खैरेंकडून दानवेंचा क्लोज मित्र असल्याचा उल्लेख

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पारपत्र सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात परस्परांवर टीका करण्याची आणि चिमटे काढून राजकीय वातावरण तापवणे टाळले. समोर पत्रकार बसले आहेत, त्यामुळे मी काही टीकात्मक बोलणार नाही, नाहीतर त्यांना (पत्रकारांना) खाद्य मिळेल, असे खासदार खैरे यांनी खासदार दानवे यांच्याकडे स्मित हास्याने पाहात सांगितले. शिवसेना, भाजपचे राज्यपातळीवर ताणले गेलेले संबंध पाहता या कार्यक्रमात दोन्ही पक्षातील नेत्यांकडून पारपत्र केंद्रासाठीचे श्रेय घेण्याची स्पर्धा व परस्परांना चिमटे काढण्याची संधी साधली जाईल, दानवे-खैरेंची जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळेल, असाच कयास बांधला जात होता. मात्र तसे फार काही घडले नाही. शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेत्यांनी अधिक उपस्थिती लावून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक निर्णयांचे गुणगान गाऊन हा सोहळा एकप्रकारे भाजपनेच कार्यक्रम हायजॅक केल्याचे दिसून आले.

येथील छावणी परिसरातील पोस्टाच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारपत्र सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर प्रमुख उपस्थिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुंबईच्या पारपत्र विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, जनरल पोस्टमास्तर प्रणवकुमार यांची होती.

पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आपलाही हातभार लागला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. एका केंद्रीय मंत्र्याशी २० खासदारांना जोडले जात असते. योगायोगाने आपण नेमके परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या २० खासदारांच्या गटात असल्याचे सांगताना दानवे यांनी औरंगाबादला पारपत्र सेवा केंद्र दिले पाहिजे, असा आग्रह स्वराज यांच्याकडे धरला होता, असे सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद शहराने मोठे केले आहे. यापुढेही करतील. काळजी करू नका, असे ते मिश्किलपणे म्हणाले.

दानवे यांच्या भाषणाचा संदर्भ पाहून औरंगाबादेत पारपत्र सुरू करण्यासाठी आपण यूपीए सरकारमधील तत्कालीन परराष्ट्र मंत्री व नुकतेच भाजपत दाखल झालेले कर्नाटकातील ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांच्यासह परराष्ट्र सेवेतील निरुपमा राव ते ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी कसा सतत संपर्कात होतो, याची तपशीलवार मांडणी केली. निरुपमा राव या तत्कालीन मराठावाडा विद्यापीठाच्या विद्याíथनी असल्याने त्यांनी केंद्रासाठी कशी अनुकूलता दर्शवली हे सांगितले. केंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्याची जंत्रीच त्यांनी मांडली. दानवेंकडे पाहून आता काही टीका करत बसत नाही, समोर बसलेल्या पत्रकारांना नवी राजकीय बातमी मिळेल, असे म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला. आपण लवकरच पारपत्रासाठीची कागदपत्रे तपासणीसाठी सर्व पोलीस ठाण्यांना अँड्रॉइड टॅब्लेट देणार असल्याची घोषणाही खैरे यांनी केली.

कार्यक्रमाला भाजपचे आमदार अतुल सावे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, भाजपचे नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.

एका संदेशावर पोस्टाचा प्रतिनिधी दारात

पोस्टाच्या विविध योजनांसह लवकरच सुरू होत असलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) सेवेसाठी मोबाईलच्या एका संदेशावर पोस्टाचा प्रतिनिधी आपल्या दारी येणार आहे. पोस्टाची यापुढे घरपोच सेवा देण्यावर भर राहणार आहे. पारपत्र ही परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सेवा असली तरी त्यात पोस्टाचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची राहणार असल्याने ही सेवाही शक्य तेवढय़ा लवकर घरपोच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.