मराठवाडय़ात घसरण थांबविण्याचे प्रयत्न सुरू

मराठवाडय़ात घसरणीला लागलेल्या शिवसेनेला बळकटी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. शिवसंपर्क अभियानाच्या नावाखाली सुरू केलेला हा दौरा ‘एक फॉर्म आणि सरकारी काम’ या स्वरूपातील होता. सेनेकडून पदाधिकाऱ्यांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्याचबरोबर सध्याच्या पदाधिकाऱ्यांविषयी शिवसैनिकांमध्ये कोणत्या स्वरूपातील चर्चा आहे, याचीही चाचपणी करण्यात आली.

संपर्कप्रमुखांच्या कार्यशैलीबाबत काही जणांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केल्याची चर्चा मुंबईच्या नगरसेवकांना ऐकायला मिळाली. उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या संपर्कप्रमुखाविषयी लोहारा तालुक्यातून आलेल्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या होत्या, असे एका नगरसेवकाने औरंगाबाद येथे सांगितले. केवळ उस्मानाबादच नाही तर प्रत्येक जिल्ह्य़ात हा सूर होता. काहींनी आमदारांच्या तक्रारी केल्या तर काहींनी पालकमंत्र्यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली.

संघटनात्मक पातळीवर सेना मजबूत कशी करता येईल व पक्ष क्रमांक एकचा कसा होईल यासाठी देण्यात आलेल्या प्रश्नावलीमध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती विचारण्यात आली होती. जिल्हा परिषद गट व गणनिहाय उपविभागप्रमुख आहेत काय, गाव तेथे शाखा आहे काय, बूथप्रमुखांची नेमणूक झाली आहे काय, या प्रश्नांबरोबरच गावातील विरोधी पक्षाच्या तुलनेमध्ये सेना कोणत्या स्थानावर आहे, सेनेची सामाजिक, संघटनात्मक व राजकीय वाटचाल कशी असावी, स्थानिक प्रश्नावर कोणते आंदोलन करता येईल, ते कधी हाती घेणार, सरकारने दिलेल्या वचनाची अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यास कोणती पावले उचलली, प्राथमिक सदस्यत्वाचे किती फॉर्म भरले, अशी विचारणा करणारे प्रश्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भरून घेण्यात आले. मुंबईतील नगरसेवकांनी स्थानिक पदाधिकारी व संपर्कप्रमुखांच्या कामाची माहिती व त्यांच्याविषयीच्या तक्रारीही जाणून घेतल्या.

मराठवाडय़ात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना घसरणीला लागली आहे. सध्या मराठवाडय़ात सेनेचे १२ आमदार आहेत. औरंगाबादमध्ये तीन आमदार संजय शिरसाट, संदीपान भूमरे व हर्षवर्धन जाधव. शिवसंपर्क अभियानाच्या औरंगाबादच्या दौऱ्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी दांडी मारली. त्यांनी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विरोधात स्वत:च्या रायभान जाधव विकास आघाडीचे स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. या पाश्र्वभूमीवर कन्नड मतदारसंघातील शिवसेना हा नेत्यांसमोर उभा ठाकलेला मोठा पेच असल्याचे सांगण्यात येते. दोन आमदार असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये केवळ १८ सदस्यच निवडून आणता आले. काँग्रेसबरोबर तडजोडीच्या राजकारणातून जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविण्यात सेनेला यश आले आहे. जालना जिल्ह्य़ात सेनेचे एकमेव आमदार अर्जुन खोतकर सध्या राज्यात मंत्री आहेत. ते शिवसंपर्क अभियानाच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्यात तसे दिसले नाहीत, मात्र ते भेटून गेल्याचे नंतर सांगण्यात आले. मात्र जालन्यातील संघटनात्मक बैठकीला त्यांचीही गैरहजेरी होती. बीड आणि लातूर जिल्ह्य़ात शिवसेनेला कार्यकर्ते शोधावे लागतात. या दोन्ही जिल्ह्य़ात सेनेचा एकही आमदार नाही. लातूरमध्येही निवडून आलेला एकही पदाधिकारी नाही. परभणीमध्ये राहुल पाटील हे सेनेचे आमदार. मोहन फड हे सेनेचे सहयोगी आमदार होते, मात्र त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या जिल्हय़ात जिल्हा परिषदेमध्ये १२ सदस्य आहेत. उस्मानाबादमध्ये ज्ञानराज चौगुले आणि खासदार रवींद्र गायकवाड असले तरी त्यांचा प्रभाव केवळ उमरगा मतदारसंघापुरताच आहे. अन्य तीन मतदारसंघांत सेनेचे कार्यकर्ते असले तरी त्यांचे वाद टोकाला गेले आहेत. याच मतदारसंघात संपर्कप्रमुख आले की खिशाला चाट बसते, अशी तक्रार मुंबईच्या नगरसेवकांकडे करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात जिल्हा परिषद होती, मात्र आता चित्र बदलले आहे. जयप्रकाश मुंदडा हे या जिल्ह्य़ातील एकमेव आमदार, मात्र सेना काही वाढली नाही. घसरणीला लागलेल्या शिवसेनेची संघटनात्मक वीण पुन्हा घट्ट व्हावी म्हणून शिवसंपर्क अभियान किती उपयोगी पडेल, याविषयी पक्षातूनही साशंकता व्यक्त होत आहेत. राजकीयदृष्टय़ा मराठवाडय़ाने नेहमी सेनेची पाठराखण केली होती, मात्र या वेळी भाजपच्या मागे हा प्रदेश असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र गावातील बडा पुढारी आपल्या पक्षात घ्यायचा आणि त्याला रसद देऊन निवडून आणायचे असल्याने ते सूत्र कसे मोडीत काढता येईल, याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील चांगल्या माणसाला शोधून मातब्बर पुढाऱ्याच्या विरोधात तो उमेदवार म्हणून द्यायचा आणि त्याला रसद पुरवायची, असेही सूत्र असावे, अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती.

संघटनात्मक पातळीवर बदलाची शक्यता

मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे शेतीच्या प्रश्नाचे ज्ञान ‘अफाट’ अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. सरकारी काम आणि शेती याविषयीही एक प्रश्नावली शिवसंपर्क अभियानामध्ये भरण्यास देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी ही एक फार्म आणि सरकारी काम याभोवती केंद्रित असल्याचे चित्र दिसून आले.

सेनेमध्ये जय भवानी असा आवाज दिल्यावर प्रतिसाद देणारा एक वर्ग राबतो आहे आणि दुसरा वर्ग मोठय़ा गाडय़ांमधून हातात रुद्राक्षाच्या माळा आणि पाच बोटात अंगठय़ा घालणारा आहे. या दोघांमधील दरी कमी करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर सेना येत्या १५ दिवसांत काही बदल करणार आहे. त्यात कोणते चेहरे येतात, त्यावर संघटनेची धाटणी आणि वीण ठरण्याची शक्यता आहे.