नोटा बदलण्यासाठी होणा-या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नोटा बदलून घेणा-या व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. नोटा बदलणा-या व्यक्तीच्या बोटावर शाई लावू नका अशी विनंती करणारे पत्र निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाला पाठवले आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी वाढली आहे. अनेकजण एकाच दिवशी वेगवेगळ्या बँकेत जाऊन नोटा बदलून घेत असल्याने गर्दीत भर पडते. नोटा बदलताना होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नोटा बदलताना प्रत्येकाच्या बोटावर न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे गर्दीवर काही अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाई लावण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.

राज्यातील २१२ नगर पंचायती/ नगर परिषदांसाठी २७ नोव्हेंबर, १४ डिसेंबर, १८ डिसेंबररोजी मतदान होणार आहे. तर देशाच्या अन्य भागांमध्येही निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी लावणी जाणारी शाई आणि नोटा बदलताना लावलेली शाई यावरुन गोंधळ निर्माण होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील शाई लावण्याच्या निर्णयाचा विरोध दर्शवला होता. पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने निवडणूक आयोगानेही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

अखेर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक आयोगाने तसे पत्रच अर्थमंत्रालयाला पाठवले आहे. विविध राज्यांमध्ये आगामी काळात निवडणूक होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे आता अर्थमंत्रालय शाई लावण्याचा निर्णय मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.