जगभरात बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी गटाला सुरक्षित छत्र उपलब्ध करून देणे पाकिस्तान सुरूच ठेवणार असून, त्यामुळे भारतासोबतच्या संबंधांमध्ये तिढा निर्माण करणारा हा महत्त्वाचा मुद्दा राहील, असे मत अमेरिकेच्या एका वरिष्ठ गुप्तहेराने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानने एलईटीच्या दहशतवाद्यांना नंदनवन मोकळे करून देणे पाकिस्तान सुरूच ठेवेल व त्यामुळे भारतासोबतच्या त्याच्या संबंधातील अडथळा कायम राहील, असे नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी ‘अमेरिकी गुप्तचर समुदायाचे जागतिक धोक्याबाबतचे मूल्यांकन’ या विषयावर सिनेटच्या लष्करी सेवा समितीसमोर बोलताना सांगितले.
पाकिस्तान बहुधा काही आर्थिक सुधारणा लागू करेल आणि पाकिस्तानविरोधी दहशतवादी व त्यांच्या कारवाया यांना लक्ष्य करेल. नागरिकांच्या आर्थिक, ऊर्जाविषयक आणि सुरक्षाविषयक अपेक्षा पूर्ण करण्यात पंतप्रधान नवाझ शरीफ अपयशी ठरले आहेत. त्यातही, २०१४च्या उत्तरार्धात त्यांनी विरोधी पक्षांची निदर्शने हाताळण्यासाठी कथितरीत्या लष्कराला बोलावल्यामुळे त्यांचे स्थान कमजोर झाले, असेही क्लॅपर म्हणाले.