-डॉ. किशोर अतनूरकर
रजोनिवृत्ती किंवा ऋतूसमाप्ती अर्थात मेनोपॉजच्या कालावधीत स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. त्यातील एक महत्वाचा बदल म्हणजे शरीरातील हाडं ठिसूळ होणं. या नैसर्गिक आणि अटळ समस्येचा सामना तर करावा लागणार. उतारवयातील ही समस्या समाधानकारकरीत्या हाताळायची असेल तर त्याची तयारी अगोदरपासून करावी लागेल.

मुलींचं वयात येणं, गर्भधारणा आणि बाळंतपण, मेनोपॉज (रजोनिवृत्ती) या स्त्री शरीरातील घडामोडी प्रामुख्याने इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हॉर्मोन्सच्या (संप्रेरके) नियंत्रणाखाली घडत असतात. तसं पाहिलं तर दोन्ही हॉर्मोन्स महत्वाचे. इस्ट्रोजन जास्त महत्वाचं. कारण इस्ट्रोजनवर स्त्रियांचं ‘स्त्री-पण’ जपण्याची जबाबदारी असते. या हॉर्मोन्सची निर्मिती स्त्री-बीजांडकोषात (Ovary ) होत असते. मुलीची पहिली मासिकपाळी सुरु होण्याच्या कालावधीपासून ते ती कायमची बंद होईपर्यंत हे दोन हॉर्मोन्स ‘ॲक्शन मोड’ मधे असतात. इस्ट्रोजन तयार होणं बंद झालं, की मासिकपाळीचं चक्र बंद होत असतं असं म्हणायला हरकत नाही. मासिकपाळी बंद झाल्यानंतर देखील इस्ट्रोजनची निर्मिती होत असते. ही निर्मिती शरीरात असणाऱ्या चरबी किंवा फॅटपासून होते. त्या निर्मितीचं प्रमाण अल्प असतं.

आणखी वाचा-एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

आपलं शरीर हे असंख्य पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक पेशीला निसर्गाने काही काम नेमून दिलेलं आहे. अर्थातच, शरीरातील शरीरातील हाडांच्या पेशी सतत कार्यरत असतात. हाडात दोन प्रकारच्या पेशी असतात. एका पेशींचं काम हाडं तयार करणं आणि दुसरीचं काम मृत झालेल्या हाडांच्या पेशींना आतल्या आत नष्ट करणं. हाडाच्या पेशी तयार होणं आणि मृत हाडाच्या पेशी नष्ट होण्याचं संतुलन जो पर्यंत आहे तोपर्यंत काही समस्या नाही. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत जे काही हाडांचं वस्तुमान ( Bone Mass ) संपादित केलं जातं ते रजोनिवृत्तीच्या कालावधीपर्यंत टिकून राहतं. चाळीशीनंतर हाडं तयार करणाऱ्या पेशींचं काम, मृत हाडं नष्ट करून टाकणाऱ्या पेशींच्या तुलनेत हळू-हळू मंद व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एकंदरीत हाडांचं वस्तुमान, दर वर्षी ०. ४ टक्के या प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते. रजोनिवृत्तीनंतर हाडांचं वस्तुमान कमी होण्याचा वेग साधारणतः ३ टक्के इतका होतो. रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजन हॉर्मोनची निर्मिती कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हाडं तयार होणाऱ्या पेशी कमी प्रमाणात तयार होतात. हाडांची घनता कमी होते. हाडं ठिसूळ होण्याशी संबंधित बदल हे शरीरात सहजपणे घडत असतात. हाडं ठिसूळ झाल्यामुळे छोटीशी इजा झाली तरी फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.

आजकाल, शरीरातील हाडं ठिसूळ झालेली आहेत किंवा नाही हे समजण्यासाठी हाडाची घनता मोजून बघता येते. त्याला बोन मिनरल डेन्सिटी (Bone Mineral Density) मोजणं असं म्हणतात. ती घनता T Score च्या स्वरूपात सांगितली जाते. T Score जर + २.५ ते – १ च्या दरम्यान असेल तर नॉर्मल आणि उणे १ ते उणे २.५ च्या दरम्यान असेल तर हाडं ठिसूळ ( Osteoporosis ) झालेली आहेत असं म्हटलं जातं. BMD कमी झाला म्हणजे osteoporosis झाला असं खात्रीने सांगता येत नाही. DEXA ( Dual Energy x-ray Absorptiometry ) या पद्धतीने खात्रीने सांगता येतं.

आणखी वाचा-‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

वयोमानाप्रमाणे जवळपास सगळ्यांचीच हाडं ठिसूळ होतात हे जरी खरं असलं तरी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असतं. आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होऊ नये किंवा झालाच तर उशिरा व्हावा असं वाटत असेल तर त्याची तयारी तरुण वयातच करावी लागते. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत जास्तीतजास्त Bone Mass संपादित करणं हीच पहिली पायरी होय. समस्या ही आहे की, विसाव्या वर्षी या गोष्टीचं भान रहात नाही.

नियमित व्यायाम केल्याने हाडं ठिसूळ होण्याची प्रक्रिया लांबू शकते. स्नायू जर अशक्त असतील तर शरीराचं संतुलन बिघडून माणूस पडू शकतो, साधारण इजा होऊन देखील फ्रॅक्चरची शक्यता वाढते. म्हणून नियमित व्यायाम करून स्नायू बळकट करणे आवश्यक ठरते. तसेच दिवसातून काही कालावधीसाठी सूर्यप्रकाश अंगावर घेण्याने आणि कॅल्शिअम, जीवनसत्व डी च्या नियमित सेवनाने हाडं ठिसूळ होण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध होऊ शकतो. धूम्रपानाने आणि दारूच्या सेवनाने देखील हाडं ठिसूळ होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे.

हे सारं काही इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे घडून येत असूनही औषध रूपाने इस्ट्रोजन देण्याचं डॉक्टर टाळतात, कारण इस्ट्रोजनमुळे स्तनाचा कर्करोग, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड असे काही जीवाला धोका असणारे साईड इफ्फेक्ट्सची शक्यता वाढते.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत
atnurkarkishore@gmail.com