लष्करात उच्च पदावर काम करणाऱ्या ४३ वर्षांच्या महिलेवर अत्याचार करून लूट करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना मोक्का अंतर्गत चालणाऱ्या प्रकरणाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दीपक जावळे, अभय पोरे, विजय बडे व सुनील एखंडे अशी आरोपींची नावे आहेत. १० एप्रिल २०१० मध्ये बीड-पुणे रस्त्यावर चार चाकी गाडी अडवून या दरोडेखोरांनी लूट केली होती, तसेच महिलेवर अत्याचारही केले होते. या प्रकरणी ३४ साक्षीदार तपासण्यात आले. शेतमजूर महिला आणि अत्याचारित महिलेची मदत करणाऱ्या दुचाकीस्वाराची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पुणे येथून ४३ वर्षांची महिला आपल्या कुटुंबीयांसह व सुरक्षा रक्षकासह आली होती. दर्शन घेऊन पुण्याला परतत असताना मांजरसुंबा घाटात ते जेवणासाठी थांबले होते. तेथे काही अंतरावर दीपक जावळे हा अट्टल गुन्हेगार आपल्या मित्रांसह जेवणास आला होता. त्याने या कुटुंबीयांना पाहिले व पुण्याकडे जात असताना एक कार भाडय़ाने घेऊन त्यांचा पाठलाग केला. चिंचोडी फाटय़ाजवळ कार अडवून दरोडेखोरांनी महिला अधिकाऱ्याचे पती, मुलगा आणि वॉचमन यांना खाली उतरविले. त्यांच्याकडील रोख रक्कम व वॉचमनच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. महिला अधिकाऱ्याला कारमध्ये ओढून बसविले आणि त्यानंतर दीपक जावळे व अभय पोरे या दोघांनी विवाहित महिलेवर अत्याचार केले. धावत्या कारमध्येच त्यांना सोडून ते पळून गेले. त्या बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आडरानात या महिलेची मदत केली.

महिलेच्या पतीस आणि अन्य व्यक्तीस त्याने चिंचोडी फाटय़ाजवळ आणून सोडले. घडलेला प्रकार महिलेच्या पतीने पुतण्यास पुणे येथे कळविला. त्याने तातडीने पोलिसांना ही बाब कळविली. त्यांनतर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना बीड जिल्हय़ाच्या हद्दीत असल्याने अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार दरोडेखोरांना अटक केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात रंजन यांनी या गुन्हय़ातील आरोपींना मोक्का कायदय़ाखाली अटक करण्याची सूचना केली. पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. दरोडय़ाच्या गुन्हय़ातील प्रमुख आरोपी दीपक जावळे याच्यावर पूर्वी १७ गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे. चारही आरोपींच्या विरोधात दोषारोप दाखल झाल्यानंतर सोमवारी त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली.