काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या दिवसांत घडलेली गोष्ट. सणावारात सोसायटीमधल्या बायका एकमेकींकडे जमतात. घरात गणपती असल्याने काही बायका घरी आल्या होत्या. आता बायका जमल्या की गप्पा- गोष्टी आल्याच. वयात आलेल्या मुला-मुलींवर त्यांची अगदी करडी नजर असते. एक वेळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चोर स्वत:ला वाचवू शकतो; पण बायकांच्या नजरेतून लग्नाच्या वयात आलेल्या मुला-मुलींची सुटका होणं म्हणजे अशक्यप्राय! मुलगी पंचवीशीत आली की, तिचं लग्न झालंच पाहिजे, असा यांचा ठाम समज असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठ्या दोन्ही बहि‍णींची लग्न झाल्यामुळे आता सगळ्यांचा डोळा माझ्यावर आहे. त्यात काकूंच्या नजरेतून मी कशी काय सुटेन… आणि झालंही तसंच. म्हणजे मला पाहाताच काकूंनी गप्पांचा विषयच बदलला आणि तो थेट माझ्या लग्नावर येऊन थांबला. बरं माझ्या दोन्ही बहि‍णींची ‘लव्ह मॅरेजे’स असल्याने माझंही तसंच काहीसं असेल, असा अंदाज त्यांनी आधीच बांधला होता. मग वेडेवाकडे विषय काढत, इकडचं तिकडंच तिरकस बोलत त्या मूळ मुद्द्यावर आल्या… “तुझंही कोणी आहे का?” असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला. बरं याचं मला अजिबातच काही वाटलं नाही… कारण दोन्ही बहि‍णींचे प्रेमविवाह झाल्यानंतर तिसरीही तेच करेल, असा समाजातील इतर लोकांचा समज असतोच. याआधीही अनेकांनी मला हा प्रश्न विचारल्यामुळे माझ्यासाठी हे कॅज्युएल होतं. बरं, माझ्याकडून त्या काकूंना अपेक्षित उत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी तयार केलेला टोमणा फुकट गेल्याचं त्यांच्याहून जास्त मलाच वाईट वाटलं. पण इथवर थांबतील त्या काकू कसल्या?

काकूंच्या आतील डिटेक्टिव्ह बाई आता बाहेर येऊ पाहत होती…त्यामुळे खोदून खोदून त्या मला विचारत होत्या. मी आपली शांतपणे त्यांना उत्तरं देत होते. शेवटी जाता जाता काकू बरळल्याच. मला म्हणाल्या, “ऑफिसमध्ये कोणी भेटलं तर बघ. म्हणजे कसं एकाच क्षेत्रातला जोडीदार मिळाल्यावर चांगलं असतं. त्या क्षेत्रातली माहिती असेल तर जुळवून घ्यायला पण बरं पडतं. ऑफिसमध्ये पण जुळतात की हल्ली लग्न”. त्यांचे हे बोलणं ऐकून माझं मलाच हसू आलं.

हेही वाचा>>उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

कोणी कधी लग्न करावं… अरेंज मॅरेज करावं की लव्ह मॅरेज हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात, अनुभवी व मोठ्या माणसांनी याबाबत नक्कीच सल्ले द्यावेत. पण सल्ले देताना आपण निदान काय बोलतोय, याचा तरी विचार करावा. उगाच फुकटचा सल्ला देण्यात काय पॉईंट? काकू म्हणाल्या तसं… ऑफिसमध्ये जोड्या जुळतही असतील. एकाच ऑफिसमध्ये काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्नाच्या बेडीत अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत. माझ्याही अनेक मित्रमैत्रिणीचे असेच सूर जुळले आहेत आणि नंतर त्यांनी संसार थाटला आहे. पण यापैकी कोणीच ठरवून ऑफिसमधल्याच व्यक्तीच्या प्रेमात पडलेलं नाही. मुळात प्रेम ही ठरवून होणारी गोष्टच नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये मुलं पाहण्याऐवजी पण बरीच कामं असतात. केवळ नाश्ता आणि जेवणाच्या ब्रेक मध्ये थोडा अधिक वेळ गेला की कामाचं नियोजन अनेकदा कोलमडतं. करिअर व कामाच्या गडबडीत या सगळ्याचा पुसटसा विचारही डोक्यात येत नाही. काकू म्हणाल्या तसं, एकाच क्षेत्रातील जोडीदार मिळाल्यावर चांगलं जमतं. असेलही, पण माझं मत बरोबर याविरुद्ध आहे. एकाच क्षेत्रातील जोडीदार असल्यावर स्पर्धा तर होतेच. पण शिवाय एकमेकांच्या वेळा जुळवून घेणं फार अवघड होऊन बसतं. याशिवाय जर एकाच ऑफिसमधला जोडीदार असेल, तर टीममधील इतर व्यक्तींचा दोघांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो. शिवाय नाही म्हटलं तरी याचा कामावर थोडाफार परिणाम तर होतोच. ऑफिसमधील एखाद्या प्रसंगात माझ्या बाजूने का बोलला नाहीस, असा प्रश्नही अनेकदा पार्टनरकडून विचारला जातो. याशिवाय बाकीच्यांच्या नजरेतही फेवरिझम हा भाग येतोच. स्पर्धा असल्यामुळे पुन्हा प्रमोशन आणि बाकीच्या गोष्टीही आल्याच की! वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य दोन्ही हातात हात घालून पुढे सरकत असली तरी त्यात सरमिसळ होता कामा नये, या मताची मी आहे.

आणखी वाचा>> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

काकूंचं बोलणं ऐकल्यानंतर “काकू, मी ऑफिसमध्ये काम करायला जाते. लग्नासाठी मुलं पाहायला नाही”, असं मला त्यांना सांगावसं वाटत होतं. पण शेवटी यांना सांगण्यात काही अर्थ नाही या उद्देशाने मीच तोंडाशी आलेले माझे शब्द गिळून टाकले. त्या काकूंच्या विचारांची फारच कीव आली!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women chatura article unsolicited marriage advice to office girls kak
First published on: 21-12-2022 at 12:34 IST