२७१ भारतीयांचा समावेश; सरकारने यादी स्वीकारली नाही

भारतातून बेकायदेशीररीत्या स्थलांतर केलेल्या २७१ नागरिकांची यादी अमेरिकेने दिली असली तरी सरकारने ती स्वीकारलेली नाही. या नागरिकांच्या कागदपत्रांची योग्य पद्धतीने पडताळणी केल्यानंतरच त्यांना मायदेशी पाठविण्यास अनुमती देण्यात येईल, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केले.

अमेरिकेने दिलेली यादी आम्ही स्वीकारलेली नाही आणि सविस्तर तपशील देण्याची मागणी केली आहे. आम्ही सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच त्यांना मायदेशात पाठविण्याबाबत तातडीने प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन आल्यानंतर अमेरिकेच्या धोरणांमध्ये बदल झाला आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कुशल व्यावसायिकांसह अन्य भारतीय नागरिकांबाबत जी पावले उचलली त्याच्या परिणामांबाबत काही सदस्यांनी चिंता व्यक्त केली.

एच१ बी आणि एल१ व्हिसाच्या संदर्भाने कुशल कामगारांबाबत स्वराज म्हणाल्या की, अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये या बाबतची चार विधेयके सादर करण्यात आली आहेत, मात्र अद्याप ती विधेयके मंजूर झालेली नाहीत. भारतीय नागरिक अथवा माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या हिताला बाधा निर्माण होणार नाही यासाठी सरकार अमेरिकेतील उच्चपदस्थांशी सातत्याने संपर्कात आहे, असेही त्या म्हणाल्या.

माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांनी अमेरिकेतील नोकऱ्या बळकावलेल्या नाहीत तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सहभागी होऊन ती अधिक शक्तिशाली केली आहे, असेही आम्ही त्यांना कळविले असल्याचे स्वराज म्हणाल्या.