कुलवंतसिंग कोहली

वयाच्या अकराव्या वर्षी मी मुंबईत आलो आणि काही महिन्यांतच मुंबईचा झालो. आधी मी नाखूश होतो इथं राहायला. मला आठवत राहायचे रावळिपडीतले दिवस. तिथली मौज. तिथली माझी भावंडं! पण हळूहळू इथल्या पश्चिम सागरानं, दादर भागातल्या त्यावेळच्या हिरव्यागार निसर्गानं, शिवाजी पार्कच्या भव्यतेनं, टिळक पुलाच्या नजाकतीनं, इथल्या माणसांच्या उत्सवप्रियतेनं मला आपल्यात सामावून घेतलं आणि मी मुंबईकर झालो.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

खरं म्हणजे आमच्या खानदानात सुक्या मेव्याचा व्यापार होता. त्यातून भरपूर कमाई होत असे. पण माझ्या पापाजींनी वेगळी वाट चोखाळली आणि ते मुंबईत आले. वेगळ्या वाटा शोधणाऱ्या लोकांच्या मागे मुंबादेवी नेहमीच उभी असते. आमच्याही मागे ती उभी राहिली. आधी दोन वेळा तिनं आमची परीक्षा पाहिली व तिसऱ्या वेळी तिनं आम्हाला कौल दिला. त्याकाळी मुख्य मुंबई शहरापासून दूर असणाऱ्या दादर भागात आम्ही आमचं छोटंसं ‘प्रीतम पंजाबी िहदू हॉटेल’ थाटलं. खरं म्हणजे ते हॉटेल नव्हतं, ते होतं रेस्टॉरंट! जिथं फक्त न्याहारी, चहा आदी गोष्टी आणि जेवण मिळतं ते रेस्टॉरंट. आणि जिथं राहण्याची व्यवस्था असते ते हॉटेल. पण चाळीस-पन्नासच्या दशकात सरसकट सर्वच रेस्टॉरंट्सना ‘हॉटेल’ म्हणण्याची प्रथा होती. १९५५ च्या पहिल्या नूतनीकरणानंतर आमच्या नावातला ‘हॉटेल’ शब्द गेला व ‘प्रीतम रेस्टॉरंट’ झालं. मद्याचा परवाना मिळाल्यानंतर ते ‘प्रीतम रेस्टॉरंट आणि परमिट रूम’ झालं. सुरुवातीपासून आम्ही आमच्या इथे खात्रीशीर व ओरिजिनल मद्य उपलब्ध करून दिल्यामुळे ‘ताज’नंतर आमचं नाव झालं. असो.

त्या काळात खाद्य व्यवसायावर इराणी रेस्टॉरंट्सचा प्रभाव होता. शहरातल्या प्रत्येक भागातल्या मोक्याच्या कॉर्नरवर इराणी रेस्टॉरंट असे. या रेस्टॉरंटमध्ये बन-मस्का, ब्रून मस्का, बिस्किटे, उकडलेली अंडी, अंडी मसाला, ऑम्लेट, खिमा, बिर्याणी मिळत असे. इराण्याचा चहा पिणं ही फॅशन होती.

राहण्यासाठी छोटे छोटे लॉज असत. त्यावेळी सबंध देशात जेमतेम चार-पाच फाइव्ह स्टार हॉटेलं होती. मुंबईतलं ताज, दिल्लीतलं इम्पिरिअल, कलकत्त्यातली ग्रँड आणि ग्रेट ईस्टर्न ही दोन, बंगलोरला एक. फाइव्ह स्टार हॉटेलांत परदेशी माणसं किंवा राजेरजवाडे येऊन राहात. तशी भारतीय माणसाला पर्यटनाची सवय नव्हती आणि बाहेरच्या खाण्याचीही. देश स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानातून इथं स्थलांतरित झालेल्या बांधवांनी त्यांचे खाण्याचे पदार्थ आधी दिल्लीत आणले आणि नंतर मुंबईत. त्यांच्या रेस्टॉरंटची नावं सामान्यत: ‘पंजाबी व मोगलाई खाना’ अशा विशेषणांनी सजत. पण मुंबईत खरंखुरं पंजाबी जेवण आणलं ‘शेर-ए-पंजाब’ने आणि नंतर ते उपनगरात आणलं ‘प्रीतम’ने! मी नम्रपणे सांगू शकतो, की दादरकरांना पंजाबी खाण्याची सवय आम्ही लावली.

दहा बाय दहाच्या गाळ्यात पापाजींनी ‘प्रीतम’ सुरू केलं. मी शिक्षण संपवून घरी परतलो, तर त्यांनी मला प्रीतममध्ये काम करायला सांगितलं. या छोटय़ाशा सात टेबलांच्या रेस्टॉरंटमध्ये मला सुरुवातीला गोडी नव्हती. पण पापाजींना कोण सांगणार? त्यात माझं लवकर लग्न केलेलं! मी बिजीकडे कटकट केली. तिचे एक मूँहबोले भाई होते, ते त्यावेळी तिथं होते. ते कलकत्त्याला पोलादाच्या खरेदी-विक्रीचा कमिशनवरचा व्यवसाय करत होते. ते म्हणाले, ‘‘मी याला कलकत्त्याला घेऊन जातो.’’ पापाजींना कसंबसं पटवून आम्ही कलकत्त्याला गेलो. पण त्या व्यवसायात मला राम वाटला नाही. टोनीचा जन्म झाला तेव्हा पापाजींनी फर्मान काढलं, ‘निमूटपणे मुंबईत ये आणि मला मदत कर.’ आम्ही परतलो. ते १९५३ साल होतं. परतल्यावर ‘प्रीतम’चं रूपडं थोडं पालटावं, फरशी बदलावी, नवं फíनचर करावं म्हणून मी पापाजींकडे पाच हजार रुपये मागितले तर ते डाफरले. म्हणाले, ‘‘एवढे पसे कशाला लागतात? मी काय धंदा करत नाही? याच हॉटेलात पृथ्वीराजजी, केदार शर्माजी येतात.’’ पण त्यांनी पसे दिले. आम्ही बाजूचा गाळा विकत घेतला. त्या गाळ्यात जेवणासाठी वाट बघणाऱ्या लोकांच्या बसायची सोय केली. पण दुसऱ्याच दिवशी लोकांच्या मागणीमुळे आम्ही तिथं रेस्टॉरंट सुरू केलं. ते वाढत गेलं. त्याचं नूतनीकरण झाल्यावर लोक येत गेले, वाढत गेले. आणखी एका गोष्टीचा फायदा आम्हाला झाला, तो म्हणजे सुरुवातीच्या काळात सिनेमात स्ट्रगल करणारे कलाकार आता स्टार बनले होते, ते ‘प्रीतम’मध्ये येत. त्यांना बघायला गर्दी उसळत असे व आमचं नाव होत असे.

दिवस जात होते तशी मुंबईच्या समाजजीवनाची घडीही बदलत होती. माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईतलं पहिलं वातानुकूलित रेस्टॉरंट सुरू झालं ते ‘क्वालिटी’! १९६० च्या सुमारास ‘ओबेरॉय’ सुरू झालं. आणि त्याच वेळी मुंबईच्या हॉटेल व्यवसायात एक मोठं परिवर्तन घडवलं ते ब्रह्मदेशातून परतलेल्या सरदार बक्षीबहादर दिलीप सिंग यांनी. त्यांनी ताजच्या बाजूला ‘वॉलड्रॉप’ नावाचं हॉटेल काढलं व त्यात त्यांनी पहिल्यांदा ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ची सोय उपलब्ध करून दिली. आम्ही हे सारं बघत होतो. मला एक सवय लागली होती. जेव्हा जेव्हा कोणी नवं रेस्टॉरंट काढत असे, मी जाऊन ते बारकाईनं बघत असे. आमच्या ‘प्रीतम’च्या लॉजिंगमध्ये आम्ही ही सोय देऊ केली. असं करणारं ‘प्रीतम’ पहिलं होतं. उपनगरातील रेस्टॉरंटमध्ये रेफ्रिजरेटर आणणारे आम्ही पहिले होतो. पूर्वी रेस्टॉरंटना बर्फाच्या लाद्या लागत असत. वीस-पंचवीस पसे किलोने बर्फ मिळत असे. पण आइसक्यूब्स बनवण्याचं मशीन आणणारं आमचं रेस्टॉरंट पहिलं. प्रीतम हे पहिलं गार्डन रेस्टॉरंट होतं. केंद्रीय वातानुकूलन असणारं प्रीतम पहिलं. पहिलेपणाचा आनंद मोठा असतो. त्यात समाधान असतं ते ग्राहकाची सेवा करण्याचं. नव्या रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी, की तुमच्या जागेची निवड, सेवाभाव, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा, नम्रता, सेवातत्परता आणि काळाबरोबर राहण्याची जिद्द असेल तर तुम्हाला हमखास यश मिळेल. आणखी एक सल्ला : तुमची जागा प्रशस्त हवी. कदाचित जागेकरता अधिक खर्च केला असे तुम्हाला वाटेल, पण भविष्यात वाढत जाणारा व्यवसाय लक्षात घ्यायला हवा. डेकोरेशनवर कमी खर्च करायला हवा, हा माझा दृष्टिकोन. माझ्या नातवंडांना ते पटत नाही. पण ठीक आहे. पिढी बदलतेय.

त्या काळात दक्षिण मुंबईत ‘ताज’, ‘ओबेरॉय’ आणि उपनगरात ‘सन अँड सँड’ हीच केवळ फाइव्ह स्टार हॉटेल्स होती. ‘सन अँड सँड’च्या प्रवर्तकांनी दादरला आमच्या शेजारी इमारत बांधण्यासाठी एक जागा घेतली होती. आम्हाला कोणाची स्पर्धा नसावी म्हणून त्या इमारतीचे तळमजल्याचे सर्व गाळे आम्ही विकत घेतले. पण त्यांचा इमारत बांधण्याचा विचार बारगळला आणि आम्ही ती जागा विकत घेतली. त्याच जागेत आम्ही फोर स्टार हॉटेल बांधायचा निर्णय घेतला. आमच्या दादर भागात एखादं स्टार हॉटेल असावं असं आम्हाला वाटत होतं. त्यावेळी अनेकांनी आम्हाला वेडय़ात काढलं. ते म्हणत, ‘दादरची खर्च करण्याची तेवढी कपॅसिटी नाही.’ पण आम्हाला माहिती होतं की, या परिसरात खर्च करण्याची क्षमता असणारे नागरिक आहेत. ते पसे दाखवत नाहीत. दादरमधल्या लोकांना दिखाऊपणापेक्षा विनम्रता आवडते. दादरला हॉटेल व्यवसायाच्या नकाशावर अग्रेसर करण्याचं आमचं ध्येय होतं. आम्ही तिथं ‘मिडटाऊन प्रीतम’ उभं केलं.

‘प्रीतम’मध्ये सर्व प्रकारची मंडळी येत असत व येतात. एकेकाळी मुंबईवर अधिराज्य गाजवणारे हाजी मस्तान, करीमलालाही इथं येत असत. जेवून जात असत. आमचा केवळ आमच्या व्यवसायाशी संबंध असे. एक सांगतो, मला त्यांच्यातला ‘माणूस’च नेहमी दिसला. एकदा सिक्युरिटी सíव्हस चालवणारा राहुल नंदा माझ्या मुलाला- गोगीला म्हणाला की, त्याने जेव्हा सिक्युरिटी सíव्हस सुरू करण्याचा विचार केला होता तेव्हा दहा-बारा गुंडांनी त्याला प्रीतममध्ये बोलावलं व टेबलवर घेरलं. राहुल हा देखणा व सहा फूट चार इंच उंचीचा. त्या काळात बऱ्याचशा सिक्युरिटी कंपन्या गुंड चालवत. त्यांना राहुलची कंपनी हे त्यांच्या धंद्यावरचं अतिक्रमण वाटलं. ते त्याला ‘समजावण्या’साठी तिथं आले होते. पण ‘प्रीतम’चं वातावरण, खाणं आणि त्याचं न भिता शांतपणे बोलणं याचा प्रभाव असा पडला, की ते गुंड तिथून निघून जाण्यापूर्वी त्याचे मित्र झाले आणि त्यांनीच त्याला सहकार्याचं आश्वासनही दिलं.

आमचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे- प्रीतम ही लग्न जुळण्याची व जुळवण्याची लोकप्रिय जागा. अनेक डॉक्टर मंडळींची प्रेमप्रकरणं आमच्या इथं घडली व त्यांची लग्नंही झाली. नंतर आमचे फॅमिली डॉक्टर झालेले डॉ. वाळवेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. वंदना वाळवेकर यांची प्रेमकहाणी इथंच बहरली व यशस्वी झाली. वाळवेकर मराठी व त्यांची पत्नी गुजराती. पाच र्वष त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मी त्याचा साक्षीदार होतो. डॉ. अजित व डॉ. जाई मेनन यांचंही प्रेम व लग्न प्रीतमच्याच साक्षीनं झालं.

मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची व शंभूराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे व डॉ. अश्विनी कोल्हे यांची पहिली डिनर भेट प्रीतम ढाब्यावर झाली. त्यांची ‘कोर्टशिप’ही इथंच झाली. लग्नाचं सेलिब्रेशन, त्यांचे वाढदिवस, मुलगी आद्याचा पहिला वाढदिवसही त्यांनी इथंच साजरा केला. आपल्या इथं येणारा हा शांत प्रकृतीचा देखणा डॉक्टर हा उत्तम नटही आहे, हे मला त्याला टीव्हीवर पाहिल्यावरच कळलं. ते एकदा मला म्हणाले, ‘‘इथला सगळा मेन्यू मला पाठ आहे.’’

परंपरा पाळणं हे आमच्या ग्राहकांचं वैशिष्टय़. कित्येक जोडपी त्यांच्या इथल्या पहिल्या भेटीचे वाढदिवस साजरे करतात व त्यांच्या मुलांच्या लग्नाचेही वाढदिवस इथेच साजरे झाले आहेत. आम्ही मागे कॅनडात ‘निर्वाणा’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. टोनी ते सांभाळत असे. एकदा एका भारतीय जोडप्याला त्यांच्या मुलाच्या लग्नाची पार्टी ‘निर्वाणा’त द्यायची होती. त्यांनी जी तारीख निवडली ती आमच्यासाठी थोडी कष्टदायक होती. आम्ही त्यांना थोडे जास्त दर सांगितले. सामान्यत: बुफेची ऑर्डर त्या काळात प्रति व्यक्ती साधारण पंधरा डॉलर्स होती. आम्ही त्यांना चाळीस डॉलर्स सांगितले. तर त्यालाही ते राजी झाले. पार्टी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रति व्यक्ती पन्नास डॉलर्स सांगितले असते तरी आम्ही दिले असते. कारण आमचं लग्न प्रीतममध्ये ठरलं, तिथंच सेलिब्रेशन झालं. आम्हाला मुलाच्या लग्नाची पार्टीही तिथंच द्यायची होती. पण याच्या व्हिसाची काही अडचण होती. त्यामुळे जाता येणार नव्हतं. प्रीतमचीच ब्रँच ‘निर्वाणा’ इथं कॅनडात झाल्यामुळे आम्ही इथं पार्टी करण्याचा निर्णय घेतला.’’

एक छानशी आठवण.. टोनी त्या संध्याकाळी सगळं पाहत होता. अचानक भूषणकडे (आमच्या मॅनेजरकडे) सात-आठ जण त्रस्त अवस्थेत आलेले त्यानं पाहिलं. त्यांना काय हवंय, हे पाहायला टोनी तिथं गेला. तेव्हा त्याला कळलं की दुसऱ्या हॉटेलात एका सिंधी परिवाराचं लग्न होतं. सर्व काही व्यवस्थित ठरूनही त्यांना जेवण कमी पडलं. सातशे लोकांचं जेवण सांगूनही चारशे जणांत ते जेवण संपलं. हॉटेलवाल्याशी त्यांची वादावादी झाली. मुलीकडच्या सर्वाचं जेवण राहिलं होतं. त्यांचं जेवण आम्ही ऐनवेळी तयार करावं असं त्यांचं म्हणणं होतं. टोनीनं त्यास नकार दिला. पण त्यांनी कळकळीनं विनंती केली. भूषण टोनीला म्हणाला, ‘‘सर, आपण जेवण करू या. ही संधी चांगली आहे. थोडे जास्त पसे घेऊ. तेही देतील.’’ ‘‘ठीक आहे,’’ असं म्हणून टोनीनं त्यांना प्रति व्यक्ती साडेतीनशे रुपये असा दर सांगितला व एक तासाने त्यांना येण्याची विनंती केली. माझे पापाजी तिथं बाजूला बसून नामस्मरण करत होते. ते हे सारं बघत होते. त्यांनी नामस्मरण बाजूला ठेवलं. त्या लोकांना जवळ बोलावलं व सांगितलं, ‘‘तुम्ही तुमची माणसं घेऊन या, आम्ही तुम्हाला जेवण नक्की देऊ. पण माझ्या नातवानं तुम्हाला जे पसे सांगितले तेवढे देऊ नका. आमचा दर माणशी तीनशे रुपये आहे, तेवढाच द्या.’’ त्यांना आश्चर्य वाटलं. पापाजी कोण हे त्यांना ठाऊक नव्हतं. ते म्हणाले, ‘‘कमी पसे घेताय. मग एखादा पदार्थ कमी दिलात तर कसं?’’ पापाजी म्हणाले, ‘‘काही कमी देणार नाही. उलट, जास्तच देऊ. पण नडलेल्या माणसाला लुटलं असं होता कामा नये. उलट, तुम्ही तीनशे लोक सांगताय ना? लिहून घ्या- तुमची चारशे माणसं येतील अजून.’’ आणि खरंच! त्यांचे जवळपास पावणे चारशे लोक त्या दिवशी जेवायला आले. माँ अन्नपूर्णेच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना अन्न देऊ शकलो. त्या लोकांनी पापाजींना सांगितलं, ‘‘तुमच्यात देव आहे.’’ ते म्हणाले, ‘‘तोच देव तुमच्यातही आहे. तेवढा सांभाळू या.’’ टोनीनं नंतर पापाजींना विचारलं, ‘‘तुम्ही असं का केलंत? जास्त पसे मिळाले असते ना!’’ ते म्हणाले, ‘‘आपली नियत खराब होता कामा नये. ती चांगली हवी, तरच बरकत राहते. आता बघ- ही माणसं आपल्याला कायम लक्षात ठेवतील.’’ ते खरंच ठरलं. त्या कुटुंबांतली मंडळी पुढे जगभर पांगली. परंतु ते मुंबईत आले की त्यांची फेरी आम्हाला भेटायला प्रीतममध्ये होतेच.

शेवटी एकच गोष्ट खरी.. जग कुठेही आणि कसंही चाललं असेल, आपण आपल्यातला परमेश्वराचा जो अंश आहे ना, तो जपायला हवा. त्या अंशाच्या अस्तित्वावर तर जग चाललंय!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर