जम्मू काश्मीरमधील हिंसक परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत काही मोजके लोक काश्मीर खोऱ्यातील जनतेला वेठीस धरत असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेत म्हटले. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश्टन कार्टर यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी पाकिस्तानला चांगलेच ठणकावले.
सीमेपलीकडून मिळत असलेल्या रसदीमुळे काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला आहे. भारत सरकार त्यावर तोडगा काढत आहे. येथील समस्या सोडवण्यासाठी भारत सरकार संवेदनशील आहे. फक्त मोजक्या लोकांमुळे येथे समस्या उदभवल्या आहेत, असे ते म्हणाले. काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, येथील संचारबंदी हटवण्यात आली आहे. येथे लोकनियुक्त सरकार आहे. मुख्यमंत्री स्वत: काश्मीर खोऱ्यातील आहेत. त्यामुळे ही समस्या लवकरच सुटेल, असा अाशावादही पर्रीकर यांनी व्यक्त केला.
भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले, दहशतवादाच्या समस्येवर भारत आणि अमेरिका संयुक्तपणे तोडगा काढतील. भारत आणि अमेरिका हे लोकशाहीवादी देश आहेत. दहशतवादावर मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिका पाठिंबा देत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे चार सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत. काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही ठिकाणी सुरक्षा दले व आंदोलकांत चकमकी उडत आहेत. सलग ५१ दिवसांनंतर सोमवारी संचारबंदी मागे घेण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानीच्या मृत्यूनंतर ८ जुलै पासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता.