दोन महिन्यांत साडेतीन टीएमसी पाण्याचा व्यय

या वर्षीचा उन्हाळा मे महिन्यापेक्षाही एप्रिलमध्येच अधिक कडक राहिला आहे. त्यामुळे बाष्पीभवनचा वेगही मेपेक्षा एप्रिल महिन्यातच अधिक १.७० ते १.८० दशलक्ष घनमीटरने नोंद झाला असून, एप्रिल व मे या जवळपास दोन महिन्यांत जायकवाडी जलाशयातून १०० दशलक्ष घनमीटर म्हणजे सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याचा व्यय झाला.

औरंगाबादकरांच्या अंगातून सध्या घामाच्या धारा वाहात आहेत. तापमान ४१ ते ४२ अंशांवर राहिले आहे. तापमानामुळे बाष्पीभवनही मोठय़ा प्रमाणात होत असून, जलसाठय़ातील पाण्याचा व्यय झपाटय़ाने होत आहे. मराठवाडय़ातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या जायकवाडी धरणात आजच्या परिस्थितीत २० टक्के पाणीसाठा असून, त्यातून दर दिवशी दीड दशलक्ष घनमीटर पाणी बाष्पीभवनामधून व्यय होत आहे. १.४ किंवा १.५ या वेगाने बाष्पीभवन होत आहे. मे महिन्यातील या परिस्थितीपेक्षा एप्रिलमध्ये बाष्पीभवनचा वेग अधिक होता. एप्रिलमधील वेग हा १.७० ते १.८० असा  रहिलेला आहे.

बाष्पीभवनाचा वेग हा केवळ तापमानावरच अवलंबून नसून वाऱ्याचा वेगही पाहिला जातो. दिशाही पाहिली जाते. साधारणत: बाष्पीभवन होऊ नये यासाठी एक रासायनिक द्रव पाण्यावर सोडला जातो. असा द्रव पाण्याच्या पृष्ठभागावर एकप्रकारे तवंगासारखा (फ्रेम) तयार होतो. मे महिन्यात हवेचा वेग आणि लाटा अधिक असतात त्यामुळे तवंग हलला जातो. त्याची रचना मोडली जाते. त्यामुळे जायकवाडीत आपण असा रासायनिक द्रव टाकू शकत नाहीत. जायकवाडी हे पक्ष्यांच्या अधिवासाचे प्रमुख ठिकाण आहे. देश-विदेशातील पक्षीही येथे येतात. त्यामुळे रासायनिक द्रवामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यातून त्यांच्या अधिवासावरही मर्यादा येऊ शकतात. त्यासाठी रासायनिक द्रवाचा वापर टाळला जातो. सध्या १.४ ते १.५ अर्थात दीड दशलक्ष घनमीटर या वेगाने बाष्पीभवन होत आहे. एप्रिलमध्ये हा वेग या वर्षी अधिक होता. एप्रिलचा वेग १.७० ते १.८० दशलक्ष घनमीटपर्यंत नोंद झाल्याची माहिती औरंगाबादच्या कडा विभागातील सहायक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले.

गतवर्षी अत्यल्प जलसाठा

मागील काही वर्षांत जायकवाडीत जलसाठा अत्यल्प होता. पाण्याची पातळी जात्याखाली होती. त्यामुळे गत काही वर्षांतील बाष्पीभवनाचे परिमाण नसले तरी या वर्षीचा एप्रिलचा वेग अधिक होता, असेही कडा कार्यालयाकडून सांगण्यात आले.