निवडणूक आयोगाने ८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. मात्र अद्याप निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची पुढील तारीख जाहीर केलेली नाही. गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील १० राज्यसभेच्या जागांसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होणार होती. मात्र या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

राज्यसभेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माकपचे सचिव सीताराम येचुरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण नेत्यांचा कार्यकाळ जुलै ते ऑगस्ट दरम्यान संपणार आहे. राज्यसभेच्या दहा खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन तर माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे.

राज्यसभेचे सदस्य शांताराम नाईक (काँग्रेस, गोवा) यांचा कार्यकाळ २८ जुलै रोजी संपणार आहे. तर अहमद पटेल (काँग्रेस), दिलीपभाई पंड्या (भाजप) आणि स्मृती इराणी (भाजप) या तिघांचा कार्यकाळ १८ ऑगस्टला संपणार आहे. या तिघाही सदस्यांची गुजरातहून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस), देवव्रता बंडोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), सीताराम येचुरी (माकप), सुखेंदुहाखर रॉय (तृणमूल काँग्रेस) आणि डोला सेन (तृणमूल काँग्रेस), प्रदीप भट्टाचार्य (काँग्रेस) या पश्चिम बंगालमधून नियुक्ती झालेल्या खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्टला रोजी संपणार आहे.

माकपचे सचिव सीताराम येचुरी यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. ‘पक्षाचे सदस्य तीनवेळा राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही, असा पक्षाचा नियम आहे. मी या नियमांना बांधील आहे. मी याआधीदेखील हे स्पष्ट केलेले आहे,’ असे येचुरी यांनी म्हटले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेसाठी पाचजणांची नावे जाहीर केली आहेत. डेरेक ओब्रायन, सुखेंदू सेखर रॉय, डोना सेन, डॉ. मानस भुनिया आणि शांता छेत्री यांना ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.