पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या प्रचार मोहिमेदरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याच्या बेताल वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला. यावेळी जिल्हाधिकारी कनवल तनुज जमोहर गावात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलण्याच्या नादात त्यांची जीभ घसरली. ज्यांना घरात साधे शौचालय बांधता येत नसेल त्यांनी आपल्या पत्नीला विकून टाकावे, असे त्यांनी म्हटले. घरात शौचालय नसल्यामुळे स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावे लागते. त्यामुळे महिलांना त्रासाला समोर जावे लागते, अनेकदा त्यांच्यासोबत बलात्कारासारखे प्रसंग घडतात. केंद्र सरकार घरात शौचालय बांधण्यासाठी मदत देऊ करत आहे. त्यामुळे घरात अवघ्या १२ हजार रूपयांमध्ये शौचालय बांधता येऊ शकते. तुमच्या पत्नीची प्रतिष्ठा या १२ हजार रूपयांपेक्षा जास्त आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खरंतर कनवल तनुज यांना या माध्यमातून महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करायचा होता. मात्र, चुकीच्या उदाहरणामुळे हे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.

त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कनवल तनुज तुमच्या पत्नीची प्रतिष्ठा या १२ हजार रूपयांपेक्षा जास्त आहे का?, असा सवाल विचारताना दिसत आहेत. स्वत:च्या पत्नीच्या प्रतिष्ठेच्या मोबदल्यात १२ हजार रूपये घेणे, तुमच्यापैकी कुणाला पटेल का, असेही त्यांनी विचारले. त्यावर एक गावकरी आमच्याकडे घरात शौचालय बांधायला पैसे नाहीत, असे म्हणाला. तेव्हा तनुज यांनी त्याला म्हटले की, मग तुझी बायको विकून टाक. अनेक लोक आगाऊ पैसे देण्याची मागणी करतात. मात्र, है पैसे मिळाल्यानंतर लोक ते फालतू गोष्टींवर खर्च करतात. असेही तनुज यांनी म्हटले.

काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये ‘स्वच्छ भारत अभियानाच्या’वेळी काही अतिउत्साही आणि अतिरेकी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि काही कर्मचारी स्वच्छ भारत अभियानाचे काम करत होते. मात्र, मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अतिउत्साहाच्या भरात उघड्यावर शौचाला बसलेल्या एका महिलेची छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या जाफर हुसैन याने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी जाफर हुसैन यांना जबर मारहाण केली. जखमी खान यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.