मिरारोड-भाईंदरमधील बोगस कॉल सेंटर प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. या कॉल सेंटरचा प्रमुख सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगीने क्रिकेटपूट विराट कोहलीकडून ऑडी आर-८ ही गाडी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. सागरने ३ कोटी रुपयांना ही गाडी खरेदी करुन ती आपल्या प्रेयसीला भेट म्हणून दिली. मात्र ‘या प्रकरणाचा विराट कोहलीशी काही संबंध नाही. विराटला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘आम्ही ऑडी आर ८ ही गाडी ताब्यात घेतली गेली. या गाडीची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे. ठक्करने ही गाडी चुकीच्या माध्यमातून कमावलेल्या संपत्तीतून विकत घेतली होती. अधिक तपासानंतर त्याने ही गाडी क्रिकेटपटू विराट कोहलीकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली’, असे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले आहे. ‘कोहलीला ठक्करच्या पार्श्वभूमीविषयी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सागर ठक्करची ऑडी आर ८ गाडी अहमदाबादमधून ताब्यात घेण्यात आली आहे.

सागर ठक्करने ऑडी गाडी खरेदी केल्यावर ती प्रेयसीला भेट म्हणून दिली. सध्या सागर ठक्कर त्याची बहिण रिमासोबत दुबईत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते आहे. बोगस कॉल सेंटर प्रकरणात रिमाचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘सागरसोबत त्याचे आणखी काही नातेवाईक दुबईत असल्याचा आम्हाला संशय आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सागर ठक्करचा जन्म मुंबई उपनगरातील बोरिवलीच्या एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यानंतर तो अहमदाबादला गेला होता. याच ठिकाणी तो बोगस कॉल सेंटर चालवण्याचे तंत्र शिकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अहमदाबादला काही बोगस कॉल सेंटर सुरू केल्यावर त्याने मिरारोड-भाईंदर परिसरात कॉल सेंटर सुरू केले.

मिरारोडमधील बोगस कॉल सेंटरचा ५ ऑक्टोबरला पर्दाफाश झाला. ठाणे पोलिसांना तब्बल १२ कॉल सेंटर्सवर एकाच वेळी छापा टाकला. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकेतील नागरिकांना फोन करुन त्यांना कर भरायला सांगायचे. इंटर्नल रेव्हेन्यू सर्विसमधून फोन करत असल्याचे सांगून येथील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना गंडा घालायचे.

अहमदाबादमध्ये अनेक बोगस कॉल सेंटर आहेत. त्या ठिकाणी यशस्वीपणे बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या लोकांनी त्यानंतर मिरा भाईंदर पट्ट्यात कॉल सेंटर्स सुरू केली. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणी शुक्रवारी ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकन लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा या लोकांवर ठेवण्यात आला आहे.