News Flash

डांगेसाहेब!

माझ्या आठवणींतली माझी मुंबई ही छान आहे, साजिरी आहे, गोजिरी आहे.

डांगेसाहेब!
कॉ. श्रीपाद अमृत डांगे इंदिराजींसोबत..

माझ्या आठवणींतली माझी मुंबई ही छान आहे, साजिरी आहे, गोजिरी आहे. त्या काळात मुंबईतली घरं कायम सताड उघडी असत. या घरातून त्या घरात शिजलेलं अन्न आपुलकीनं जात असे. जोश्यांकडची पुरणपोळी प्रधानांना आवडे, तर प्रधानांचं वालाचं बिरडं जोश्यांच्या तोंडाला पाणी आणत असे. अण्णाची इडली सरदारजीकडे जाई आणि सरदारजीकडचं सरसों का साग त्याच्याकडे जात असे. तेंडुलकरांच्या घरातला माशांचा खमंग वास पाटलांच्या नाकाला सुखावत असे, आणि पाटलांच्या घरातल्या कोंबडीच्या झणझणीत तेज वासानं तेंडुलकरांच्या जिभेला पाणी सुटे. खानसाहेबांची ईद साजरी करायला कुळकर्णी धावत असत, तर कुळकण्र्याच्या दिवाळीचे फटाके खानसाहेब आणत असत.. हे असं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं माझ्या मुंबईत पूर्वी होतं. पण काळाच्या रेटय़ात घरं तुटली, वाडय़ा गेल्या, चाळी ढासळल्या आणि त्यांच्या जागी फ्लॅट आले, अपार्टमेंट्स आल्या, सोसायटय़ा झाल्या. आता इथं जो- तो आपापल्या विवंचनेत असतो. फक्त मुंबईवर जेव्हा संकट कोसळतं तेव्हाच तो आपलं-तुपलं विसरतो आणि मुंबईकर होतो. तशी मुंबईकराला एकमेकांशी बोलायला कोणत्या ओळखीची गरज नसते. तो सहजपणे दुसऱ्याशी बोलतो, ओळख करून घेतो आणि त्याचा मित्र बनतो. रोज लोकलनं प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना हे सांगायची गरजही नाही. रोज एकाच लोकलमध्ये एकाच ठिकाणी भेटणाऱ्या प्रवाशांना परस्परांचं नावही माहिती नसतं, पण तरी ते एकमेकांचे सुहृद होतात.

हॉटेल हीसुद्धा अशी ओळख होण्याची जागा आहे. त्यात आम्ही खूप भाग्यवान आहोत. प्रीतमच्या काऊंटरवर अनेक ओळखी झाल्या आणि त्या पिढय़ान् पिढय़ा टिकल्या. अनेक डॉक्टर्स दाम्पत्यं आहेत, कलाकार आहेत- की ज्यांच्या पहिल्या भेटी प्रीतममध्ये झाल्या, भेटीतून ओळखी झाल्या, ओळखीतून प्रेम जुळलं आणि त्यांची पुढं लग्नंही झाली. (ही लेखमाला सुरू झाल्यानंतर मला लंडनहून एक ई-मेल आला- ज्यात अशीच एक कथा होती. असो.)

अशी पिढय़ान् पिढय़ा टिकलेली एक ओळख म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची! डांगेसाहेब ही एक जबरदस्त व्यक्ती होती. त्यांचा वैचारिक रंग लाल होता, पण त्यांचं व्यक्तिमत्त्व अगदी शुभ्र होतं. साधे, सरळ, निगर्वी डांगेसाहेब ही किती महान व्यक्ती आहे, हे पहिल्यांदा कळतच नसे. मी त्यांना जेव्हापासून पाहिलं तेव्हापासून त्यांचे केस पांढरेशुभ्र होते. त्यांचे नितळ, आरपार वेध घेणारे डोळे हे एखाद्या राजकारणी माणसापेक्षा घरातल्या वडीलधाऱ्या माणसारखे होते. ते नेहमी खादीच्या पांढऱ्या किंवा खाकी रंगाच्या शर्टात असत आणि खादीच्या खाकी विजारी परिधान करीत असत. नंतर त्यांच्या शर्टाचा रंग फक्त बदलला. ते केवळ पांढऱ्या रंगाचेच खादीचे शर्ट घालू लागले. डांगेसाहेब दिसायला नाजूक चणीचे होते. पण सभेत बोलायला लागले की त्यांच्यातला निर्धारी, कणखर नेता स्पष्टपणे दृग्गोचर व्हायचा. फार उंच नाहीत आणि फार बुटकेही नाहीत अशा डांगेसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी अशी जादू होती, की माणसं त्यांच्याकडे आकर्षिली जात. त्यांच्या ज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या तेजाने लोक दिपून जात असत.

डांगेसाहेबांचं घर आमच्या ‘प्रीतम’च्या अगदी समोर.. आज जिथं ‘प्रामाणिक’ आहे ना तिथं होतं. तेव्हाची मुंबई होती ती! रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळं आमची मुलं गल्लीत, रस्त्यावर खेळत असत. आमचा टोनी- म्हणजे अमरदीप लहान होता तेव्हापासून डांगेसाहेबांच्या घरी जात असे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा नातू नितीन. डांगेसाहेब पहिल्या मजल्यावर राहत. दोन बेडरूम्सचा बऱ्यापैकी मोठा फ्लॅट होता त्यांचा. रोझा- त्यांची मुलगी- तिथंच राहत होती. बानी देशपांडे त्यांचे पती. रोझा माझ्या वयाच्या. त्यांच्यावर वडिलांच्या विचारांचा ठसा उमटलेला. त्यामुळे त्यांची विचारसरणी पक्की होती. बानी देशपांडेही तसेच.. अगदी ठाम विचारांचे. एक अतिशय ध्येयवादी घर होतं ते!

डांगेसाहेब पहिल्यांदा कधी आमच्या ‘प्रीतम’मध्ये आले ते मला आता आठवत नाही. पण माझ्या पापाजींचा आणि त्यांचा पहिल्यांदा स्नेह जुळला. नंतर माझ्यावरही त्यांची माया जडली. ते हळुवारपणे वागत. मृदू बोलत. बोलताना त्यांचे डोळे काहीसे मिश्कील होत. कोणालाही त्यांची भीती वाटत नसे. घरातल्या एखाद्या ज्येष्ठाप्रमाणे त्यांच्याविषयी आदरयुक्त भावना मनात निर्माण होई. डांगेसाहेबांजवळ दुसऱ्याला समजावून देण्याची खास हातोटी होती; ती मात्र झकासच होती. डांगेसाहेबांना खाण्याचा फारसा शौक नव्हता, (तो शौक बानी देशपांडय़ांना होता.) किंवा उगाच वायफळ गप्पा मारत बसायलाही त्यांना आवडत नसे. पण ते आमच्याकडे महिन्यातून एखादी चक्कर नक्की मारत. एखादं चीज सँडविच ते आवडीनं खायचे. त्यांना चहा आवडे. पण आमच्या हॉटेलमध्ये चहा बनत नसे. मग त्यांच्याकरता आमच्या घरून चहा येत असे. (तोपर्यंत आम्ही ‘प्रीतम’च्या वरच्या मजल्यावर राहायला आलो होतो.)

एकदा छोटा टोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘पापाजी, डांगे अंकल क्या करते है? त्यांचा नेमका व्यवसाय काय आहे? कारण जेव्हा बघावं तेव्हा ते वाचत असताना दिसतात. पण मी गेलो की ते माझ्याकडे हळूच बघतात, हसतात, डोक्यात एखादी छोटीशी टपली मारतात आणि पुन्हा वाचायला लागतात.’’ मी त्याला एवढंच म्हणालो, ‘‘बेटा, ते खूप मोठे लीडर आहेत. मोठा होशील तेव्हा कळेल तुला.’’ त्याला ते लगेच कळलं.

डांगेसाहेब त्यांचं मोठेपण कधीच वागवत नसत. थोर व्यक्तींना त्यांचं थोरपण सांगावं लागत नाही, त्यांच्या वागण्यातूनच ते दिसतं. टोनी, नितीन वगैरे मुलं त्या परिसरात खेळत असायची. सगळ्यांच्या घराची दारं सताड उघडी! पकडापकडीच्या खेळात एका दारातून घुसायचं आणि दुसऱ्या दारातून धूम बाहेर पडायचं असं चालायचं. मी कित्येकदा मुलांना बोलायचो, ‘‘अरे, डांगेसाहेबांना त्रास होईल. मस्ती करू नका.’’ पण एका ठरावीक टेबल-खुर्चीवर वाचत बसलेल्या डांगेसाहेबांना त्याचा कोणताही त्रास होत नसे. ते पुस्तकातून डोकं वर काढत, किलकिल्या डोळ्यांनी मुलांकडे पाहत आणि हसून पुन्हा पुस्तक वाचू लागत. त्यांचं साम्यवादी विचारसरणीवर आणि मुलांवर एकसारखंच प्रेम असावं. भारतीय कम्युनिस्ट विचारांचे ते भीष्माचार्य होते, पण ते त्यांच्या वागण्यातून कधीच दिसत नसे. ते मुलांशी आग्रहाने इंग्रजी भाषेतच बोलत असत. ते ऑक्सफर्ड पद्धतीचं इंग्रजी बोलत. त्यावेळीही ते इंग्रजीचं आंतरराष्ट्रीय महत्त्व जाणून होते. लहान मुलं इंग्रजी बोलताना चुकत असत. त्यांचे उच्चार चुकत असत. डांगेसाहेब ते उच्चार सुधारून देत आणि मुलांना त्यांच्याबरोबर उच्चार करायला लावत. एकदा माझा मुलगा बोलताना ‘पसायकॉलॉजी’ असं म्हणाला. डांगेसाहेबांनी Psychology चं स्पेलिंग तर त्याच्याकडून घोटवून घेतलंच, पण त्याबरोबरच कोणकोणत्या शब्दांत P सायलेंट असतो, Cough (कफ), Tough (टफ), Plough (प्लाऊ )  या शब्दांचे उच्चार असे का असतात, त्यात भिन्नत्व का येतं, हेही त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगितलं. एका छानशा आजोबांचं ते वागणं होतं. सुट्टीच्या दिवशी ही मुलं कोणाच्याही घरात खेळत असायची. जेवणाची वेळ झाली की सौ. डांगे किंवा रोझा किंवा डांगेसाहेब स्वत: सर्व मुलांना घरात जेवायला घालायचे. माझा मुलगा, तुझा मुलगा असा प्रकारच त्यांच्याकडे नव्हता. सौ. डांगे याही अतिशय सत्शील होत्या, सात्त्विक होत्या.

ज्या काळात डांगेसाहेबांचा आणि आमचा परिचय झाला तो काळ देशाच्या घुसळणीचा होता. स्वातंत्र्यलढा सुरू होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. या काळात स्वतंत्र भारत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत होता. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहत होती. ती कळसाला पोचत होती. संयुक्त महाराष्ट्र आकारास येत होता. हे सारं आम्ही डांगेसाहेबांमुळे खूप जवळून बघितलं. तसं पाहिलं तर हॉटेल व्यावसायिक म्हणून आम्ही या धामधुमीतच स्वत:ला स्थापित करण्याच्या प्रयत्नांत होतो. भोवतालच्या या सगळ्या घडामोडींत आमचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, पण डांगेसाहेबांमुळे आम्ही त्याचे सहप्रवासी नक्कीच होतो. त्या काळात डांगेसाहेबांचं घर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं होतं. कितीतरी महान व्यक्तिमत्त्वं त्यांच्याकडे नेहमी येत-जात असत. भारताच्या पंतप्रधान दस्तुरखुद्द इंदिरा गांधी त्यांच्याकडे दोनदा येऊन गेल्या होत्या. मला आठवतं त्याप्रमाणे सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी पहिल्या वेळी त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्या केवळ पंतप्रधान होत्या असं नव्हे; तर त्या जागतिक राजकारणात स्वत:चं अलौकिक स्थान निर्माण केलेल्या एक महत्तम नेत्याही होत्या. आज तुमचा विश्वास बसणार नाही, पण इंदिराजी एका साध्याशा साडीमध्ये डांगेसाहेबांना भेटायला प्रीतमसमोरच्या त्यांच्या घरी आल्या होत्या. त्या खूप नाजूक चणीच्या, पण अतिशय खंबीर दिसत होत्या. आणि एखाद्या वत्सल पित्याप्रमाणे डांगेसाहेब त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्याबरोबर सुरक्षेचं कोणतंही कवच नव्हतं. भारताच्या पंतप्रधानांसोबत पोलिसांची फक्त एक जीप होती. डांगेसाहेबांच्या घराची कोणतीही तपासणी या भेटीपूर्वी झाली नव्हती. मला डांगेसाहेबांनी प्रीतममधून चीज सँडविच घेऊन यायला सांगितलं होतं. डांगेसाहेब जिथं वाचन-लेखनासाठी बसत असत, त्या त्यांच्या खोलीत इंदिराजी बसल्या होत्या. मी तिथं गेलो. डांगेसाहेबांनी माझी इंदिराजींशी ओळख करून दिली. ती करून देताना ते म्हणाले, ‘‘हे कुलवंतसिंग कोहली.. माझे मित्र आहेत.’’ नंतर मी तिथून निघून जाऊ  लागलो तर डांगेसाहेबांनी मला थांबायला सांगितलं. मी काही वेळ तिथं थांबलो. त्यावेळी डांगेसाहेब हे कम्युनिस्ट पक्षाचे भारतातले सर्वेसर्वा होते. पण उभय महानतम व्यक्ती अतिशय साधेपणाने परस्परांना भेटल्या, क्षेमकुशल झालं, आणि त्या निघून गेल्या. मोठय़ांचा साधेपणा हा अंगभूत असतो, त्याची झूल पांघरावी लागत नाही. दुसऱ्यांदा इंदिराजी त्यांना भेटायला आल्या होत्या तेव्हा त्या सत्तेवरून पायउतार झाल्या होत्या. त्याही वेळी त्यांच्याभोवती सुरक्षेचे कवच नव्हते. घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला भेटायला आलेल्या एका सर्वसामान्य स्त्रीसारखाच त्यांचा वावर होता. त्याही वेळी डांगेसाहेबांनी मला चीज सँडविच घेऊन बोलावलं होतं. मी ते घेऊन गेलो होतो. अन् गमतीची गोष्ट म्हणजे डांगेसाहेबांना माझी ओळख करून द्यावी लागली नाही. इंदिराजींनी मला ओळखलं होतं. पुढे आणीबाणीनंतर काही दिवसांनी एकदा झैलसिंग डांगेसाहेबांना भेटायला आले होते. त्याही वेळी मी तिथं गेलो होतो. झैलसिंग यांच्याबरोबर आमचा घरोबा होता. छान सौहार्दाचं नातं होतं. डांगेसाहेबांकडे कोणी मोठी व्यक्ती येणार असेल तर ते अगदी आवर्जून मला बोलावत असत. मीही लगेच जात असे. जी सेवा देता येणं शक्य असेल ती देत असे. पापाजींच्या नंतर डांगेसाहेब हे आमच्यासाठी एक आदरणीय आणि घरातलं वडीलधारं व्यक्तिमत्त्व होतं.

आमच्या समोरच्या फुटपाथवर त्यावेळी गर्दी नसायची. लांब-रुंद फुटपाथ हे मुंबईचं वैभव होतं. (आता हरवलंय ते!) जवळच वालियांचं मोठं दुकान होतं. तीन-चार गाळे एकत्र करून ते दुकान बनलं होतं. दिवाळीच्या दरम्यान वालियांच्या दुकानासमोरच्या फुटपाथवर सुमारे तीस बाय तीस फुटांची भव्य रांगोळी घालत असत. दिवाळीच्या आधी तीन-चार दिवस त्या रांगोळीची तयारी सुरू व्हायची. आमची तर समजूत होती, की वालियांपुढच्या फुटपाथवर रांगोळी पडू लागली की समजायचं- दिवाळी आली! डांगेसाहेब आवर्जून ती रांगोळी बघायला यायचे. तिचं कौतुक करायचे. टिपिकल नेत्यांप्रमाणे डांगेसाहेब अंतर्बा कोरडे नव्हते. जीवनाचा रस ते भरभरून घेत असत. नसत्या उद्योगांत त्यांना रस नसे. पण जिथं जिथं म्हणून सौंदर्य दिसे, तिथं तिथं त्या सौंदर्याचा ते रसिकतेनं आस्वाद घेत. त्यांच्या घरातल्या भिंती दिसत नसत, इतकी पुस्तकं त्यांच्याकडे होती.

आमचं लोणावळ्याला एक घर आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आम्ही तिथं जात असू. डांगेसाहेबही बऱ्याचदा खंडाळ्याला जात. त्यांच्या खंडाळ्याच्या वास्तव्याच्या जागी मी एकदा गेलो होतो. त्या बंगल्याचं नाव माझ्या आठवणीप्रमाणे ‘झार’ असं होतं. तो बंगला बहुधा त्यांच्या पक्षाचा असावा. त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. चहा वगैरे पाजला. मी त्यांना आमच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, तेव्हा ते हसून म्हणाले, ‘‘कुलवंतजी, कुठं वेळ आहे? इथंही मी आराम करायला आलो नाहीये. आता थोडय़ा वेळानं अमकी एक मीटिंग आहे, नंतर तमकी एक मीटिंग आहे. बस्स.. असंच आमचं काही ना काही सुरूच असणार! तुम्ही आलात, भेट झाली, हेच खूप झालं!’’

खरंच होतं त्यांचं. डांगेसाहेबांशी माझी सहजगत्या भेट होत होती. जी माणसं लोकांना देवासारखी होती, ती मुंबईनं माझ्या झोळीत सहजपणे घातली होती. डांगेसाहेबांची विचारसरणी ‘देव’ मानत नाही; पण मी मानतो ना!

कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 12:58 am

Web Title: kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part 5
Next Stories
1 तुमसा नहीं देखा!
2 राजजी
3 हॉलीवूड लेन
Just Now!
X