गोमांस घेऊन जाणाऱ्यांना धडा शिकविला हे योग्यच : राजा सिंह

मृत गायीची कातढी काढत असताना किंवा गोमांस घेऊन जात असताना ज्या दलित व्यक्ती आढळल्या त्यांना चांगलाच धडा शिकविण्याची गरज होती, असे वक्तव्य भाजपचे वादग्रस्त आमदार ठाकूर राजा सिंह यांनी गुजरातमधील उना येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन केल्याने खळबळ माजली आहे.

उना येथे दलितांना गौरक्षकांनी जी मारहाण केली ते योग्यच झाले कारण जो दलित वर्ग गोमांस भक्षण करतो त्यांच्यामुळे अन्य दलित वर्ग बदनाम होत आहे, असे राजा सिंह यांनी फेसबुकवर म्हटले आहे. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहाल मतदारसंघातील आमदार असून त्यांना तेथे राजाभैया म्हणून ओळखले जाते. गायींचे रक्षण करणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

ज्या गौरक्षकांनी काही दलितांना जो धडा शिकविला त्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे, चांगल्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे, गोमातेला भारतमातेचा दर्जा दिल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असे राजा सिंह यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. सर्वधर्मनिरपेक्ष, राजकीय नेते विशेषत: मायावती यांना आपण सांगू इच्छितो की, काही मोजक्या दलितांमुळे समाजातील अन्य दलित बदनाम होत आहेत. हैदराबादमध्ये अनेक दलित गौरक्षक असून आपल्यासमवेत गायींचे रक्षण करतात असे ते म्हणाले.