कर्जमुक्तीच्या संकल्पावरून शिवसेना तसुभरही मागे हटणार नाही. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विधिमंडळाच्या पटलावर आश्वासन दिले आहे. ते न पाळल्यास हक्कभंग होतो. त्यामुळे आम्ही कर्जमुक्तीची वाट पाहत आहोत, असे सांगत पालकमंत्री रामदास कदम यांनी कर्जमुक्तीच्या मागणीचे समर्थन केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही ठरावीक रकमेपर्यंत कर्जमाफी देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचा मार्ग अवलंबला जाईल, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘कोण चंद्रकांत पाटील, हे आम्हाला माहीत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आहोत’ असेही कदम म्हणाले.

कोकणात पुन्हा एकदा जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाची आखणी नव्याने सुरू आहे. मात्र, त्यावर काहीही बोलायचे नाही असे म्हणत कदम यांनी या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. औरंगाबाद येथे खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीसाठी ते आले होते. मराठवाडय़ात शिवसेना घसरणीला का लागली आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. आम्ही सर्व जण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. अनेक नेत्यांना बाहेर पडता आले नाही, असे सांगत त्यांनी सेना मराठवाडय़ात पाठीमागच्या बाकावर गेल्याची आकडेवारी चुकीची असल्याचाही दावा त्यांनी केला.