरक्षण पातळी- फ्री रॅडिकल्स तयार होऊ न देणे. (२) द्वितीय संरक्षण पातळी तयार झालेल्या फ्री रॅडिकल्सला नेस्तनाबूत करणे.
(३) तृतीय संरक्षण पातळी- झालेली हानी भरून काढणे. शत्रू कुठल्याच बाजूने आपल्यावर वरचढ होऊ नये, म्हणून ही सर्व तयारी केली जाते.

ऑक्सिडेटिव ताण

तयार होणारे फ्री रॅडिकल्स आणि त्यांचा नाश करून आपल्याला वाचवणारी यंत्रणा यांचा ताळमेळ न बसणे म्हणजे ‘ऑक्सिडेटिव ताण’ होय. त्यातूनच कर्करोग, हृदयविकार, संधिवात, मधुमेह, किडनीचे विकार, अल्झायमर्स, पार्किनसन्स, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर (मनोविकार), मोतीबिंदू इत्यादी अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. म्हणजे एजिंग प्रक्रियांमधून सुरू झालेलं हे सगळं पुढे जीवघेण्या वळणावर जाऊ शकतं.

dr.sarikasatav@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is ageing how to avoid it through diet antioxidant vp

ताज्या बातम्या