राखी चव्हाण
जागतिक पर्यटन नकाशावर भारतातील ज्या व्याघ्रप्रकल्पानं नाव नोंदवलं, तोच ताडोबा-अंधारी व्याघ्रपकल्प आता नवा विक्रम नोंदवतोय. हा विक्रम ताडोबातील वाघ नाही हं, तर वाघिणी नोंदवणार !
आश्चर्य वाटलं ना? या वाघिणी आहेत ताडोबा जंगलालगतच्या गावातील स्त्रिया. वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी तर त्यांनी स्वीकारलीच होती, पण आता त्याच व्याघ्रदर्शनासाठी असलेल्या वाहनांचे सारथ्य करण्यासाठी त्या तयार होत आहेत.
व्याघ्रदर्शनासाठी जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची पावले न वळली तर नवलंच ! तो सर्वसामान्य पर्यटक असो, वा सेलिब्रिटी. हमखास येथे येणार म्हणजे येणारच! बॉलीवूड, हॉलीवूडच्या कलावंतांनाही तर ताडोबाने साद घातलीच, पण भारतीय आणि विदेशातील खेळाडूंनासुद्धा या व्याघ्रप्रकल्पाने भुरळ पाडली. त्यातच आता या व्याघ्रप्रकल्प प्रशासनानं नवा प्रयोग राबवायचं ठरवलंय. व्याघ्रपर्यटनाची धुरा आता येत्या पर्यटन हंगामापासून महिलांच्या हाती सोपवली जाणार आहे. पर्यटकांच्या वाहनांचे त्या सारथ्य करणार आहेत.
१८ ते ३५ वयोगटातील या युवती आणि महिला आहेत. वाघांच्या संरक्षणासाठी असलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलात त्या होत्याच. त्याचीही सुरुवात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातूनच झाली. वाघांच्या संरक्षणासाठी सकाळी सहा वाजता त्या जंगलात पाऊल टाकतात आणि नेमून दिलेलं क्षेत्र पायीच पिंजून काढतात. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या रणरागिणींच्या तुकड्या पेंच आणि इतरही व्याघ्रप्रकल्पात आहे. त्यानंतर पर्यटक वाहनात पर्यटक मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी ताडोबातूनच सुरुवात केली. नवखा पर्यटक असो वा सातत्याने येणारा, जंगलाशी निगडीत त्याला माहिती असलेल्या आणि नसलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्या लीलया देतात. जणू त्यांच्या मुखी हे जंगल पाठ आहे. स्थानिक भाषेपासून ते इंग्रजीतूनही ताडोबातील संपूर्ण सजीवसृष्टीचा इतिहास त्या कथन करतात. तेव्हा ही जंगल सफारी आणखीच आनंददायी होते.
आता तर काय ! जंगल पर्यटनाचे सारथ्य त्या करणार आहेत. पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे ‘स्टेअरिंग’ त्यांच्या हातात असणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने ‘भरारी’ या उपक्रमाअंतर्गत बफर आणि विशेषतः गाभा क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावातील १८ ते ३५ वयोगटातील युवती व महिलांकरिता चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात २५ जूनला ताडोबा परिक्षेत्रातील खुटवंडा या गावातून करण्यात आली. यावेळी युवती व विशेषत: विवाहित महिलांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. प्रशिक्षणासाठी नोंदणी करताना समोर असलेल्या जिप्सीच्या ‘स्टेअरिंग’वर त्यांची बोटे फिरत होती. जणू हे ‘स्टेअरिंग’ आपण कधी हाती घेतो आणि जंगलाची वाट तुडवतो!
हा नाविन्यपूर्ण उपक्रम विविध टप्प्यांत राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खुटवंडा, घोसरी व सीतारामपेठ या गावांचा समावेश आहे. यानंतर कोलारा, सातारा, बाह्मणगाव, भामडेळी, कोंडेगाव व मोहर्ली या गावांचा समावेश होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ८४ अर्ज वनविभागाला प्राप्त झाले. प्रशिक्षणार्थींना सुरुवातीला प्रशिक्षणार्थी व नंतर नियमित वाहन परवाना प्राप्त होईल. प्रशिक्षणाचा सर्व खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
ताडोबा परिसरातील युवती आणि महिला यासाठी तयार होतील की नाही, याची थोडी धाकधूक होतीच, पण मग पर्यावरण शिक्षण अधिकारी व उपजीविका तज्ज्ञ प्रफुल्ल सावरकर या गावांमध्ये गेले. त्यांनी या सर्वांसोबत संवाद साधला आणि काय आश्चर्य ! अनपेक्षित असा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. या वनक्षेत्रातील एकूण ६१ महिलांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला नवीन कौशल्य प्राप्त होईल. व्याघ्र प्रकल्पामध्ये जिप्सी चालक व निसर्गतज्ज्ञ म्हणून कार्य करू. याशिवाय शासकीय नोकरी किंवा रिसोर्टमध्ये काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू. ज्या जंगल परिसरात आम्ही वाढलो, तो निसर्गच आमच्या उपजीविकेसाठी एवढी चांगली संधी उपलब्ध करुन देत असेल, तर आम्ही ती का नाही स्वीकारणार !’ अशी या युवती व महिलांची भूमिका आहे.
rakhi.chavhan@expressindia.com