टाटा सन्सविरोधात सायरस मिस्त्री यांनी टाकलेली याचिका राष्ट्रीय कंपनी लवादाने फेटाळून लावली आहे. यामुळे सायरस मिस्त्रींना मोठा झटका बसल्याचे म्हटले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात अचानकपणे टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादाकडे धाव घेतली होती. टाटा सन्सच्या या निर्णयावर स्थगिती आणण्यात यावी असे मिस्त्रींनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. तसेच मागील आठवड्यात त्यांनी एक दुसरी याचिका दाखल केली होती.

टाटा सन्सच्या संचालक मंडळावरुन आपल्याला काढून टाकण्यात येऊ नये अशी याचिका त्यांनी केली होती. तेव्हा एकाच आशयाच्या दोन याचिकांवर सुनावणी करण्यास लवादाने नकार दिला आहे. मूळ याचिकेवर ३१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी टाटा सन्सची संचालकांची अतिविशेष बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सायरस मिस्त्री यांना संचालक मंडळावरुन काढून टाकण्यात येईल असा निर्णय घेतला जाणार आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडे टाटा सन्सचे १८ टक्के समभाग आहेत. तेव्हा आपल्याला संचालक मंडळावर राहण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता.

टाटा सन्सच्या चेअरमनपदी एन. चंद्रशेखरन यांची निवड झाल्यानंतर ही निवड बेकायदा आहे असे पत्र त्यांनी टाटा सन्सला लिहिले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तुम्ही नवीन व्यक्तीची अध्यक्षपदी निवड कशी करू शकता? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. कंपनीने अध्यक्षपदावरुन काढून टाकल्यानंतर ते राष्ट्रीय कंपनी लवादाकडे गेले होते. तेव्हा त्यांनी आपली याबाबतची भूमिका मांडली.

आपला लढा हा रतन टाटांच्या विरोधात नसून या व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. कार्पोरेट कंपन्यांचे प्रशासन कसे असावे, त्यांनी नैतिकतेची कुठली बंधने पाळावीत याचा निकाल लागावा याच उद्देशाने मी टाटा सन्सच्या विरोधात लवादाकडे याचिका दाखल केल्याचे त्यांनी म्हटले होते. टाटा सन्समधला कारभार पारदर्शक नसल्याचे त्यांनी या याचिकेमध्ये म्हटले होते. मिस्त्री यांनी याचिका टाकून आपल्या मनातील कटुता सिद्ध केल्याचा टोला टाटा सन्सने लगावला होता. सायरस मिस्त्री यांनी आपली दिशाभूल केली होती असे टाटा सन्सने म्हटले होते. आपल्या निवडीच्या वेळी सायरस मिस्त्री यांनी भरपूर आश्वासने दिली होती परंतु त्यांची ते पूर्तता करू शकले नाही त्यामुळेच त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आले होते असे टाटा सन्सने म्हटले होते.