तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दागिन्यांचे दुकान फोडल्याप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या माध्यमातून चोरीचे मोठे रॅकेट असल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये पाच गुन्हे उघडकीस आले असून, गावठी पिस्तुलासह ७ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरटय़ांकडून जप्त करण्यात िहगोली पोलिसांना यश आले.

कनेरगाव नाका येथे गेल्या आठवडय़ात दुकान फोडून चोरटय़ांनी मोठा ऐवज पळवला होता. इतकेच नाही तर कळमनुरी येथील दागिन्यांचे दुकानही असेच फोडले होते. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुभाष केंद्रे तसेच विनायक लंबे, तान्हाजी चेरले आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांनी एक पथक स्थापन केले होते. या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला गुन्ह्यात वापरलेली सॅन्ट्रो कार जप्त केली. जुन्नू सिंग ऊर्फ फार्मुलसिंग टाक यास अटक करून तपासाच्या कामाला प्रारंभ केला असता संशयित दिलीपसिंग छोटूसिंग सुरखे टाक, गजानन कोंडबाराव देशमुख (रा.सेनगाव) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामध्ये कनेरगाव नाका येथील दुकानातून चोरलेल्या चांदीच्या मालाचा समावेश असल्याने आढळून आले. पोलिसांना चोरीच्या प्रकरणातील धागेदोरे हाती लागत असताना त्यांनी सेनगाव टी पॉइंटवर मदन सुभाष मदूरवार याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले. त्याची अधिक चौकशी केली तेव्हा जितसिंग टाकसह सलीम पठाण, शेरखाँ पठाण, (रा.आजम कॉलनी, जिंतुर), रूपसिंग चतुरसिंग टाक (रा. हिंगोली) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून हिंगोली शहरात केलेल्या चोरीचे ९० हजार रुपये किमतीचे दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली. अधिक तपासात सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या सुमारे १ लाख रुपये किमतीच्या सबमर्सबिल मोटारी जप्त करण्यात आल्या. तसेच ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक कार जप्त करण्यात आली.