औरंगबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय. बारा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे औताडे यांचे पद धोक्यात आले आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अठरा संचालक आहेत. हमाल माथाडी संघटनेच्या पाठिंब्यावर ६ सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसच्या संजय औताडे यांची सभापती पदी वर्णी लागली होती. आता हमाल माथाडी संघटनेनं काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर १२ जणांनी सभापतीविरोधातील अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला. कामकाजामध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप करत हा ठराव दाखल करण्यात आलाय.

औरंगाबाद कृषीउत्पन्न बाजार समितीची एकूण सदस्य संख्या १८ असून यात व्यापारी-२, हमाल-२, ग्रामपंचायत-५ सोसयटी ९ अशी स्थिती आहे. यामध्ये भाजपचे ७ तर काँग्रेसचे ६ संचालक आहेत. हमाल माथाडीच्या सचालकांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे काँग्रेसची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.