पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमधील ८७ टक्के योजना जुन्याच असून त्यांना केवळ नव्या रूपात सादर केले आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या हेतूने सदर पॅकेज जाहीर करण्यात आल्याचा आरोपही नितीशकुमार यांनी केला.
बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील केवळ १० हजार ३६८ कोटी रुपयांपेक्षा अधिक काहीही उपलब्ध होणार नाही आणि त्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम नाही, त्यामुळे राज्याच्या पदरात जेमतेमच पडेल, असे नितीशकुमार यांनी बिहारचे अर्थमंत्री बिजेंद्रप्रसाद यादव यांच्या उपस्थितीत वार्ताहरांना सांगितले. या पॅकेजचा अभ्यास केला असता असे आढळले की, १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील ८७ टक्के योजना जुन्याच आहेत आणि त्या नव्याने सादर करण्यात आल्या आहेत. ज्या नव्या योजना आहेत त्यासाठी पॅकेजमध्ये केवळ सहा हजार कोटी रुपयेच आहेत. त्यामुळे या पॅकेजचा सारासारविचार करता बिहार निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने केलेला तो एक विनोद आहे, असेही ते म्हणाले.
नितीशकुमार यांच्या आक्रमक प्रचार तंत्राला जोरदार धक्का देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे बिहार निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे बदलले आहेत. येत्या काही दिवसांत प्रचारात भाजप अधिक आक्रकम होण्याची शक्यता आहे.