‘सुपरकॉप’, ‘पंजाबचा शेर’ अशी ओळख असलेले पंजाबचे तत्कालीन पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करण्यात गिल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. खलिस्तानी दहशतवादाचा बिमोड केल्यामुळे ‘सुपरकॉप’ नावाने ओळखले जाऊ लागले. गिल यांनी मे १९८८ मध्ये ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’चेही नेतृत्त्व केले होते. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना त्यांनी बाहेर काढले होते. १९८८ ते १९९० दरम्यान पंजाब पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावल्यानंतर गिल यांची १९९१ मध्ये पुन्हा पंजाबच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. दरम्यान, गिल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलीस विभागातील सेवा आणि संरक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे मोदींनी शोकसंदेशात म्हटले आहे.