उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील चारा छावणीसाठी आता १४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चारा छावणी सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरही संस्था पुढेच येत नसल्याचे चित्र होते. कारण चारा छावणीचे देयके उशिरा दिली जातात, असा पूर्वीचा अनुभव असल्याचे काही संस्थांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर निधी मंजूर केला असून, अगदी ८-१५ दिवसांत हवे असल्यासही देयके मंजूर करणे शक्य असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. मराठवाडय़ात ९ चारा छावण्या सुरू झाल्या असून, त्यात साडेपाच हजार जनावरे आहेत. चारा छावणी सुरू करणाऱ्या संस्थांना कडक नियम घालण्यात आले होते. ते शिथिल केले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर निधीची उपलब्धता करण्यात आल्याचे दांगट यांनी सांगितले.