गेल्या काही महिन्यांपासून अण्णा द्रमुकमध्ये सुरु असलेली अंतर्गत धुसफूस आणखीनच वाढली आहे. पन्नीरसेल्वम गटाच्या मागणीनंतर बुधवारी पक्षाच्या मुख्यालयातून शशिकला यांचे बॅनर हटवण्यात आले आहेत. पक्षाच्या मुख्यालयाचे पावित्र्य कायम राखण्यासाठी शशिकला यांचे फोटो आणि बॅनर तात्काळ हटवावेत, अशी मागणी मंगळवारी पन्नीरसेल्वम गटाने केली होती. ही मागणी मान्य करत पक्षाने त्यांचे फोटो आणि बॅनर पक्षाच्या मुख्यालयातून हटवले आहेत.

शशिकला यांचे फोटो आणि बॅनर बुधवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयातून हटवले आहेत. पक्षाने केलेली कारवाई हे सकारात्मक पाऊल असल्याचे पन्नीरसेल्वम गटाने म्हटले असून, या कारवाईचे स्वागत केले आहे. पन्नीरसेल्वम गटाचे नेते ई. मधुसूदन यांनी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयाचे पावित्र कायम राखण्यासाठी शशिकला यांचे फोटो आणि बॅनर हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. पक्षाने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. मधुसूदन यांनी सातत्याने ही मागणी केली होती. त्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे, असे पन्नीरसेल्वम गटाचे मीडिया समन्वयक के. स्वामीनाथन यांनी सांगितले. या कारवाईने आम्ही खूश आहोत. कार्यकर्त्यांनी शशिकला यांचे बॅनर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांतील सकारात्मक चर्चेसाठी आता चांगले वातावरण तयार झाले आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, सोमवारी पन्नीरसेल्वम गटाने ‘विलिनीकरण’ मुद्दा उपस्थित करण्याआधी पक्षाच्या महासचिवपदावरून शशिकला यांना हटवण्याची मागणीही केली होती. तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी केली होती.