नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड आणि जळगावमध्ये लवकरच स्वस्त विमानसेवा

‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उड्डान’ या योजनेला अखेर पंख लाभले असून आता अडीच हजार रुपयांमध्ये एक तासाचा विमान प्रवास करणे शक्य होईल. त्यामध्ये कोल्हापूर, नाशिक, नांदेड, जळगाव आणि सोलापूर या महाराष्ट्रातील पाच प्रमुख शहरांचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला आहे. यापैकी नांदेडवरून मुंबई व हैदराबाद सेवा जूनपासून सुरू होईल, तर उर्वरित चार शहरांना सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘उडमन’ योजनेमध्ये सहभागी झालेल्या विमान कंपन्यांच्या पहिल्या बोलीमध्ये (बीडिंग प्रोसेस) निवड झालेल्या पाच विमान कंपन्यांची आणि त्यांना दिलेल्या १२८ मार्गाची घोषणा केली. या योजनेमध्ये देशातील विनावापर पडून असलेली किंवा कमी वापर असलेल्या विमानतळांना जोडण्याचा हेतू आहे. दिल्ली, सिमला, आग्रा- जयपूर, चेन्नई- म्हैसूर, अहमदाबाद- मुंद्रा अशा प्रमुख मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

सध्या विमान कंपन्यांचे दर मागणीबरहुकूम कमी-जास्त (डायनामिक पद्धत) होतात. त्यामुळे अनेक वेळा ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात. दुसरीकडे छोटय़ा शहरांमधून पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने विमान कंपन्यांना आर्थिकदृष्टय़ा सेवा देणे परवडत नाही. त्या पाश्र्वभूमीवर ‘उडमन’ योजना आखली आहे.

काय अन् कसे?

अडीच हजार रुपयांमध्ये (सर्व करांसहित) एक तासांचा हवाई प्रवास करता येईल. त्यासाठी सरकारने शुल्क सवलत, विमानतळ शुल्कमाफी आणि दुरावा रकमेचा काही भार (व्हायेबिलिटी गॅप फंडिंग : ‘व्हीजीएफ’) उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सरकारी मदतीच्या मोबदल्यात निम्म्या जागांचे तिकीट अडीच हजार रुपये ठेवण्याचे बंधन कंपन्यांवर घातले आहे. स्पाइस जेट, एअरलाइन अलाइड सव्‍‌र्हिसेस, टुबरे मेघा एअरवेज, एअर डेक्कन आणि एअर ओडिया आदी पाच कंपन्यांना निवडले असून त्यांच्या विमानांची प्रवासी क्षमता किमान १९ ते कमाल ७८ इतकी असेल.

untitled-11