Who Is Qamar Sheikh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर गेल्या ३० वर्षांपासून कमर शेख राखी बांधत आहेत. स्वतःच्या हाताने तयार केलेली राखी त्या दरवर्षी बांधतात. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानात जन्मलेल्या आणि लग्नानंतर भारतात स्थायिक झालेल्या या कमर शेख दरवर्षी दिल्लीत जाऊन मोदींच्या हातावर राखी बांधतात. यंदा १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. त्यानिमित्ताने त्या यंदाही तितक्याच उत्साहाने तयार झाल्या आहेत.

कोण आहेत कमर शेख?

कमर शेख यांचा जन्म कराचीमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. १९८१ मध्ये मोहसिन शेख यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेव्हा त्या स्थलांतरित होऊन भारतात स्थायिक झाल्या. शेख या १९९० पासून गेली ३५ वर्षे पंतप्रधान मोदींच्या संपर्कात आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानतात. सोमवारी, १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. साहजिकच शेख यांनी आठ ते दहा राख्या तयार केल्या आहेत. याबाबत आज तकला दिलेल्या माहितीत त्या म्हणाल्या, “मी दरवर्षी रक्षाबंधनापूर्वी माझ्या स्वत:च्या हातांनी अनेक राख्या बनवते आणि सर्वांत जास्त आवडणारी राखी मोदींच्या हातावर बांधते. गेल्या तीस वर्षांपासून मी त्यांना राखी बांधत आहे.

“या वर्षी मी जी राखी तयार केली आहे, ती मी मखमलीवर बनवली आहे. मी राखीमध्ये मोती, धातुचं भरतकाम आणि टिकली वापरली आहे”, असंही वर्णन त्यांनी राखीबाबत केलं. त्या स्वतः दरवर्षी मोदींची भेट घेऊन राखी बांधतात. परंतु, करोना काळात २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये त्यांनी मोदींच्या हातावर राखी बांधली नाही. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी पतीबरोबर दिल्लीला जाऊन राखी बांधली होती. या वर्षीही, शेख यांना रक्षाबंधन सोहळ्यासाठी आमंत्रण मिळण्याची आशा आहे. बहीण या नात्याने ती आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >> Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे चर्चेत आलेल्या माधबी पुरी बुच कोण? मुंबईत घेतलंय प्राथमिक शिक्षण, तर चीनच्या बँकेतही होत्या सल्लागार!

नरेंद्र मोदी आणि कमर शेख यांची भेट कुठे झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट १९९० साली गुजरातचे तत्कालीन राज्यपाल दिवंगत डॉ. स्वरुप सिंग यांच्यामार्फत झाली होती. विमानतळावरून निघालेल्या सिंग यांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी नरेंद्र मोदीही तेथे उपस्थित होते. सिंग यांनी तेव्हा नरेंद्र मोदींना कमर शेख यांना आपली मुलगी मानत असल्याचे सांगितले होते. हे ऐकून पीएम मोदींनी उत्तर दिले की, यापुढे कमर शेख त्यांची बहीण असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तेव्हापासून मी रक्षाबंधनाच्या सणाला त्यांना राखी बांधत आहे”, अशी आठवणही त्यांनी सांगितली. शेख जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा पंतप्रधान मोदी केवळ संघाचे कार्यकर्ता होते. “मी त्यांना एकदा म्हणाले की, मी प्रार्थना करते की एक दिवस तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री व्हाल, हे ऐकून त्यावेळी मोदी हसले होते”, असंही त्यांनी सांगितलं. “जेव्हा माझी इच्छा प्रत्यक्षात आली, तेव्हा रक्षाबंधनाच्या नंतरच्या भेटीत त्यांनी मला विचारले की आता मी माझ्या भावासाठी काय इच्छा केली आहे? त्यावेळी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना मी करत होते”, असंही शेख यांनी सांगितले. “मी भाग्यवान आहे की माझी इच्छा मान्य झाली आहे. आज ते सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.