23 October 2017

News Flash

लास वेगासमध्ये ५९ जणांचा जीव घेणारा हल्लेखोर कोट्यधीश, जुगाराचा होता नाद

त्याच्याकडे दोन विमानं आणि विविध ठिकाणी स्थावर मालमत्ताही होती

नवी दिल्ली | Updated: October 3, 2017 4:23 PM

Stephen Paddock: स्टीफनने रिअल इस्टेट व्यवसायात कोट्यवधी रूपये कमावले होते व नेवाडात तो ऐषोरामी आयुष्य जगत होता. (Courtesy of Eric Paddock via AP)

लास वेगास येथील एका संगीत समारंभात बेछूट गोळीबार करून ५९ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हल्लेखोर स्टीफन पेडॉकबाबत आता नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. स्टीफनने रिअल इस्टेट व्यवसायात कोट्यवधी रूपये कमावले होते व नेवाडात तो ऐषोरामी आयुष्य जगत होता. इतकंच नव्हे तर माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार त्याच्याकडे दोन विमानं आणि अमेरिकेत विविध ठिकाणी स्थावर मालमत्ताही होती. त्याला जुगार खेळण्याचाही नाद होता, असे त्याच्या भावाने सांगितले.

स्टीफनची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे रविवारी रात्री मंडाले बे या हॉटेलच्या कॅसिनोतील ३२ व्या मजल्यावर किमान २३ बंदुका त्याने का आणल्या होत्या, याचा अजूनही पोलिसांना अंदाज बांधता आलेला नाही. पोलीस व त्याचे कुटुंबीयही यामागचे कारण स्पष्ट करू शकलेले नाहीत.

स्टीफन किमान १० सुटकेस घेऊन हॉटेलमध्ये आला होता. मी काहीच सांगू शकत नसल्याचे स्टीफनचा भाऊ एरिक पत्रकारांशी बोलताना म्हणाला. या वेळी एरिक खूपच घाबरला होता. त्याने स्टीफनने नुकताच पाठवलेला एक मेसेज दाखवला. जुगारात ४० हजार डॉलर जिंकल्यामुळे आनंद झाल्याचे त्याने या मेसेजमध्ये म्हटले होते.

रविवारी रात्री संगीत समारंभात केलेल्या गोळीबारात किमान ५९ लोक मृत्यूमुखी तर सुमारे ५३० जण जखमी झाले. या हल्ल्यावेळी गायक जेसन एल्डन हा गाणं म्हणत होता. या वेळी सुमारे २२ हजार प्रेक्षक उपस्थित होते. ६४ वर्षीय स्टीफनने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्या आधीच आत्महत्या केली होती. दरम्यान, दहशतवादी संघटना आयसीसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. परंतु, तपास अधिकाऱ्यांच्या मते आतापर्यंतच्या तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे निष्पन्न झालेले नाही.

First Published on October 3, 2017 4:23 pm

Web Title: las vegas shooter stephen paddock was a multi millionaire property developer