वैजापूरमध्ये राष्ट्रवादीशी आघाडी

जिल्ह्य़तील ४ नगरपालिकांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार आहे. पैठण, खुलताबाद, कन्नड व गंगापूर येथे स्वबळ आजमावताना वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली जाईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

१८ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून प्रदेश काँग्रेसने निवडणुका लढविण्यासाठी आघाडी करायची की नाही, याचा निर्णय जिल्हा पातळीवर सोपविला होता. त्यानुसार शुक्रवारी प्रभागातील इच्छुक उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवनात घेण्यात आल्या. वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आघाडी करण्याचा प्रस्ताव लिखित स्वरूपात दिला आहे. वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, आमदार सुभाष झांबड, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील हे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून आघाडीबाबतचा अंतिम निर्णय घेतील. प्रभागातील इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून जेथे दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील त्यांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात येतील, असे सत्तार म्हणाले. आज घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार नितीन पाटील, किरण डोणगावकर, अनिल सोनवणे, नंदकिशोर सहारे, फिरोज पटेल आदींची उपस्थिती होती.