गुरुग्राम येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात काल शुक्रवारी ७ वर्षांच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पालकांनी आज निदर्शने केली. या प्रकरणी अखेर शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. शाळेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली.

रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेमुळे पालक प्रचंड संतापलेले आहेत. बस कंडक्टरने त्याची हत्या केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. घटनेनंतर मुलाचे कुटुंबीय आणि इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुरुग्राम पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. आज शनिवारीही त्यांनी आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. तसेच धरणे धरले. आरोपी बस कंडक्टरवर केलेल्या कारवाईने पालकांचे समाधान झालेले नाही. निष्काळजीपणाचा आरोप करत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. पालकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर व्यवस्थापनाने अखेर प्राचार्यांना निलंबित केले आहे. पण शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. शाळेच्या सुरक्षा एजन्सीविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाची विशेष समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ही घटना धक्कादायक असून मृत मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बस कंडक्टर अशोकला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.