शिवसेना आमदारांचाच आरोप ; केवळ कागदनोंदीचा विकास

काही नेते वादग्रस्त ठरतात किंवा वादात राहतात. त्यात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे एक. मनसेत असतानाही वादग्रस्त ठरलेले जाधव शिवसेनेतून निवडून आले तरी त्यांची प्रतिमा कायम आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनाच जाधव यांनी थेट लक्ष्य केले आहे. खैरे यांच्या खासदार निधीत अपहार झाल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

खासदार खरे यांनी निधीतून कन्नड तालुक्यात आतापर्यंत २ कोटी ३९ लाख रुपये ‘विकास’ कामांसाठी दिले. रस्ते, गटारांची कामे झाल्याच्या कागदोपत्री नोंदी करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कामे झालेली नाहीत. या साऱ्या कामांमध्ये कोटय़वधींचा अपहार झाल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. देभेगाव आणि आलापूर या गावांमध्ये काम न करताच देयके उचलली असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कन्नड तालुक्यातील आलापूर या गावी खासदार निधीतून २०१५-१६ मध्ये सुखलाल रामचंद्र सोनवणे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. तो रस्ता झाल्याची कागदपत्रे बांधकाम विभागामध्ये आहेत. मात्र, ज्यांच्या घराकडे रस्ता केला असे सांगण्यात येते तो माणूस आलापूरचा नाहीच, असे प्रमाणपत्र या गावाच्या सरपंचांनी दिले आहे. या गावातील केवळ एक रस्ता नाही तर बापू घोडके तसेच तुकाराम गायकवाड ते साहेबराव कोरडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता झाला नाही. या गावातून खासदार निधीची कोणतीही कामे झाले नाहीत, असे प्रमाणपत्र सरपंचाने दिले आहे. जी गावे या मतदारसंघात नाहीत, अशा गावांचा निधीही कन्नडमध्ये खासदार खरे यांनी दिल्याचाही आरोप आहे. सावरखेडा, शिंदेवाडी, मांडवा, घोडेगाव, खापेश्वर ही गावे कन्नड तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे. या तालुक्यात सावरखेडा ते शिंदेवाडी- मांडवा रस्त्याचे मजबुतीकरण तसेच अन्य दोन गावांत मजबुतीकरणासाठी खासदार निधी देण्यात आला होता.

याच तालुक्यातील देभेगाव येथे ‘ड्रेनेज’च्या कामासाठी खासदार निधीतून कोटय़वधी रुपये मंजूर करण्यात आले. पण काम काही पूर्ण झाले नाही. दिलेला निधी खर्च केल्यानंतर त्यातून विकास होणे अपेक्षित होते. मात्र काहीच घडले नाही. खासदार निधीतील या अपहाराच्या चौकशीची मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी  केली आहे.

खासदार चंद्रकांत खरे यांनी देभेगावामध्ये नालीची नऊ कामे केली. त्याची लांबी ४५० फुटांची आहे. त्याची किंमत २७ लाख रुपये एवढी होती. म्हणजे एका फुटासाठी सात हजार रुपये. या गावात जिल्हा परिषदेची शाळा वगळता अन्यत्र कामेच झाली नाहीत. गावकरीही तसाच आरोप करतात.

कन्नड मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार जाधव यांनी रायभान जाधव विकास आघाडीच्या नावाने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. तेव्हापासून आमदार जाधव शिवसेना नेत्यांवर अधिक चिडलेले आहेत. यातूनच हे आरोप होत असल्याचे सांगण्यात येते. या आरोपाला खासदार खरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्यातील वादाची किनार असल्याचा दावाही सेनेतील खासदार खरे समर्थक करतात. खासदार खैरे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून केला जातो, असेही शिवसेनेत बोलले जाते.

खासदार निधीतून कामे मंजूर करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले जाते. त्याची प्रशासकीय मान्यता आणि कंत्राटदार ठरविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होते. त्यामुळे यामध्ये काही घोळ झाले आहेत का, हे तपासले जाईल. मात्र, आमदार जाधव करत असलेले आरोप अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. जाधव यांनी केलेले सारे आरोप हे खोटे आहेत.  चंद्रकांत खैरे, शिवसेना खासदार

कन्नड तालुक्यातील खासदार निधीतील अनागोंदीची चौकशी केली जाईल.  नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी 

निवडणुकीतील वादाची किनार?

कन्नड मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार जाधव यांनी रायभान जाधव विकास आघाडीच्या नावाने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. तेव्हापासून आमदार जाधव शिवसेना नेत्यांवर अधिक चिडलेले आहेत. यातूनच हे आरोप होत असल्याचे सांगण्यात येते. या आरोपाला खासदार खरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्यातील वादाची किनार असल्याचा दावाही सेनेतील खासदार खरे समर्थक करतात.