उज्जन येथील विक्रम विद्यापीठाच्या कुलगुरूंवर करण्यात आलेला हल्ला लांच्छनास्पद असून अशा हल्ल्यांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला काळिमा फासला गेला आहे, अशी टीका काँग्रेसने केली. मध्य प्रदेशात शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन कुलगुरू जे.एल.कौल यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केली होती.
मध्य प्रदेश राज्यात शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना घरभाडे देण्याची सक्ती करू नये, तसेच त्यांचे शुल्कही माफ केले जावे. काश्मीरमध्ये ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत त्यांना एवढे सहकार्य करा असे आवाहन उज्जन येथील विक्रम विद्यापीठाचे कुलगुरू कौल यांनी राज्यातील नागरिकांना केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त झाले.
उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये झालेल्या जलप्रलयानंतर तेथील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन कुलगुरूंनी का केले नाही, असा सवाल करीत कार्यकर्त्यांनी कौल यांच्या कार्यालयाची मोडतोड केली होती. तसेच, त्यांच्याशीही गैरवर्तन केले होते. या हल्ल्यानंतर कुलगुरूंची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या हल्ल्याची काँग्रेस पक्षाने तिखट शब्दांत निर्भर्त्सना केली आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध बिघडतील, अशी टीका केली आहे.