बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शिया नेते युवराज करीम आगाखान यांच्यासह पाच जणांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्मविभूषण सन्मान प्रदान केला. इतर ४८ जणांना पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
कायदेतज्ज्ञ के.के.वेणगोपाळ, कर्नाटकातील मंजुनाथ स्वामी मंदिरातील धर्मगुरू वीरेंद्र हेगडे, अणुवैज्ञानिक एम. रामस्वामी श्रीनिवासन यांना पद्मविभूषणने गौरवण्यात आले. यावेळी अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा उपस्थित होते. अमिताभ यांनी बंदगळा सूट परिधान केला होता, टाळ्यांच्या गजरात त्यांनी सन्मान स्वीकारला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी उपस्थित होते. अभिनेते दिलीप कुमार आजारी असल्याने उपस्थित राहिले नाहीत.
पद्मभूषणच्या मानकऱ्यांपैकी चित्रपट निर्माते जहानू बारूआ, कॅनडाचे गणितज्ज्ञ मंजुळ भार्गव, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, आध्यात्मिक गुरू स्वामी सत्यमित्रआनंद गिरी, घटनातज्ज्ञ सुभाष सी.कश्यप, संप्रेरकविज्ञानतज्ज्ञ अंबरिश मित्तल उपस्थित होते. महिला हॉकीपटू सबा अंजुम, मंगळ मोहिमेचे प्रकल्प संचालक एस.अरूणन, भारतविद्यातज्ज्ञ बेटिना शारदा बॉमेर, भारतीय-अमेरिकी अर्थतज्ज्ञ नदारादन राजशेट्टी, नीती आयोगाचे सदस्य बिबेक बेब्रॉय यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी १०४ व्यक्तींना पद्म सन्मान जाहीर झाले होते त्यात ९ पद्मविभूषण, २० पद्मभूषण व ७५ पद्मश्री सन्मानांचा समावेश होता. त्यात १७ महिला होत्या. १७ परदेशी नागरिक होते.
पद्मश्री सन्मानार्थीपैकी दोन जण अनुपस्थित होते. पद्मश्री सन्मान संगीतकार रवींद्र जैन, हिंदी कवी सुनील जोगी, गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू वैद्य राजेश कोटेचा, प्रसिद्ध लेखक व स्वातंत्र्य सेनानी लँबर्ट मस्कारहन्स, गायक तृपत्ती मुखर्जी, शिलाँग चेंबर कॉयरचे संस्थापक नील हेरबर्ट नोंगकिनरिह, मणीपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष टी. व्ही. मोहनदास पै व पर्यावरण कार्यकर्ते जादव पायेंग, भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिताली राज, पोर्तुगीज योगा गुरू अमरता सूर्यानंद महाराजा, एनसीइआरटीचे माजी संचालक जे.एस. राजपूत, दक्षिणेतील अभिनेते कोटा श्रीनिवास राव, हिंदी लेखक मनू शर्मा, इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक एस.के.शिवकुमार, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील नेत्रतज्ज्ञ योगराज शर्मा, आसामी लेखक लक्ष्मीनंदन बोरा यांना प्रदान करण्यात आला.