“रश्मी,तू काय ठरवलं आहेस? संजय तुझ्याकडे येणार आहे की तू त्याच्याकडे जाणार आहेस?”

“सुचित्रा, तू मला हा प्रश्न का विचारते आहेस? गेली पाच वर्षं आम्ही राखी पौर्णिमा साजरी केलेली नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे, मग पुन्हा का विचारते आहेस?”

“रश्मी, संजयला तू राखी बांधत नाहीस याचं त्यालाही खूप वाईट वाटतं. या वर्षी तरी आता राग सोडून दे.”

“सूची, मी त्याच्यावर रागावले असले तरी त्यानं तरी माझ्याकडं यायला हवं होतं. कधीतरी मला समजावायला आला का? तो ही इगो धरून बसलाच ना?’ मीच का त्याच्या पुढं पुढं करायचं?”

“रश्मी, त्याच्याशिवाय तुला तरी कोण आहे? भावंडांमध्ये असा राग बरा नाही, त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची बायको तुला काही बोलली त्यामुळं तुझा अपमान झाला. एवढीशी गोष्ट मनात ठेवून तू संजयकडं जाणं बंद केलंस?”

“ ती एवढीशी गोष्ट नव्हती. त्यानं माझं काहीही ऐकून न घेता त्याची बायको कशी बरोबर आहे हे सांगून  मलाच गप्प केलं. बायकोच्या बाजूनं बोलून त्यानंही माझा अपमानच केला. ही गोष्ट मी कशी विसरेन?”

हेही वाचा >>>Sudha Murthy : “बहीण आपल्या भावासाठी कितीही…”, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुधा मूर्तींनी सांगितली कहाणी!

“ रश्मी, जवळच्या नात्यात असं बऱ्याच वेळा घडतं. आपल्या अपेक्षेप्रमाणे समोरची व्यक्ती वागत नाही त्यावेळी मान-अपमानाच्या गोष्टी मनात ठेवून आपण नातंच तोडायला जातो.’ ‘तो माझ्याशी तसं वागला’, ती मला तसं बोलली’ असलं काहीतरी मनात ठेवून आपलीच माणसं आपण दूर करतो. मनातील राग, संताप द्वेष वाढवत राहतो. ‘आपलंच चुकतंय’

‘एवढं ताणून धरायला नको’ असं एक मन सांगत असतं पण अहंकारामुळे ‘मीच का माघार घ्यायची? हे दुसरं मन म्हणत असतं यामुळं आपल्याच मनातील द्वंद्व आपण वाढवत राहतो. रश्मी, तू सांग संजयशी नातं तोडण्यात तुला खरंच आनंद मिळतोय का? तुलाही याचा त्रास होत नाही? एकमेकांशी अबोला धरणं, रागावणं हे लहानपणीचे खेळ अजूनही तुम्ही खेळताय? बालमनोवस्थेमधून आता तरी  बाहेर या. ”

सुचित्राला आज रश्मीच्या मनातील सर्व गोष्टी बाहेर काढून तिला तिच्या त्रासातून मोकळं करायचं होतं. आणि तिचं इप्सित साध्य झालं. ती रश्मीशी या सर्व गोष्टी बोलत असतानाच रश्मीच्या भावना अनावर झाल्या. ती हमसून हमसून रडू लागली. थोडं मोकळं झाल्यावर ती म्हणाली, “सूची, खरंय ग तुझं. संजयशी न बोलून मी माझा मलाच त्रास करून घेतला आहे. लहानपणी आम्ही किती भांडायचो पण लगेच पुन्हा एक व्हायचो. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय आजिबात करमायचं नाही. आजी नेहमी म्हणायची, ‘या दोघांचं म्हणजे तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून  करमेना असं आहे.’ खरं तर मागच्या पाच वर्षांत मी त्याला खूप मिस केलं आहे. मलाही त्याला भेटायचं आहे. दरवर्षी मी राखी आणून ठेवते. यावर्षी तरी तो घरी येईल, असं वाटत राहातं.  मी वाट बघत राहते. आत्तापर्यंत एकदाही नाही आला. तेव्हा खूप वाईट वाटलं. मनातलं कुणाशी बोलताही यायचं नाही. मग वड्याचं तेल वांग्यावर निघायचं. मुलांवर आणि नवऱ्यावरही माझी राग निघायचा. चिडचिड व्हायची. माझंही चुकलचं गं. मी एवढं ताणायला नको होतं. मी त्याची मोठी बहीण आहे. विसरले मी जे झालं ते. मी आजच फोन करून राखी पोर्णिमेसाठी त्याला बोलवून घेते.”

हेही वाचा >>>Women Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी मनाविरुद्ध लावलं लग्न, ५० पैशांनी विकली कॉफी अन् मेहनतीच्या जोरावर उभे केले १०० कोटींचे साम्राज्य

सुचित्राने अगोदरच संजयला तिच्या घरी बोलवून घेतलं होतं. आतल्या खोलीतून तो सर्व ऐकत होता. रश्मीचं बोलणं संपतानाच तो बाहेर आला, “ताई, माझंही चुकलंच गं. मी तुझ्याकडं यायला हवं होतं. सुरुवातीला मी प्रयत्न केले, पण तेव्हा तुझा राग अनावर होता. मग माझाही अहंकार आड आला. भावा बहिणीच्या नात्यात अहंकाराची अढी योग्य नाही हे मला कळत होतं पण वळत नव्हतं. मला माफ कर.”

दोघंही एकमेकांना भेटले तेव्हा नात्यात अडथळा आणणारे सर्व बांध आपोआप दूर झाले. छोट्याशा गोष्टींचा बाऊ करून आपल्याच नात्यांना आपण दुरावले होतो हे दोघांच्याही लक्षात आले. भावाचा आधार काय असतो हे रश्मीला समजलं तर बहिणीची माया, प्रेम किती महत्वाचं आहे, याची जाणीव आज संजयलाही झाली होती.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smita joshi606@gmail.com)