अमेरिकेचे एक विमान मेक्सिकोच्या आखातावर हजारो फूट उंचीवर उडत असतानाच त्याच्या इंजिनाचा एक भाग निखळून पडल्यानंतर विमानातील प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र, या विमानाने आकस्मिक (इमर्जन्सी) लँडिंग करेपर्यंत प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले होते.

न्यू ऑर्लिन्सहून ओरलँडो, फ्लोरिडा येथे जाणारे साऊथवेस्ट एअरलाइन्सचे विमान मेक्सिकोच्या आखातावर असताना त्याचे एक इंजिन तुटून वेगळे झाले. त्यामुळे हे विमान पेन्साकोला येथे तातडीने उतरवणे भाग पडले, असे वृत्त ‘दि न्यूयॉर्क डेली न्यूज’ने दिले आहे.

फ्लाइट ३४७२ हे विमान शनिवारी सकाळी ३०,७०० फूट उंचीवर असताना त्यातील प्रवाशांना विमानाच्या डाव्या बाजूने स्फोटाचा धडकी बसवणारा आवाज ऐकू आला. भयचकित झालेल्या या प्रवाशांना खिडकीबाहेर इंजिनाच्या उघडय़ा पडलेल्या टर्बाईनच्या पात्यांमधून धूर निघताना दिसला. उडत असलेल्या विमानाच्या खिडकीतून घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये, इंजिनाचे तुकडे पडताना दिसले. तर दुसऱ्या छायाचित्रात एक धातूची वस्तू विमानाच्या सांगाडय़ात घुसल्याचे दिसून आले.