Adoption Leave For Women in India : आसाम सरकारने राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची दत्तक रजा (Adoption Leave For Women) जाहीर केली. आसामच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविषयी माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा म्हणाले, केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम १९७२ च्या नियम ४३ बी नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. १ वर्षाखालील दत्तक घेतलेल्या मुलांची योग्य काळजी आणि पोषण मिळावे यासाठी मंत्रिमंडळाने ही तरतूद केली आहे. त्यानुसार, आसाम सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची दत्तक रजा मंजूर करण्यात आली आहे.

“या निर्णयामुळे राज्य सरकारच्या अशा महिला कर्मचार्‍यांना फायदा होईल ज्यांनी १ वर्षाखाली मुले दत्तक घेतली आहेत आणि त्याची काळजी घ्यायची आहे”, असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> महिलांना मिळणार एक वर्षाची प्रसुती रजा, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय; पितृत्व रजेतही वाढ!

नोंदणी आणि प्रत्यक्षात दत्तक संख्येत तफावत

दत्तक नियमांवरील नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने केंद्र सरकारचे प्रतिनिधी महाअधिवक्ता ऐश्वर्या भाटी यांनी देशात नोंदणी आणि दत्तक घेतलेल्या मुलांच्या संख्येत तफावत असल्याचं उघड केलं होतं. भाटी यांच्या मते २०२१ ते २०२३ दरम्यान हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा अंतर्गत १९ हजार ४२४ मुले दत्तक घेण्यात आली. तर, २०२३-२४ मध्ये केंद्रीत दत्तक संसाधन प्राधिकरणमार्फत ४ हजार २९ मुले दत्तक घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, अरुणाचल प्रदेश यासह १३ भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना न्यायालयाच्या मागील आदेशानंतर ३० ऑगस्टपर्यंत विशेष दत्तक संस्था स्थापन करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा >> दत्तक प्रक्रियेत ‘कन्यारत्नाला’ पसंती

दरम्यान, आसाम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पालक किंवा सासरच्यांबरोर वेळ घालवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये दोन दिवसांची विशेष प्रासंगित रजा देखील दिली आहे.

भारतात दत्तक रजा योजना काय आहे? (What is Adoption Leave For Women in India?)

बालदत्तक योजनेत केंद्र सरकारकडून किती दिवसांची सुट्टी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रसूती लाभ कायद्यातील सुधारणांमध्ये ३ महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी १२ आठवड्यांची दत्तक रजा (Adoption Leave For Women) दिली जाते. हीच तरतूद सरोगसीद्वारे मूल जन्माला घालणाऱ्या (म्हणजेच सरोगसीद्वारे जन्मलेलं मूल सांभाळणाऱ्या) पालकांनाही लागू होते. ज्या दिवसापासून अर्जदाराकडे हे मूल दिले जाते त्या दिवसापासून ही रजा लागू होते.

Read More on Adoption Leave For Women >> दत्तक घेतलेले मूल परत केले जाऊ शकते? नियम काय संगतात?

मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया काय?

संभाव्य दत्तक पालकांनी (पीएपी) केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (सीएआरए) वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे: http://www.cara.nic.in.

त्यानंतर यात आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्यांच्या परिसरात असणारी सरकारद्वारे मान्यताप्राप्त बाल संगोपन संस्था निवडणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्याने संभाव्य दत्तक पालक योग्य असल्याचे ठरवल्यानंतर, ते थेट पोर्टलवरून दत्तक घेण्यासाठी मूल निवडू शकतात. संभाव्य दत्तक पालक प्राधान्यक्रमानुसार तीन राज्यांची यादी करू शकतात. जम्मू आणि काश्मीर वगळता कोणत्याही राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मुले दत्तक घेऊ शकतात.

संभाव्य दत्तक पालक (पीएपी) निवडलेल्या संस्थेकडे जाऊन दत्तक घेण्यापूर्वी मुलांचे पालनपोषण सुरू करू शकतात. पीएपीने मुलाला दत्तकपूर्व फॉस्टर केअरमध्ये स्वीकारल्याच्या सात दिवसांच्या आत दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाल संगोपन संस्था याचिका दाखल करते. पीएपीला कोणत्याही कारणास्तव मूल परत करायचे असल्यास, संस्थेने अंतिम दत्तक घेण्यासाठी याचिका दाखल केली असली तरीही परत करता येते. परंतु जर अंतिम दत्तक घेण्याचा आदेश पारित झाला असेल तर मुलाला परत करता येईल की नाही हे ठरण्याचा अधिकार न्यायालयाला असतो.