निसर्गाची अमाप उधळण लाभलेल्या बेटांचा समूह म्हणजे वेस्ट इंडिज. प्रशासकीयदृष्टय़ा टिकलीएवढी बेटे  स्वतंत्र राष्ट्रे आहेत, मात्र क्रिकेटच्या परिघात तांत्रिक सीमा पुसल्या जातात आणि असंख्य जिव्हाळ्याची बेटे मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार होतो. खुल्या आकाशाला साद घालणारे समुद्रकिनारे, नारळ-पोफळीच्या बागा, छोटी पण टुमदार घरे. वसाहतवादी संस्कृतीमुळे या बेटांवर पैसा खुळखुळत नाही आणि कदाचित म्हणूनच ते दिलखुलास आहेत. बाजारू कोतेपणाचा स्पर्श त्यांच्या वागण्यात, खेळण्यात जाणवत नाही. हारजीतपेक्षाही खेळण्यातला आनंद लुटत नाचणे त्यांना जास्त भावते. वेस्ट इंडिज संघाच्या मुक्तछंदी अवताराला दुर्दैवाने नामशेष होऊ पाहणाऱ्या गतवैभवाची झालर आहे.
स्वतंत्र राष्ट्रे आहेत, मात्र क्रिकेटच्या परिघात तांत्रिक सीमा पुसल्या जातात आणि असंख्य जिव्हाळ्याची बेटे मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार होतो. खुल्या आकाशाला साद घालणारे समुद्रकिनारे, नारळ-पोफळीच्या बागा, छोटी पण टुमदार घरे. वसाहतवादी संस्कृतीमुळे या बेटांवर पैसा खुळखुळत नाही आणि कदाचित म्हणूनच ते दिलखुलास आहेत. बाजारू कोतेपणाचा स्पर्श त्यांच्या वागण्यात, खेळण्यात जाणवत नाही. हारजीतपेक्षाही खेळण्यातला आनंद लुटत नाचणे त्यांना जास्त भावते. वेस्ट इंडिज संघाच्या मुक्तछंदी अवताराला दुर्दैवाने नामशेष होऊ पाहणाऱ्या गतवैभवाची झालर आहे. 
सार्वकालीन महान संघ असे वर्णन केले जाणाऱ्या या संघानेच १९७५ आणि १९७९ साली विश्वविजेतेपदावर कब्जा केला. १९८३ विश्वचषकात जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचे वेस्ट इंडिजचे स्वप्न भारताने धुळीस मिळवले. त्यावेळी खेळाप्रती अतीव निष्ठा जपणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉइड, गॉर्डन ग्रीनिज, जोएल गार्नर, अॅण्डी रॉबर्ट्स, मायकेल होल्िंडग अशा एकापेक्षा एक दिग्गजांचा हा सुवर्णकाळ. दिग्गज बाजूला होत गेले आणि वेस्ट इंडिज संघाची रयाच गेली. भारतीय उपखंडात झालेल्या १९८७च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. 
१९९२च्या विश्वचषकात ब्रायन लारारूपी ताऱ्याचा उदय झाला, मात्र तोही वेस्ट इंडिजची नाव प्राथमिक फेरीच्या पल्याड नेऊ शकला नाही. भारतीय उपखंडात झालेल्या १९९६च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला प्राथमिक फेरीत केनियाने पराभवाचा धक्का दिला. मात्र यातून सावरत त्यांनी प्राथमिक फेरीचा अडथळा पार केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर मात केली. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांचा मार्ग रोखला. कोर्टनी वॉल्श, कर्टली अॅम्ब्रोज, इयान बिशप, ओटिस गिब्सन या दमदार गोलंदाजी चमूच्या बळावर वेस्ट इंडिजने ही वाटचाल केली. इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला प्राथमिक फेरीतूनच परतावे लागले. प्राथमिक फेरीत पाकिस्तानचा संघ गटात अव्वल होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघांनी प्रत्येकी ३ विजय मिळवले होते आणि २ लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडला पुढे जाण्याची संधी मिळाली आणि केवळ नॅनो गुणांच्या फरकाने वेस्ट इंडिजला माघारी परतावे लागले. २००३च्या विश्वचषकातही वेस्ट इंडिजचे नशीब पालटले नाही. प्राथमिक फेरीत वेस्ट इंडिजला कोणत्याही अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले नाही. त्यांची कामगिरीही वाईट नव्हती. मात्र बांगलादेशविरुद्ध निकालाविना राहिलेली लढत आणि केनियाचे आश्र्चयकारक प्रदर्शन यामुळे वेस्ट इंडिजला सात सदस्यीय गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गटातल्या अव्वल तीन संघांनाच पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार असल्याने वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले. २००७च्या विश्वचषकाच्या निमित्ताने वेस्ट इंडिजला पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने प्राथमिक गटात झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि आर्यलडचा धुव्वा उडवत सुपर एट फेरी गाठली. मात्र सुपर एट फेरीत त्यांना सपाटून मार खावा लागला. पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने ३२२ धावांचा डोंगर उभारला आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव २१९ धावांत गुंडाळला. न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिजचा १७७ धावांत खुर्दा उडाला. न्यूझीलंडने सहजपणे हे लक्ष्य गाठले. श्रीलंकेने ३०३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव १९० धावांतच गडगडला. दक्षिण आफ्रिकेने ३५६ धावा करत विजयाची पायाभरणी केली. वेस्ट इंडिजने २८९ धावांची मजल मारत संघर्ष केला, मात्र तो अपुराच ठरला. वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध सहज विजय मिळवला. शेवटच्या लढतीत वेस्ट इंडिजने ३०० धावा केल्या. केव्हिन पीटरसनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने एका विकेटने थरारक विजय मिळवला आणि या पराभवासह वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात दिमाखदार कामगिरी करण्याची संधी वेस्ट इंडिजकडे होती. मात्र व्यावसायिकतेचा अभाव आणि उत्साहाच्या भरात मूलभूत गोष्टीतही झालेल्या चुका वेस्ट इंडिजला महागात पडल्या. २०११च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने बांगलादेश, नेदरलँड्स आणि आर्यलड या लिंबूटिंबूंना नमवले. मात्र दक्षिण आफ्रिका, भारत व इंग्लंडविरुद्ध त्यांचा पराभव झाला. परंतु तीन विजयांच्या जोरावर त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. शाहिद आफ्रिदीसह पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली व त्यांचा डाव ११२ धावांतच संपुष्टात आला. विजयाची औपचारिकता पूर्ण होताच विंडीजने परतीचा मार्ग पत्करला. गुणवत्ता असूनही, एकत्रित सांघिक प्रयत्न नसल्याने वेस्ट इंडिजचा खेळ म्हणजे मनमौजी मनोरंजनच राहते. उत्साहाला सातत्य आणि व्यावसायिकतेची जोड देत नवी भरारी घेण्याचे आव्हान यंदा विंडीजसमोर आहे.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
करार आणि आर्थिक व्यवहारांवरून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यात धुसफुस सुरूच आहे. या वादाचा मानसिक फटका खेळाडूंना बसणार आहे. या वादाची परिणिती म्हणून ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड या दोघांची विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेली नाही. यात भर म्हणून गोलंदाजीची शैली सदोष ठरवण्यात आल्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फिरकीपटू सुनील नरीनने माघार घेतली आहे. या तिघांच्या अनुपस्थितीमुळे वेस्ट इंडिजचे आव्हान कमकुवत झाले आहे. अननुभवी जेसन होल्डरकडे संघाची सूत्रे आहेत. सूर गवसल्यास सामना खेचून आणण्याची ताकद असलेला ख्रिस गेल वेस्ट इंडिजचा हुकमी एक्का आहे. अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स वेस्ट इंडिजची ताकद आहे. वेग आणि चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्टय़ा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत.
अपेक्षित कामगिरी
झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिरातीमुळे वेस्ट इंडिजसाठी समीकरण सोपे आहे. आर्यलडविरुद्ध गांभीर्याने खेळ केल्यास वेस्ट इंडिजला विजय मिळवता येऊ शकतो. बेभरवशी आणि सातत्याचा अभाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढत रंगतदार होते. भारताच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उठवत सनसनाटी विजय मिळविण्याची संधी वेस्ट इंडिजकडे आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचे आव्हान वेस्ट इंडिजसाठी सर्वात खडतर आहे.
शब्दांकन : पराग फाटक