अफगाणिस्तानमधील हेल्मंड प्रांतात न्यू काबूल बँकेच्या शाखेजवळ कारद्वारे घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात २० जण ठार झाले आहेत. या घटनेत ५० हून अधिक जखमी झाले असून अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हेल्मंड प्रांताची राजधानी लष्करगड येथे न्यू काबूल बँकेची शाखा आहे. महिन्याचा पगार काढण्यासाठी बँकेत अफगाण सैन्याचे जवान आणि स्थानिकांची गर्दी होती. स्थानिक वेळेनुसार दुपारी बाराच्या सुमारास कारद्वारे बँकेबाहेर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यात २० जण ठार झाले असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पगार होणार असल्याने बँकेत सैन्याच्या जवानांची गर्दी असते. नेमकी हीच वेळ साधून हा स्फोट घडवण्यात आला आहे.

हेल्मंड प्रांताच्या अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरुवातीला एका बंदुकधारी दहशतवाद्याने बँकेवर गोळीबार केल्याचे वृत्त होते. मात्र स्थानिक अधिकाऱ्याने हे वृत्त फेटाळून लावले. स्फोटाच्या आवाज येताच बँकेतील सुरक्षा रक्षकांनी कारच्या दिशेने गोळीबार केला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तालिबान आणि आयसिस या दोन्ही दहशतवादी संघटनांनी अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.